चेहरा हा आपल्या आरोग्याचा (Health tips) आरसा असतो. तुमचा चेहरा जर सुजलेला असेल, त्वचा कोरडी दिसत असते तर ही लक्षणे आजाराचे संकेत देतात. म्हणून डॉक्टर सर्वात आधी तुमचा चेहरा पाहतात. त्यानंतर हाताची नखे, हृदयाचे ठोके तपासतात.
डॉक्टर तुमच्या चेहरा पाहूनच काही आजारांची लक्षणे (Health tips) सहज ओळखू शकतात? तुम्हाला हे खरं वाटत नाही ना…पण हे खरं आहे. तुमचा चेहरा, हाताची नखे, नाडी, हृदयाचे ठोके तपासले की डॉक्टरांना तुम्हाला कोणता आजार आहे, याचा अंदाज येऊ शकतो. म्हणजे तुमचा चेहराच तुमच्या आरोग्याचा आरसा आहे. ब्लड टेस्ट व इतर सर्व गोष्टी नंतर येतात. चला तर मग जाणून घेऊया ती लक्षणे नेमकी कोणती आहेत.
1. कोरडी, निस्तेज त्वचा आणि ओठ
त्वचा खूप कोरडी होणे आणि त्यावर पापुद्रे येणे हे निर्जलीकरणाचे (dehydration) प्रमुख लक्षण आहे. यामुळे घामाच्या ग्रंथींवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येते. यात प्रामुख्याने हायपोथायरॉईडीझम (थायरॉईड हार्मोनची पातळी कमी होणे) किंवा मधुमेह यांचा समावेश असू शकतो. हायपोथायरॉईडीझमची इतर काही लक्षणे म्हणजे थंडी वाजणे, वजन वाढणे आणि थकवा. मधुमेहाच्या काही लक्षणांमध्ये जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे आणि दृष्टी अंधुक होणे यांचा समावेश होतो. या लक्षणांसोबतच एक्झिमा, सोरायसिस, डर्माटायटिस किंवा औषधांची ॲलर्जी देखील असू शकते.
2. चेहऱ्यावर केसांची जास्त वाढ
चेहऱ्यावर अनावश्यक केसांची वाढ दिसून येते. विशेषतः हनुवटी, गालाच्या कडेला आणि ओठांच्या वरच्या भागात केसांची जास्त वाढ होणे, हे पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचे (PCOS) लक्षण असू शकते. हार्मोनच्या असंतुलनामुळे असे होते आणि महिलांमध्ये पुरुष हार्मोन वाढल्यामुळे केसांची असामान्य वाढ होते. पण याला लगेचच मोठी समस्या समजू नका. काही महिलांमध्ये आनुवंशिकतेमुळेही चेहऱ्यावर केस वाढू शकतात.
3. पापण्यांवर पिवळे डाग
हे शरीरात कोलेस्ट्रॉल जमा झाल्याचे लक्षण आहे आणि याला 'झॅन्थेलाझ्मा' (Xanthelasma) म्हणतात. अशा प्रकारचे डाग असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असतो. एका अभ्यासानुसार, झॅन्थेलाझ्मा असलेल्या लोकांमध्ये उच्च BMI आणि कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असल्याचे आढळून आले आहे.
4. डोळ्यांखाली सूज येणे
थकलेले डोळे हे दीर्घकालीन ॲलर्जीचे लक्षण असू शकते, ज्यामुळे रक्तवाहिन्या कमकुवत होतात आणि त्यातून द्रव गळू लागतो. डोळ्यांभोवतीच्या नाजूक त्वचेत यामुळे सूज येते आणि गडद जांभळा रंग दिसू लागतो. याची इतर काही कारणे म्हणजे हायपोथायरॉईडीझम आणि अपुरी झोप.
5. चेहरा सुन्न किंवा बधिर होणे
हे पक्षाघाताचे (stroke) पहिले लक्षण असू शकते. अशावेळी रुग्ण डॉक्टरांना सांगतात की, 'मी आरशात पाहिलं तेव्हा माझा चेहरा खूप वेगळा दिसत होता'. चेहऱ्याचा एक भाग सुन्न झाल्यासारखे वाटू शकते किंवा पूर्णपणे हसता येत नाही किंवा बोलण्यात अडचळा येऊ शकतो. इतर चाचण्या केल्याशिवाय पक्षाघाताबद्दल निश्चितपणे सांगता येत नाही. याचे निदान लवकर झाल्यास पक्षाघातावर उपचार करणे शक्य होते. हात-पायांमध्ये अशक्तपणा येणे हे देखील पक्षाघाताचे कारण आहे.
6. चेहऱ्याचा रंग बदलणे
कधीकधी छोटे बदल मोठ्या धोक्याचे संकेत देतात. त्वचा निस्तेज दिसणे हे ॲनिमियाचे (रक्तक्षय) लक्षण असू शकते. त्वचा पिवळी होणे हे यकृताच्या समस्येचे लक्षण आहे. ओठ किंवा नखांच्या टोकांवर निळसर डाग दिसणे हे हृदय किंवा फुफ्फुसाच्या आजाराचे लक्षण असू शकते.
7. पुरळ आणि डाग
पचनसंस्थेच्या काही समस्या त्वचेवर दिसू शकतात. खाजेसह लाल पुरळ येणे हे 'सीलिएक' (celiac) आजाराचे लक्षण असू शकते. हा एक ऑटोइम्यून आजार आहे, ज्यामध्ये शरीर ग्लूटेनला प्रतिक्रिया देते. गालाची हाडे आणि नाकाच्या पुलावर फुलपाखराच्या आकाराचे पुरळ दिसणे हे 'ल्युपस' (Lupus) चे लक्षण आहे. हा देखील एक ऑटोइम्यून आजार आहे. ॲलर्जी, एक्झिमा आणि रोझेशियामुळेही चेहऱ्यावर पुरळ येऊ शकते.
8. केस गळणे
भुवया किंवा पापण्यांचे केस गळणे हे 'ॲलोपेशिया एरियाटा' (Alopecia Areata) चे लक्षण आहे. ही एक ऑटोइम्यून समस्या आहे, जी केसांच्या मुळांवर परिणाम करते. हा आजार शरीराच्या काही भागांपुरता मर्यादित असू शकतो किंवा संपूर्ण शरीरात दिसू शकतो. डोळ्यांच्या भागात पापण्या किंवा भुवयांचे केस गळू शकतात. यावर उपचार उपलब्ध आहेत, पण पूर्णपणे इलाज नाही.
9. नवीन तीळ किंवा चामखीळ
तीळ ही चिंतेची बाब नसली तरी, नवीन वाढणाऱ्या तिळाची डॉक्टर किंवा त्वचा तज्ञांकडून योग्य तपासणी करून घ्या. हे त्वचेचा कर्करोग असू शकते किंवा काहीवेळा शरीरातील एखाद्या आजाराचे किंवा आनुवंशिक आजाराचे लक्षण असू शकते.


