Baba Vanga Predictions: 2026 मध्ये तिसरे महायुद्ध, जागतिक आर्थिक संकट आणि मोठ्या नैसर्गिक आपत्ती येतील, अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली आहे. पुतिन यांची सत्ता जाणे, AI चे वर्चस्व आणि एलियन्ससोबत होणारी पहिली भेट यांचाही भविष्यवाणीत समावेश आहे.

Baba Vanga Predictions: 'भविष्य' म्हणजे वर्तमानानंतर येणारा काळ आणि ज्योतिष किंवा इतर शास्त्रांच्या मदतीने त्या काळाबद्दल केलेले भाकीत किंवा अंदाज. माणसाला अज्ञाताचा शोध घेण्याची असणारी ओढ यातूनच ज्योतिषशास्त्राचा जन्म झाला असावा. गेल्या काही वर्षांपासून नव वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक राशीचे भविष्य जसे वाचले जाते तसेच देशात आणि जागतिक पातळीवर काय होणार याचाही अंदाज वर्तवला जातो. त्यात दृष्टीहीन असणाऱ्या बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवणारे करोडो लोक आहेत. 2026 बद्दल त्या काय म्हणतात जाणून घेऊ.

2026 हे वर्ष फारसे शांततेचे नसेल, असा इशारा बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीतून मिळतो. 'आजी वेंगा' या नावाने जगप्रसिद्ध असलेल्या बाबा वेंगा बल्गेरियातील बेलासिका पर्वतरांगांमधील रुपाइट प्रदेशात राहत होत्या. त्यांच्या हयातीत रशियन कम्युनिस्टांनी त्यांचा छळ केला होता. मात्र, नंतर रशियाकडूनच त्यांना खूप मान्यता मिळाली. 1996 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर बाबा वेंगा यांचे जगभरात चाहते निर्माण झाले. लहानपणापासून अंध असलेल्या बाबा वेंगा यांची 2026 बद्दलची भविष्यवाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिसरे महायुद्ध, AI चे वर्चस्व, सोन्याच्या दरात वाढ, आर्थिक संकट, नैसर्गिक आपत्ती, पुतिन यांची सत्ता जाणे आणि नव्या नेत्याचा उदय अशा अनेक क्षेत्रांमध्ये अस्थिरता, अनिश्चितता आणि बदल 2026 मध्ये घडतील, असे बाबा वेंगा यांनी म्हटले आहे.

युद्धाचा इशारा

2026 मध्ये पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात राजकीय अस्थिरता दिसून येईल, अशी भविष्यवाणी बाबा वेंगा करतात. त्यांनी तिसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीबद्दल आणि जागतिक शक्तींचा समावेश असलेल्या मोठ्या लष्करी हालचालींबद्दल इशारा दिला आहे. हे युद्ध सीमांच्या पलीकडे पसरेल आणि आंतरराष्ट्रीय संघर्षात वाढ होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

चीन तैवानवर नियंत्रण मिळवेल आणि दक्षिण चीन समुद्रात आपले वर्चस्व स्थापित करेल, अशी भविष्यवाणी बाबा वेंगा करतात. रशिया आणि अमेरिका यांच्यात थेट संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल, असेही त्या म्हणतात. यामुळे जगात मोठे आर्थिक संकट निर्माण होईल. बाजारातील घसरण, वाढती महागाई आणि चलनातील अस्थिरता तीव्र होईल.

पुतिन आणि एलियन्स

2026 मध्ये एका नवीन रशियन नेत्याच्या उदयाची भविष्यवाणी बाबा वेंगा करतात. जागतिक राजकारणाची पुनर्रचना करणारा एक शक्तिशाली 'मास्टर' रशियातून उदयास येईल, असे बाबा वेंगा यांचे म्हणणे आहे. 2026 मध्ये AI मानवामध्ये अपरिवर्तनीय बदल घडवून आणण्यास सुरुवात करेल. उद्योग, दैनंदिन जीवन आणि स्व-विचार करणाऱ्या यंत्रांपासून मिळणारे स्वातंत्र्य धोक्यात येईल, असेही बाबा वेंगा सांगतात.

2026 च्या नोव्हेंबरमध्ये मानव पहिल्यांदा एलियन्सना भेटेल. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणाऱ्या एका मोठ्या अंतराळयानातील एक अज्ञात संस्कृती मानवांशी संपर्क साधेल, असे बाबा वेंगा यांनी भाकीत केल्याचे 'द मिरर'ने म्हटले आहे.

आर्थिक संकट, सोन्याचे वाढते भाव

जागतिक अर्थव्यवस्था कोलमडेल. आर्थिक संकट अधिक गडद होईल. पारंपरिक बँकिंग व्यवस्था कोसळेल. बँकिंग क्षेत्रातील अस्थिरता, चलनाचे अवमूल्यन आणि बाजारातील तरलतेची कमतरता यांचा सामना करावा लागेल. यामुळे आर्थिक अनिश्चितता वाढेल. त्यामुळे लोक सोने, चांदी यांसारख्या सुरक्षित मालमत्तांकडे वळतील. यामुळे सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ होईल. सोन्याची किंमत अनेक पटींनी वाढेल, असे बाबा वेंगा सांगतात.

पर्यावरणीय समस्या

2022 मध्ये यूकेमध्ये पुराची भविष्यवाणी करणाऱ्या बाबा वेंगा यांनी 2026 मध्ये गंभीर नैसर्गिक आपत्तींचा इशारा दिला आहे. चक्रीवादळे, सुनामी आणि भूकंपांची संख्या वाढेल. मात्र, नैसर्गिक आपत्ती कुठे आणि केव्हा घडतील, याचा उल्लेख बाबा वेंगा यांनी केलेला नाही, असे 'द एक्स्प्रेस यूएस'च्या वृत्तात म्हटले आहे. 2026 मध्ये भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक पृथ्वीचे हवामान बिघडवतील. याचा परिणाम पृथ्वीच्या भूभागाच्या एका मोठ्या भागावर (7-8 टक्के) होईल. तर इतर भागांमध्ये पूर, दुष्काळ आणि तीव्र हवामान बदलांमुळे दोन तृतीयांश परिसंस्थेत बदल होऊ शकतो, असेही वेंगा यांनी म्हटले आहे.