Bye Bye Skype, ५ मेपासून बंद, टीम्स फ्री घेणार जागा, असा करा तुमचा डेटा ट्रान्सफर
व्हिडिओ कॉल म्हणजे स्काईप कॉल अशी ओळख असलेल्या स्काईपची सेवा आता बंद होत आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने ही बातमी स्वतःच दिली आहे. यामागची कारणे जाणून घेऊया.

दोन दशकांहून अधिक काळ जगभरातील लोकांना व्हिडिओ कॉलद्वारे जोडणाऱ्या स्काईप प्लॅटफॉर्मची सेवा अधिकृतपणे बंद होत आहे. ५ मे २०२५ पासून स्काईप उपलब्ध राहणार नाही, असे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे. यामुळे डिजिटल संपर्कातील एका युगाचा अंत होत आहे. या निर्णयामुळे मोफत आणि सशुल्क वापरकर्त्यांना त्रास होणार आहे. मात्र, स्काईप फॉर बिझनेस सुरूच राहणार आहे.
स्काईपची सेवा का बंद होत आहे?
वापरकर्त्यांना नवीन 'टीम्स फ्री' प्लॅटफॉर्मवर स्थलांतरित करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट स्काईपची सेवा टप्प्याटप्प्याने बंद करत आहे. 'टीम्स फ्री'द्वारे व्हिडिओ, व्हॉइस कॉल, मेसेजिंग, फाइल शेअरिंगसारखी प्रमुख कामे करता येतील. वापरकर्त्यांना चांगल्या सहकार्यासाठी 'टीम्स फ्री'द्वारे नवीन सुविधाही दिल्या जातील.
तुमचे स्काईप अकाउंट आणि डेटाचे काय होईल?
स्काईपच्या जागी येणाऱ्या 'टीम्स फ्री'साठी वापरकर्त्यांना नवीन अकाउंट तयार करण्याची गरज नाही. स्काईप अकाउंटधारकांना 'टीम्स फ्री'मध्ये प्रवेश मिळेल. तुमच्या स्काईप लॉगिन माहितीचा वापर करून तुम्ही 'टीम्स फ्री'मध्ये लॉगिन करू शकता. तुमचे चॅट्स आणि कॉन्टॅक्ट लिस्ट 'टीम्स फ्री'मध्ये दिसेल.
स्काईप कधीपर्यंत वापरता येईल?
५ मे २०२५ पर्यंत स्काईप सेवा उपलब्ध असेल. वापरकर्त्यांना स्थलांतर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. या काळात स्काईप आणि 'टीम्स फ्री' दोन्ही वापरता येतील. 'टीम्स फ्री'मध्ये लॉगिन केल्याने स्काईपचा प्रवेश रद्द होणार नाही.
'टीम्स फ्री'मध्ये हे उपलब्ध नसेल
स्काईपमधील बराचसा डेटा 'टीम्स फ्री'मध्ये स्थलांतरित होईल. पण काही चॅट्स आणि कंटेंट ट्रान्सफर होणार नाहीत. स्काईप आणि स्काईप फॉर बिझनेस दरम्यानचे चॅट्स, खाजगी संभाषणे, बॉट्स, कोपायलट कंटेंट ट्रान्सफर होणार नाहीत. 'टीम्स फ्री'मध्ये नवीन चॅट्स सुरू करावे लागतील. जर वापरकर्त्यांनी स्काईप डेटा ट्रान्सफर केला नाही तर जानेवारी २०२६ मध्ये तो कायमचा डिलीट केला जाईल.

