हिवाळ्याचा ऋतू सुरू होताच हृदयविकाराच्या झटक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. थंडीमुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, परिणामी रक्तदाब वाढून हृदयावर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.
थंड हवामानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, परिणामी रक्तदाब वाढतो आणि हृदयावर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका अधिक वाढतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. तापमानातील घट आणि जीवनशैलीतील बदल हिवाळ्यात हृदयासाठी घातक ठरू शकतात.
जगभरातील मृत्यूंच्या प्रमुख कारणांपैकी हृदयविकाराचा झटका हे एक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरातील मृत्यूंमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (CVDs) पहिल्या क्रमांकावर आहेत. २०२२ मध्ये सुमारे १९.८ दशलक्ष लोकांचा मृत्यू हृदयविकारामुळे झाला आणि यापैकी ८५ टक्के मृत्यू हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघातामुळे झाले होते.
रक्तप्रवाहात अडथळा येण्याची विविध कारणे असू शकतात, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये, हृदयाच्या एक किंवा अधिक धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे असे घडते. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, जर रक्तप्रवाह लवकर पूर्ववत झाला नाही, तर त्यामुळे हृदयाचे कायमचे नुकसान होऊ शकते आणि मृत्यूही ओढवू शकतो.
अभ्यासानुसार, हिवाळ्यात हृदयविकाराच्या झटक्यांची प्रकरणे वाढतात. या वाढीमागे अनेक घटक कारणीभूत आहेत. थंड महिन्यांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असतो. जीवनशैलीतील बदल आणि तापमानातील घट यामुळे हृदयावर ताण येतो, असे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित खडतारे यांनी सांगितले.
हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका वाढवणारे घटक
एक
हृदयविकाराचा धोका वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे 'व्हासोकॉन्स्ट्रिक्शन' (vasoconstriction). शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी रक्तवाहिन्या आकुंचन पावण्याची ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. यामुळे रक्तदाब वाढतो आणि रक्त पंप करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. ज्या लोकांच्या धमन्या आधीच ब्लॉक आहेत किंवा हृदयाची कार्यक्षमता कमी आहे, त्यांच्यासाठी हा अतिरिक्त ताण हृदयविकाराच्या झटक्याचे कारण बनू शकतो. थंड हवामानामुळे रक्ताची चिकटपणा (viscosity) वाढते, म्हणजेच रक्त घट्ट होते आणि गुठळ्या होण्याची शक्यता वाढते. यामुळे हृदयविकाराचा धोका आणखी वाढतो.
दोन
व्यायामाचा अभाव हे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. यामुळे वजन वाढते, रक्ताभिसरण खराब होते आणि लिपिड प्रोफाइल बिघडते. याशिवाय, हिवाळ्यात अनेकदा मीठ, साखर आणि चरबीयुक्त पदार्थ जास्त खाल्ले जातात. या सर्वांमुळे रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉलमध्ये अचानक वाढ होऊ शकते.
तीन
हिवाळ्यात इन्फ्लूएंझासारखे श्वसनमार्गाचे संक्रमण अधिक सामान्य असते, ज्यामुळे शरीरात सूज येऊ शकते. ही सूज धमन्यांमधील प्लाकला अस्थिर करू शकते आणि अडथळे निर्माण होण्याची शक्यता वाढवते.
चार
हिवाळ्यात वाढणारा ताणतणाव देखील हृदयविकाराच्या झटक्यांची प्रकरणे वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालाईनसारखे स्ट्रेस हार्मोन्स हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढवतात. या सर्वांचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो.


