महिलांच्या स्किनकेअर रूटीनमध्ये सनस्क्रीन का असायलाच हवं? रोज सनस्क्रीन लावण्याचे फायदे, अतिनील किरणांपासून संरक्षण आणि त्वचेची काळजी घेण्याच्या सोप्या पद्धतींबद्दल सविस्तर जाणून घ्या.

एखादी महिला तिच्या त्वचेसाठी काय वापरते, हे फक्त तिच्याकडे असलेल्या प्रॉडक्ट्सवर अवलंबून नसतं. तिचं वय, त्वचेच्या समस्या, स्किनकेअरबद्दलची तिची माहिती आणि तिची आर्थिक स्थिती या सगळ्या गोष्टींचा तिच्या निवडीवर परिणाम होत असतो. क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे सनस्क्रीन महत्त्वाचं आहे हे महिलांना माहीत असतं, पण तरीही त्या ते रोज लावत नाहीत. ही तफावत नक्कीच विचार करण्यासारखी आहे.

यामागचं कारण फार गुंतागुंतीचं नाही. 'उन्हापासून त्वचेचं संरक्षण करणं गरजेचं आहे', असं नुसतं सांगून महिलांचं रोजचं रूटीन बदलत नाही. खऱ्या अर्थाने फरक तेव्हा पडतो, जेव्हा आपण त्यांच्या गरजा समजून घेतो. आयुष्याच्या त्या टप्प्यावर त्यांना कोणत्या समस्या भेडसावत आहेत आणि त्यांच्या रोजच्या जगण्यातील कोणत्या गोष्टी त्यांच्या निवडीवर प्रभाव टाकतात, हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे.

वयानुसार त्वचेच्या समस्या बदलतात

२२ वर्षांच्या मुलीला त्वचेच्या ज्या समस्या सतावतात, त्याच समस्या ४० वर्षांच्या महिलेला असतीलच असं नाही. तरुण मुलींना सहसा त्वचा कोरडी पडणे किंवा खूप तेलकट होणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. पण वयाच्या तिशीनंतर, वाढत्या वयाच्या खुणा त्वचेवर दिसू लागतात आणि वेळेसोबत या समस्या अधिक वाढत जातात.

याच बदलामुळे सनस्क्रीनबद्दल बोलण्याची पद्धतही बदलायला हवी. तरुण मुलींना तेलकट टी-झोन किंवा कोरड्या त्वचेची चिंता असू शकते, तर तिशी किंवा त्यापुढील महिलांना चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पिगमेंटेशनची काळजी असते. थोडक्यात सांगायचं तर, प्रत्येक महिलेचं सनस्क्रीन वापरण्याचं कारण वेगळं असतं. अशा वेळी सनस्क्रीनमधील घटक ही तफावत दूर करू शकतात. उदाहरणार्थ, सनस्क्रीनमधील 'नियासिनमाइड' (Niacinamide) मुळे त्वचेचा रंग एकसमान होतो आणि नियमित वापराने त्वचेचं संरक्षण कवच मजबूत होतं. त्यामुळे हे घटक विशीतल्या तेलकट त्वचेसाठी जेवढे फायदेशीर आहेत, तेवढेच चाळिशीतल्या पिगमेंटेशनच्या समस्येवरही उपयुक्त ठरतात.

'सर्वांसाठी एकच नियम' या पद्धतीने सनस्क्रीनचा विचार करणं चुकीचं ठरेल. जेव्हा महिलांना त्यांच्या बदलत्या गरजांनुसार योग्य माहिती मिळते, तेव्हा त्याचा जास्त फायदा होतो. जेव्हा एखाद्या महिलेला जाणवतं की सनस्क्रीन तिच्या स्वतःच्या त्वचेच्या समस्येवर काम करतंय, तेव्हा ती ते सक्ती म्हणून नाही, तर गरजेची गोष्ट म्हणून वापरू लागते.

जागरूकतेमुळे रोजच्या सवयी बदलू शकतात

इथे जागरूकता खूप महत्त्वाची ठरते. फक्त सनस्क्रीन नावाचं प्रॉडक्ट आहे हे माहीत असणं पुरेसं नाही, तर ते कसं वापरायचं हे समजणंही गरजेचं आहे. ज्या महिला आपल्या त्वचेची जास्त काळजी घेतात आणि ज्यांना उन्हापासून संरक्षणाबद्दल चांगली माहिती असते, त्या नियमितपणे सनस्क्रीन वापरताना दिसतात.

यावरून योग्य माहिती असण्याचे फायदे दिसून येतात. पण फक्त सनस्क्रीन बाजारात उपलब्ध आहे, एवढं माहीत असणं पुरेसं नाही. ते आपल्या रोजच्या रूटीनचा भाग का असायला हवं, हे महिलांना समजायला हवं. ही समज सनस्क्रीनच्या फॉर्म्युलेशनपर्यंतही जाऊ शकते. उदाहरणार्थ, 'एनकॅप्स्युलेटेड सनस्क्रीन टेक्नॉलॉजी'मध्ये (encapsulated sunscreen technology) यूव्ही फिल्टर्स एका संरक्षक कवचात असतात. यामुळे हे प्रॉडक्ट त्वचेवर हलकं वाटतं आणि दिवसभर टिकून राहतं. असं असलं तरी, मूळ नियम बदलत नाही: जर तुम्ही उन्हात बाहेर असाल, तर दर काही तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावणं गरजेचं आहे.

