चीनमध्ये लग्नाचं प्रमाण वाढवण्यासाठी सरकारनं एक वेगळाच मार्ग शोधला आहे. आता मॅरेज रजिस्ट्रेशनसाठी लोकांना सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. बँका, हॉस्पिटल्स आणि चक्क नाईटक्लबमध्येही लग्नाची नोंदणी करता येणार आहे, जेणेकरून ही प्रक्रिया जास्तीत जास्त सोपी आणि जलद होईल.
चीनमध्ये तरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वेगवेगळे प्रयत्न करत आहे. आधी मंदिरं, मग नाईटक्लब आणि विमानतळांवर मॅरेज रजिस्ट्रेशनची सोय करण्यात आली होती. आता या यादीत एका बँकेचा आणि हॉस्पिटलचाही समावेश झाला आहे. चीनमध्ये घटत्या विवाह दरामुळे सरकार चिंतेत आहे आणि लोकांना लग्नबंधनात अडकवण्यासाठी नवनवीन आयडिया शोधत आहे.
या वर्षी ऑगस्टमध्ये, तियानजिन शहरातील 'पोस्ट ऑफ चायना' बँकेच्या एका शाखेनं देशात पहिल्यांदाच मॅरेज रजिस्ट्रेशन सेवा सुरू केली. बँकेत अकाऊंटऐवजी थेट लग्नाची नोंदणी, ही कल्पना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. लोकांनी गंमतीत म्हटलं की, आता फक्त हॉस्पिटलमध्ये ही सोय सुरू व्हायची बाकी आहे.
आणि लोकांची ही गंमतही लगेचच खरी ठरली. २० ऑगस्ट रोजी 'Qixi Festival' म्हणजे 'चायनीज व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी, शेंडोंग प्रांतातील झिबो शहरातील 'मॅटर्नल अँड चाईल्ड हेल्थ हॉस्पिटल'ने मॅरेज रजिस्ट्रेशन सेवा सुरू केल्याची घोषणा केली. हॉस्पिटलच्या मते, या नव्या सोयीमुळे जोडप्यांना एकाच ठिकाणी लग्नाची नोंदणी, लग्नापूर्वीची आरोग्य तपासणी आणि गर्भधारणेपूर्वीचं मार्गदर्शन मिळेल.
याआधी चीनमधील विमानतळांवरही ही सुविधा सुरू झाली होती. जानेवारी महिन्यात, ग्वांगडोंग प्रांतातील ग्वांगझू बाययुन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मॅरेज सर्टिफिकेट देणारं देशातील पहिलं विमानतळ ठरलं. इथे नोंदणी करणाऱ्या जोडप्यांना विमानतळाच्या ऑब्झर्वेशन डेकवर मोफत प्रवेशही देण्यात आला, जिथून ते विमानांना टेक-ऑफ आणि लँड करताना पाहू शकत होते.
गेल्या वर्षी मे महिन्यात चीनने विवाह नोंदणीच्या नियमांमध्ये बदल केल्यानंतर या ट्रेंडला वेग आला. नवीन नियमांनुसार, जोडपी आता त्यांच्या 'हुकोऊ' (hukou) म्हणजे कौटुंबिक नोंदणी असलेल्या ठिकाणाबाहेरही लग्न नोंदवू शकतात. यासाठी त्यांना आता 'हुकोऊ' बुकलेट दाखवण्याचीही गरज नाही, ज्यामुळे ही प्रक्रिया खूप सोपी झाली आहे.
या नियमांमधील बदलांमुळेच देशभरात पर्यटन स्थळं, सार्वजनिक बाग, मंदिरं आणि मेट्रो स्टेशनसारख्या अनेक अनपेक्षित ठिकाणी मॅरेज रजिस्ट्रेशन सेंटर सुरू झाली.
बीजिंग आणि नानजिंगमधील शेकडो वर्ष जुन्या मंदिरांनी पारंपरिक कपड्यांमध्ये लग्न नोंदवू इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी दरवाजे उघडले आहेत. तर अनहुई प्रांतातील हेफेई शहरातील एक मेट्रो स्टेशन, मॅरेज रजिस्ट्रेशन सेवा देणारं चीनमधील पहिलं वाहतूक केंद्र ठरलं.
शांघायने तर यावरही एक पाऊल पुढे टाकलं. तिथल्या एका नाईटक्लबने स्थानिक प्रशासनासोबत मिळून क्लबच्या आतमध्येच मॅरेज सर्टिफिकेट देण्यासाठी खास कार्यक्रम आयोजित केला होता.
या वर्षी मे महिन्यापर्यंत, म्हणजे नवीन नियम लागू झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात, चीनमध्ये सरकारी कार्यालयांबाहेर ५०० हून अधिक मॅरेज रजिस्ट्रेशन सेंटर्स सुरू झाली होती. तर १,३०० हून अधिक मोकळ्या जागांवर प्रशासनाच्या मदतीने मॅरेज सर्टिफिकेट देण्याची सोय करण्यात आली होती.
ही सोपी नोंदणी प्रक्रिया घटस्फोटासाठीही लागू आहे. पण, अशा अनेक ठिकाणी घटस्फोटाची सोय उपलब्ध नाही, कारण त्यासाठी जास्त कागदपत्रांची गरज असते.
लग्नाची नोंदणी करण्यासाठी उपलब्ध असलेल्या या विविध ठिकाणांमुळे लग्न करणं सोपं होईल आणि घटत्या विवाह दराला आळा बसेल, अशी सरकारला आशा आहे.
सुरुवातीला आकडेवारीही उत्साहवर्धक होती. गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत, चीनमध्ये १.६१ दशलक्ष जोडप्यांनी लग्न केलं - हा आकडा आदल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा २२.५ टक्क्यांनी जास्त होता.
संपूर्ण वर्षाचा विचार केल्यास, चीनमध्ये ६.७६ दशलक्ष विवाह नोंदणी झाली, जी मागील वर्षापेक्षा ६,५७,००० ने जास्त होती.
मात्र, हा वेग यावर्षी कायम राहिलेला नाही. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत, विवाह नोंदणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.५ टक्क्यांची घट झाली असून, ३.२८ दशलक्ष जोडप्यांनी लग्न केलं आहे.


