why we feel sleepy in the morning in winter season : हिवाळ्यात दिवस लहान आणि रात्री मोठ्या असल्याने, तसेच शरीराचे तापमान कमी झाल्यामुळे सकाळी उठणे कठीण होते. शरीरातील मेलाटोनिन हार्मोनच्या वाढीमुळे झोपेतून जागे होण्याची प्रक्रिया मंदावते. 

why we feel sleepy in the morning in winter season : हिवाळ्याचे दिवस सुरू झाले की अनेकांना सकाळी उठताना प्रचंड त्रास होतो. अलार्म वारंवार वाजतो, तरीही उबदार पांघरूण सोडून बाहेर यावसं वाटत नाही. ही समस्या केवळ आळशीपणाशी संबंधित नसून, त्यामागे मानवी शरीराची रचना, हार्मोन्सची कार्यपद्धती आणि हवामानातील बदल यांचं सखोल विज्ञान दडलेलं आहे.

मानवी शरीराचं तापमान दिवसाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलत असतं. पहाटेच्या वेळी शरीराचं तापमान नैसर्गिकरित्या सर्वात कमी असतं. त्यातच बाहेरचं वातावरण थंड असल्यामुळे शरीर उष्णता टिकवून ठेवण्यासाठी अधिक ऊर्जा वापरतं. त्यामुळे शरीर स्वतःला विश्रांतीच्या अवस्थेत ठेवण्याचा प्रयत्न करतं आणि जाग येऊनही पुन्हा झोप येते.

शारीरिक बदल होतात

याशिवाय, हिवाळ्यात दिवस लहान आणि रात्री मोठ्या असल्यामुळे झोपेसाठी जबाबदार असलेलं ‘मेलाटोनिन’ हे हार्मोन अधिक प्रमाणात स्रवतं. अंधार जास्त असल्याने मेंदूला अजूनही रात्रच असल्यासारखं वाटतं. परिणामी सकाळी जाग येण्याची प्रक्रिया मंदावते. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात सकाळी उशिरा उजाडतं, त्यामुळे नैसर्गिक सूर्यप्रकाश लवकर मिळत नाही. सूर्यप्रकाशाचा अभाव हा शरीराच्या जैविक घड्याळावर थेट परिणाम करतो.

थंडीमुळे स्नायूंमध्ये ताठरपणा येतो आणि रक्ताभिसरण काहीसं मंद होतं. त्यामुळे उठल्यानंतर शरीर हलकं वाटत नाही. हात-पाय जड वाटतात आणि काम सुरू करण्याची इच्छाशक्ती कमी होते. यासोबतच मानसिक कारणांचाही प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. उबदार अंथरुण, गरम पांघरूण आणि बाहेरची थंड हवा यांचा विचार करताच मन पुन्हा झोपेचा पर्याय निवडतं.

सूर्यप्रकाश महत्त्वाचा

मात्र योग्य सवयी अंगीकारल्या, तर हिवाळ्यातही सकाळी उठणं सुसह्य करता येऊ शकतं. उठताच खिडकी उघडून थोडा सूर्यप्रकाश अंगावर पडू देणं उपयुक्त ठरतं. नैसर्गिक प्रकाशामुळे मेलाटोनिन हार्मोनचं प्रमाण कमी होतं आणि शरीर जागृत होऊ लागतं. थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याने चेहरा धुणं किंवा आंघोळ करणं शरीराला लगेच सक्रिय करतं.

सकाळी गरम पेय घेणंही फायदेशीर ठरतं. आलं घातलेला चहा, ग्रीन टी किंवा साधं कोमट पाणी शरीराला उष्णता देतं आणि सुस्ती कमी करतं. यासोबतच दररोज ठरावीक वेळी झोपणं आणि उठणं ही सवय लावणं महत्त्वाचं आहे. यामुळे शरीराची जैविक घड्याळ व्यवस्थित कार्य करू लागतं.

असा मिळेल ताजेपणा

हलका व्यायाम, स्ट्रेचिंग किंवा काही सूर्यनमस्कार केल्यास रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीरात ताजेपणा येतो. रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा टीव्ही पाहणं टाळल्यास झोपेची गुणवत्ता सुधारते आणि सकाळी उठणं तुलनेने सोपं जातं.

एकंदरीत पाहता, ठंडीत सकाळी उठणं अवघड वाटणं हे नैसर्गिक असलं तरी ते अटळ नाही. शरीराच्या गरजा समजून घेतल्या आणि दिनचर्येत थोडे बदल केले, तर हिवाळ्यातही सकाळ उत्साही, सक्रिय आणि आनंददायी होऊ शकते.