कोल्डप्लेच्या एका कॉन्सर्टमधील व्हायरल क्लिपमध्ये सीईओ अँडी बायरन आणि क्रिस्टिन कॅबॉट यांच्यातील जवळीक दिसून येत आहे. ख्रिस मार्टिनच्या स्टेजवरील टिप्पणीनंतर या दोघांमधील प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगल्या आहेत.
मॅसॅच्युसेट्स - कोल्डप्लेचा अलीकडील कॉन्सर्ट चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे ब्रिटिश रॉक बँडच्या सादरीकरणासाठी नव्हे तर एका वेगळ्याच विषयावर चर्चा होत आहे. जर तुम्ही सोशल मीडियाचे नियमित युजर्स असाल, तर तुम्हाला कोल्डप्लेच्या बोस्टन कॉन्सर्टमधील अनेक क्लिप्स X, TikTok आणि Instagram वर दिसल्या असतील.
कॉन्सर्टमधील एका व्हायरल क्लिपमध्ये, फ्रंटमन ख्रिस मार्टिन अनवधानाने एका पुरुष आणि महिलेवर लाईटचा फोकस टाकताना दिसत आहेत, जे जम्बोट्रॉनवर एकमेकांच्या मिठीत होते. हे दोघे अनुक्रमे अॅस्ट्रोनॉमर कंपनीचे सीईओ अँडी बायरन आणि HR प्रमुख क्रिस्टिन कॅबॉट असल्याचे समोर आले आहे. कॉन्सर्टमध्ये दोघे इंटिमेट असताना त्यांच्यावर नकळत लाईटचा फोकस पडला. त्यामुळे दोघे जरा गांगरलेच.
जेव्हा कॅमेरा त्यांच्यावर केंद्रित झाला, तेव्हा दोघेही लगेच एकमेकांपासून दूर गेले. त्यांनी मोठ्या पडद्यावर त्यांचे चेहरे लपवण्याचा प्रयत्न केला.
त्यांची प्रतिक्रिया पाहून, ख्रिस मार्टिन म्हणाले, "अरे, या दोघांकडे पहा... एकतर त्यांचे प्रेमप्रकरण आहे किंवा ते खूप लाजाळू आहेत." लगेचच, हा क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले. "ख्रिस मार्टिन भारी आहे..," असे एका नेटिझन्सने लिहिले. "हाहा...विचित्र परिस्थिती," अशी दुसऱ्याने टिप्पणी केली. बायरन यांचे लग्न मेगन केरिगन बायरनशी झाले आहे आणि हे जोडपे न्यूयॉर्कमध्ये राहते. कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये क्रिस्टिन कॅबॉटसोबत त्यांची जवळीक दिसल्याने त्यांचे हे विवाहबाह्य संबंध आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बायरन किंवा कॅबॉट यापैकी कोणीही अद्याप या प्रेमप्रकरणाच्या आरोपांवर भाष्य केलेले नाही.


