UN Report : महिलांसाठी गर्भाशयाचा कर्करोग खूपच जीवघेणा ठरत आहे. संयुक्त राष्टांच्या अहवालावरून हे वास्तव समोर आले आहे. अशा परिस्थितीत सर्व मुलींना HPV लसीकरण द्यावे आणि दरवर्षी गर्भाशयाची तपासणी करावी, असे आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे.

UN Report : स्तनाच्या कर्करोगासंदर्भात अलीकडेच आयीसएमआरचा अहवाल अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे. मांसाहार, अपुरी झोप आणि लठ्ठपणा यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो, असे निष्कर्ष ICMR च्या अभ्यासातून समोर आले आहेत. याच्याबरोबरच, संयुक्त राष्ट्रांचाही (UN) एक अहवाल अलीकडेच जारी झाला आहे. हा अहवाल धक्कादायक आहे. महिलांसाठी गर्भाशयाचा कर्करोग खूपच जीवघेणा ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

UN च्या अहवालानुसार, दर दोन मिनिटांनी एका महिलेचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू होतो. दरवर्षी जानेवारी महिना कर्करोग जागरूकता महिना म्हणून पाळला जातो.

 जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये जगभरात 660,000 महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले आणि सुमारे 350,000 महिलांचा या आजारामुळे मृत्यू झाला.

युनिसेफच्या (UNICEF) मते, हा आजार दर दोन मिनिटांनी एका महिलेचा जीव घेतो. गर्भाशयाच्या कर्करोगाची बहुतेक सर्व प्रकरणे ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) संसर्गाशी संबंधित आहेत. हा विषाणू लैंगिक संपर्कातून पसरतो.

बऱ्याच प्रकरणांमध्ये, रोगप्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या विषाणूला नष्ट करते, परंतु काही कर्करोगजन्य HPV विषाणूंच्या सततच्या संसर्गामुळे पेशींची असामान्य वाढ होऊ शकते, ज्याचे रूपांतर कर्करोगात होऊ होते. योग्य तपासणी, लसीकरण आणि उपचाराने गर्भाशयाचा कर्करोग टाळता येतो आणि बराही होऊ शकतो.

सर्व मुलींना HPV लसीकरण द्यावे आणि दरवर्षी गर्भाशयाची तपासणी करावी, असे आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे. लवकर निदान झाल्यास आणि प्रभावीपणे उपचार केल्यास हा कर्करोग यशस्वीरित्या बरा होऊ शकतो.

योनीतून स्राव, लैंगिक संबंधावेळी वेदना, पेल्विक तपासणीनंतर रक्तस्त्राव, नेहमीपेक्षा जास्त योनीतून स्राव, स्रावामध्ये रक्त दिसणे, रजोनिवृत्तीनंतर योनीतून रक्तस्त्राव, ओटीपोटात दुखणे आणि लघवी करताना वेदना होणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.