भारतीय टू-व्हीलर मार्केटमध्ये २०५ सीसी ते ३४० सीसी सेगमेंटचे ऑगस्ट महिन्याचे सेल्स रिपोर्ट आले आहेत. बजाज आणि केटीएमला मागे टाकत टीव्हीएस रोनिन २२५ ने बाजी मारली आहे. या सेगमेंटमध्ये एकूण विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ७२.०३ टक्के वाढ झाली आहे.
भारतीय टू-व्हीलर मार्केटमध्ये २०५ सीसी ते ३४० सीसी मोटरसायकल सेगमेंटचे ऑगस्ट महिन्याचे सेल्स आकडे समोर आले आहेत. या सेगमेंटमध्ये टीव्हीएस, बजाज, केटीएम, सुझुकी, हिरो, कावासाकी आणि यामाहा यांसारख्या कंपन्यांमध्ये तगडी स्पर्धा असते. ताज्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये टीव्हीएस रोनिन २२५ (TVS Ronin 225) ही सर्वात जास्त विकली जाणारी बाईक ठरली आहे. गेल्या महिन्यात रोनिनच्या ११,६७९ युनिट्सची विक्री झाली. बजाज पल्सर २२०/२५०, केटीएम २५० आणि बजाज अव्हेंजर २२० सारख्या मॉडेल्सला मागे टाकत रोनिनने पहिला क्रमांक पटकावला आहे.
रोनिनच्या विक्रीत मोठी वाढ
ऑगस्ट २०२५ मध्ये टीव्हीएस रोनिन २२५ च्या ६,६२३ युनिट्सची विक्री झाली होती. ऑगस्ट २०२६ मध्ये हा आकडा ११,६७९ युनिट्सवर पोहोचला. म्हणजेच एका वर्षात ५,०५६ जास्त गाड्या विकल्या गेल्या. याचा वार्षिक ग्रोथ रेट ७६.३४% इतका आहे. या सेगमेंटच्या एकूण विक्रीत रोनिनचा मार्केट शेअर ३९.४८% झाला आहे. तर ७,१७९ युनिट्सच्या विक्रीसह बजाज पल्सर २२०/२५० दुसऱ्या स्थानावर आहे.
केटीएम आणि अव्हेंजरलाही फायदा
केटीएम २५० ने ऑगस्टमध्ये ४,४७१ युनिट्सची विक्री केली. ऑगस्ट २०२५ मध्ये हा आकडा २,०५६ युनिट्स होता. यात २,४१५ युनिट्सची वाढ झाली असून वार्षिक ग्रोथ ११७.४६% आहे. बजाज अव्हेंजर २२० च्या ऑगस्टमध्ये २,१२७ युनिट्स विकल्या गेल्या. गेल्या वर्षी याच काळात फक्त ३९५ गाड्या विकल्या गेल्या होत्या. १,७३२ युनिट्सच्या वाढीसह या मॉडेलने ४३८.४८% ची जबरदस्त वार्षिक वाढ नोंदवली आहे.
अपाचे आणि व्ही-स्ट्रॉम २५० ची मुसंडी
टीव्हीएस अपाचे ३१०/आरटीएक्स ने ऑगस्टमध्ये १,९२५ युनिट्सची विक्री केली. ऑगस्ट २०२५ मध्ये हा आकडा ८८४ होता. १,०४१ युनिट्सच्या वाढीसह वार्षिक ग्रोथ ११७.७६% झाली आहे. सुझुकी व्ही-स्ट्रॉम २५० हे आणखी एक लक्षवेधी मॉडेल ठरलं. ऑगस्ट २०२५ मधील १०१ युनिट्सवरून ऑगस्ट २०२६ मध्ये याची विक्री १,०१२ युनिट्सवर गेली. ९११ युनिट्सच्या वाढीसह याने तब्बल ९०१.९८% ची वार्षिक वाढ नोंदवली आहे.
डोमिनारच्या विक्रीत घट
बजाज डोमिनार २५० च्या विक्रीत मात्र घट पाहायला मिळाली. ऑगस्ट २०२५ मध्ये ६२५ युनिट्स विकल्या गेल्या होत्या, तर ऑगस्ट २०२६ मध्ये फक्त ५४१ युनिट्स विकल्या गेल्या. ही ८४ युनिट्सची घट असून वार्षिक ग्रोथ -१३.४४% आहे. दुसरीकडे हिरो एक्स्ट्रीम २५०आर च्या ३८५ युनिट्स विकल्या गेल्या. गेल्या वर्षीच्या ३२३ युनिट्सच्या तुलनेत यात ६२ युनिट्सची वाढ झाली असून वार्षिक ग्रोथ १९.२०% आहे.
इतर मॉडेल्सची स्थिती
कावासाकी ३०० ने ऑगस्टमध्ये १५१ युनिट्सची विक्री केली. गेल्या वर्षीच्या ११० युनिट्सच्या तुलनेत ही ४१ युनिट्सची वाढ असून वार्षिक ग्रोथ ३७.२७% आहे. सुझुकी जिक्सर २५० च्या ५९ युनिट्स आणि हस्कवर्ना २५० च्या ४३ युनिट्स विकल्या गेल्या. या मॉडेल्सनी अनुक्रमे २६८.७५% आणि ३८.७१% ची वार्षिक वाढ नोंदवली. कावासाकी केएलएक्स २३० ची विक्री २९ वरून ५ युनिट्सवर घसरली. हिरो करिझ्मा २१० ची विक्री २४ वरून ४ युनिट्सवर, तर यामाहा आर३ ची विक्री ४ वरून १ युनिटवर आली आहे.
सेगमेंटमध्ये एकूण २९,५८२ युनिट्सची विक्री
२०५ सीसी ते ३४० सीसी मोटरसायकल सेगमेंटमध्ये ऑगस्ट २०२५ मध्ये एकूण १७,१९६ युनिट्सची विक्री झाली होती. ऑगस्ट २०२६ मध्ये हा आकडा २९,५८२ युनिट्सवर पोहोचला. यात १२,३८६ युनिट्सची वाढ झाली असून या सेगमेंटची एकूण वार्षिक वाढ ७२.०३% इतकी राहिली आहे.
