China Malls Use Transparent Toilet Glass to Stop Smokers : चीनमधील शॉपिंग मॉल्सनी धूम्रपान रोखण्यासाठी एक नवीन मार्ग शोधला आहे. टॉयलेट क्युबिकलमध्ये कोणी धूम्रपान केल्यास, त्याच्या दरवाजाची काच पारदर्शक होते. या प्रणालीवर मोठी चर्चा सुरू आहे.
China Malls Use Transparent Toilet Glass to Stop Smokers : सार्वजनिक शौचालयांमध्ये धूम्रपान करणारे अनेक लोक आहेत. पण, हे थांबवण्यासाठी चीनमधील शॉपिंग सेंटर्सनी शोधलेला मार्ग सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ग्वांगडोंग प्रांतातील शेन्झेनमधील शुइबेई इंटरनॅशनल सेंटर आणि शुइबेई जिन्झुओ बिल्डिंग या ज्वेलरी शॉपिंग मॉल्समधील पुरुषांच्या टॉयलेट क्युबिकल्समध्ये धूम्रपान रोखण्यासाठी हा अनोखा मार्ग अवलंबण्यात आला आहे. १६ डिसेंबरपासून सोशल मीडियावर याची मोठी चर्चा सुरू आहे. टॉयलेटच्या आत गुपचूप धूम्रपान रोखण्यासाठी, त्याच्या दारांवर धुरकट दिसणारी विशेष काच बसवण्यात आली आहे.
टॉयलेटच्या आत धूम्रपान केल्यावर काही क्षणांतच वीजपुरवठा बंद होतो. त्यावेळी काचेवरील धुरकटपणा नाहीसा होऊन ती पूर्णपणे पारदर्शक होते आणि क्युबिकलमध्ये धूम्रपान करणारी व्यक्ती बाहेरून स्पष्टपणे दिसू लागते. या प्रणालीबद्दल लोकांना माहिती देण्यासाठी शॉपिंग सेंटर्सच्या दारांवर एक नोटीसदेखील लावण्यात आली आहे. त्यात लिहिले आहे, 'तुम्ही टॉयलेटमध्ये धूम्रपान केल्यास काच पारदर्शक होईल. त्यामुळे धूम्रपान करण्याची इच्छा नियंत्रणात ठेवा, नाहीतर तुम्ही ऑनलाइन व्हायरल व्हाल'.
हे दोन्ही शॉपिंग मॉल्स धूम्रपानाला अजिबात थारा न देणारी ठिकाणे आहेत. धूम्रपान रोखण्यासाठी येथे इतरही मार्ग आहेत. पण, टॉयलेटमधील या काचेच्या प्रणालीमुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. यामागील हेतू चांगला असला तरी, यामुळे लोकांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याची मोठी टीका नेटकऱ्यांकडून या निर्णयावर होत आहे.


