Airport checking : 2010 ते 2013 दरम्यान, काही विमानतळांवर एक्स-रे तंत्रज्ञानावर आधारित बॅकस्कॅटर स्कॅनर वापरले जात होते. ही मशीन्स शरीराची अत्यंत तपशीलवार प्रतिमा दाखवू शकत असल्याने ती वादग्रस्त ठरली होती. पण सध्या कोणती मशिन्स आहेत?
अलीकडच्या काळात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे आणि दिवसेंदिवस ती वाढतच आहे. अमेरिकेतील 9/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातील सर्वच विमानतळांवरील सुरक्षाव्यवस्था अतिशय कडक करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याबरोबरच मौल्यवान वस्तू तसेच ड्रग्ज तस्करीला आळा घालण्याच्या दृष्टीनेही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची काटेकोरपणे तपासणी केली जाते. मात्र, या तपासणीबाबत अनेकवेळा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. फुल-बॉडी स्कॅनरबाबतही तसाच काहीसा प्रकार आहे.
तुम्ही कधी विमानाने प्रवास केला असेल, तर विमानतळावरील कडक सुरक्षा तपासणीचा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल. तुम्ही विमानतळात प्रवेश करता तेव्हा तुमचे सामान एक्स-रे मशीनमधून जाते. तसेच, प्रवाशांना फुल-बॉडी स्कॅनरमधूनही जावे लागते. विमानात शस्त्रे, स्फोटके किंवा इतर धोकादायक वस्तू नेल्या जात नाहीत ना, याची खात्री करण्यासाठी हे केले जाते. ही तपासणी काही क्षणांत पूर्ण होते. पण स्कॅनरमध्ये उभे असताना स्क्रीनवर काय दिसत असेल, असा प्रश्न अनेक प्रवाशांना पडला असेल. चला, फुल-बॉडी स्कॅनर कसे काम करतात ते सविस्तर पाहूया.
फुल-बॉडी स्कॅनर कसे काम करते?
2000 च्या दशकात विमानतळांवर फुल-बॉडी स्कॅनर्स सादर करण्यात आले. 2009 मध्ये ॲमस्टरडॅम ते डेट्रॉईट विमानात अंतर्वस्त्रात लपवलेली स्फोटके सापडल्यानंतर अशा स्कॅनर्सचा विमानतळांवर मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला. आज जगभरातील बहुतेक विमानतळ मिलिमीटर-वेव्ह इमेजिंग तंत्रज्ञान वापरतात. या तंत्रज्ञानामध्ये, इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी कपड्यांमधून जातात आणि कपड्यांखाली किंवा त्वचेवर लपवलेल्या वस्तूंवरून परावर्तित होतात. मशीन या सिग्नल्सचा अर्थ लावून एक सामान्य आकृती तयार करते. हे तंत्रज्ञान केवळ धातूच नव्हे, तर कपड्यांमध्ये लपवलेल्या इतर वस्तूही शोधू शकत असल्याने, ते मेटल डिटेक्टरपेक्षा अधिक प्रभावी मानले जाते.
बॅकस्कॅटर मशीन्स का काढून टाकण्यात आल्या?
2010 ते 2013 दरम्यान, काही विमानतळांवर एक्स-रे तंत्रज्ञानावर आधारित बॅकस्कॅटर स्कॅनर वापरले जात होते. ही मशीन्स शरीराची अत्यंत तपशीलवार प्रतिमा दाखवू शकत होती. यामध्ये शरीराचे खासगी भागही दिसत होते. त्यामुळे, त्यांना गोपनीयतेसाठी धोका मानले गेले. यामुळे लोकांमध्ये गोपनीयतेच्या धोक्याबद्दल भीती निर्माण झाली. अनेक विमानतळांवर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक विरोध झाल्यानंतर 2013 मध्ये ही मशीन्स बंद करण्यात आली. त्यानंतर मिलिमीटर-वेव्ह स्कॅनर्समध्ये प्रायव्हसी फिल्टर्स जोडण्यात आले, ज्यामुळे फक्त एक सामान्य मानवी आकृती दिसू लागली.
स्कॅनर कपड्यांच्या आरपार पाहू शकतात का?
सध्याचे फुल-बॉडी स्कॅनर्स एखाद्या व्यक्तीच्या कपड्यांमधील तपशील पूर्णपणे पाहू शकत नाहीत, असा दावा केला जातो. त्याऐवजी, ते स्क्रीनवर फक्त एक मानवी आकृती दाखवतात. स्कॅन करताना कपड्यांखाली काहीही लपवलेले आढळले नाही, तर बॉडी स्कॅनर कोणताही अलर्ट दाखवत नाही आणि तुम्ही पुढे जाऊ शकता. पण जर स्कॅनरला कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली, तर डिस्प्ले त्या विशिष्ट भागाला अस्पष्टपणे दर्शवतो. हे स्कॅनर शरीराच्या आतील भाग पाहू शकत नाहीत.