स्किनकेअरबद्दलची माहिती तेव्हाच जास्त उपयोगी पडते, जेव्हा ती उन्हापासून संरक्षण करणं हा रोजच्या जगण्याचा एक भाग कसा आहे, हे समजावून सांगते. त्याला एक वेगळी आणि जास्तीची गोष्ट मानू नये. जेव्हा एखाद्या महिलेला समजतं की ती त्वचेसाठी जे काही करत आहे, त्यात सनस्क्रीन कुठे बसतं, तेव्हा तिला ते ओझं वाटत नाही.

शिक्षण आणि आर्थिक स्थितीचाही प्रभाव

सनस्क्रीनचा वापर हा शिक्षण आणि उत्पन्नावरही अवलंबून असतो, आणि हे अगदी साहजिक आहे. चांगल्या शिक्षणामुळे जागरूकता वाढते. तसेच, एखादं प्रॉडक्ट रोज वापरण्यासाठी परवडणारं आहे की नाही, यावर त्याचा नियमित वापर ठरतो.

त्यामुळे फक्त जागरूकता वाढवून हा प्रश्न सुटणार नाही. एखादं प्रॉडक्ट सहज उपलब्ध असणं आणि ते खिशाला परवडणं, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जर एखादं सनस्क्रीन आर्थिकदृष्ट्या किंवा इतर कारणांमुळे आवाक्याबाहेर वाटत असेल, तर ते कधीच कोणाच्या रोजच्या सवयीचा भाग बनू शकत नाही. मग त्या महिलेला त्याचे फायदे कितीही चांगले माहीत असले तरीही.

स्किनकेअरबद्दल बोलताना या व्यावहारिक वास्तवाचा विचार करणं गरजेचं आहे. योग्य माहितीमुळे महिलेला सनस्क्रीनचं महत्त्व समजतं, पण त्याची उपलब्धता आणि किंमत या गोष्टीच ठरवतात की ती समज सवयीत बदलेल की नाही.

सनस्क्रीनला सवय बनवा, पर्याय नको

जास्तीत जास्त महिलांनी नियमितपणे सनस्क्रीन वापरावं, यासाठी त्यांनी कसं वागावं यापेक्षा त्या प्रत्यक्षात कशा वागतात, हे समजून घेणं गरजेचं आहे. सर्व महिलांचा एकच गट नसतो आणि त्यांच्या त्वचेच्या समस्या किंवा स्किनकेअरमधील रसही सारखा नसतो. यात वय नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावतं, पण त्याचबरोबर जागरूकता, शिक्षण आणि आर्थिक क्षमता या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. ज्या महिलांची त्वचा उन्हामुळे किंवा नवीन प्रॉडक्ट्समुळे लगेच रिअॅक्ट करते, त्यांच्यासाठी 'सिका' (Cica) सारखा घटक खरोखरच फायदेशीर ठरू शकतो. हा घटक त्वचेची जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यासाठी ओळखला जातो. यामुळे रोज सनस्क्रीन लावणं हा एक सुरक्षित पर्याय वाटू लागतो.

भविष्यातील सनस्क्रीन किंवा आरोग्य मोहिमांसाठी यात एक महत्त्वाचा मुद्दा दडलेला आहे. महिलांची त्वचा समजून घेणं म्हणजे फक्त निम्मं काम झालं. उरलेलं निम्मं काम म्हणजे त्यांच्या निवडीमागे नक्की कोणती कारणं आहेत, हे समजून घेणं.

आधीच भरगच्च असलेल्या रूटीनमध्ये आणखी एका गोष्टीची भर घालणं, हा यामागचा उद्देश नाही. तर उन्हापासून संरक्षण करणं हा त्या रूटीनचाच एक भाग वाटायला हवा, हा खरा उद्देश आहे. जेव्हा जागरूकता, गरज आणि उपलब्धता या तिन्ही गोष्टी एकत्र येतात, तेव्हा महिला कोणताही विचार न करता सहजपणे सनस्क्रीनचा वापर करू लागतील.

सनस्क्रीनचा वापर हा कधीच फक्त जागरूकतेपुरता मर्यादित नव्हता. वय, शिक्षण, आणि एखादी महिला काय खरेदी करू शकते, या सर्व गोष्टींवरून ती तिच्या त्वचेचं किती नियमितपणे संरक्षण करते हे ठरतं. हे सगळं समीकरण समजून घेण्यापासूनच खऱ्या अर्थाने सकारात्मक बदलाची सुरुवात होऊ शकते.

- हा लेख इबेरिया फार्मास्युटिकल्सच्या (Iberia Pharmaceuticals) मेडिकल अफेअर्स मॅनेजर डॉ. ज्योती तिवारी (Dr. Jyoti Tiwari) यांनी लिहिला आहे.