2009 पासून प्रीमियम SUV मार्केटवर राज्य करणाऱ्या टोयोटा फॉर्च्युनरला टक्कर देण्यासाठी दोन नव्या गाड्या येत आहेत. JSW MG मोटर्सची मॅजेस्टर आणि चेरी इंटरनॅशनलची जेटोर T2 या दोन्ही गाड्या 2026 मध्ये लाँच होणार आहेत. या नव्या SUV ट्विन-टर्बो डिझेल आणि प्लग-इन हायब्रीड इंजिन पर्यायांसह येणार आहेत.

Fortuner Rivals : 2009 मध्ये लाँच झाल्यापासून टोयोटा फॉर्च्युनरने प्रीमियम थ्री-रो एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. गाडीचा दमदार रोड प्रेझेन्स, ऑफ-रोड क्षमता, पॉवरफुल इंजिन, ब्रँडवरील विश्वास आणि चांगली रिसेल व्हॅल्यू या गोष्टी नेहमीच फॉर्च्युनरच्या बाजूने राहिल्या आहेत.

पण आता टोयोटा फॉर्च्युनरच्या या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी दोन नव्या गाड्या सज्ज झाल्या आहेत. JSW MG मोटर्स आणि चेरी इंटरनॅशनल मिळून 2026 मध्ये मॅजेस्टर (Majester) आणि जेटोर T2 (Jetour T2) या दोन एसयूव्ही लाँच करण्याची योजना आखत आहेत. ट्विन-टर्बो डिझेल इंजिन असलेली MG मॅजेस्टर आणि प्लग-इन हायब्रीड पॉवरट्रेन असलेली जेटोर T2 सप्टेंबर 2026 पर्यंत बाजारात दाखल होईल. गाड्यांच्या अधिकृत किमती लाँचच्या वेळीच जाहीर केल्या जातील. तरीही, मॅजेस्टरची एक्स-शोरूम किंमत 40 ते 45 लाख रुपये आणि जेटोर T2 ची किंमत 38 ते 40 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. चला, या दोन्ही गाड्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

एमजी मॅजेस्टर (MG Majester)

एमजी मॅजेस्टरची बुकिंग्स आधीच सुरू झाली असून, मे 2026 पासून तिच्या डिलिव्हरीला सुरुवात होईल. ही एसयूव्ही 6 आणि 7-सीटर पर्यायांमध्ये चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. यात फक्त 2.0L ट्विन-टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनचा पर्याय मिळेल, जे 8-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले असेल. हे इंजिन 215bhp ची कमाल पॉवर आणि 478Nm टॉर्क निर्माण करते. या एसयूव्हीमध्ये 'M-Hub' नावाच्या टेरेन मॅनेजमेंट सॉफ्टवेअरसह ऑन-डिमांड फोर-व्हील-ड्राइव्ह (4WD) सिस्टीम देखील देण्यात आली आहे.

जेटोर T2 (Jetour T2)

जेटोर T2 च्या प्लग-इन हायब्रीड पॉवरट्रेनमध्ये 1.5L डायरेक्ट-इंजेक्शन टर्बो पेट्रोल इंजिन, ड्युअल इलेक्ट्रिक मोटर्स आणि 26.7kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे. फक्त ईव्ही मोडवर चालवताना, इलेक्ट्रिक मोटर्स चाकांना पॉवर देतात. या गाडीची एकत्रित पॉवर 381bhp आणि टॉर्क 610Nm आहे. एसयूव्हीमध्ये 3-स्पीड डेडिकेटेड हायब्रीड ट्रान्समिशन (DHT) आहे, जे पारंपरिक ई-सीव्हीटी युनिटपेक्षा चांगली कामगिरी देईल असा दावा केला जातो. ग्लोबल-स्पेक T2 मॉडेल 139 किमीची NEDC इलेक्ट्रिक रेंज आणि 1,000 किमी पेक्षा जास्त एकत्रित ड्रायव्हिंग रेंज देते.