AI Chatbots सिग्नलच्या प्रेसिडेंट मेरिडिथ विटेकर यांनी AI चॅटबॉट्सना मित्र समजण्याविरोधात इशारा दिला आहे. या चॅटबॉट्सना भावना किंवा चेतना नसते आणि त्यांचं नियंत्रण पूर्णपणे कंपन्यांच्या हातात असतं, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

AI Chatbots आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चॅटबॉट्सचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना, त्यांना आपले खरे मित्र किंवा विश्वासू सोबती समजू नका, असा इशारा प्रायव्हसी-केंद्रित मेसेजिंग ॲप 'सिग्नल'च्या प्रेसिडेंट मेरिडिथ विटेकर यांनी दिला आहे. चॅटजीपीटी (ChatGPT), जेमिनी (Gemini), आणि क्लॉड (Claude) सारखे चॅटबॉट्स माणसांशी मैत्रीपूर्ण वागतील अशा पद्धतीने डिझाइन केलेले असले, तरी त्यांना कोणत्याही भावना किंवा चेतना नसते, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

ब्लूमबर्गला दिलेल्या एका मुलाखतीत विटेकर यांनी ही चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “AI चॅटबॉट्स तुमचे मित्र नाहीत. त्यांना स्वतःची अशी चेतना किंवा स्वतंत्र विचार करण्याची क्षमता नसते. त्यांना दिलेल्या ट्रेनिंग डेटाच्या आधारावरच ते प्रतिसाद देतात.”

या AI चॅटबॉट्सचं संपूर्ण नियंत्रण त्यांना बनवणाऱ्या कंपन्यांच्या हातात असतं, याकडेही मेरिडिथ विटेकर यांनी लक्ष वेधलं. युझर्स अनेक गोष्टी विचारू शकतात किंवा शेअर करू शकतात, पण त्या माहितीचा वापर कसा करायचा याचा अंतिम निर्णय मात्र सेवा देणाऱ्या कंपनीचाच असतो, असं विटेकर यांनी सांगितलं.

अलीकडच्या काळात काही युझर्स AI चॅटबॉट्ससोबत भावनिकरित्या जोडले जात असल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळेच हा इशारा देण्यात आला आहे. याच वर्षी, आपल्या मैत्रीपूर्ण स्वभावासाठी ओळखला जाणारा GPT-4o मॉडेल बंद केल्यावर काही युझर्सनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

विटेकर यांनी सांगितलं की त्या स्वतःच्या कामासाठी AI वापरतात, पण जिथे खोलवर विचार करण्याची किंवा नवीन कल्पना विकसित करण्याची गरज असते, तिथे त्या चॅटबॉट्सवर अवलंबून राहत नाहीत. त्या म्हणतात, “एखादी कल्पना समजून घेण्यासाठी आणि ती विकसित करण्यासाठी लागणारी मानसिक मेहनत AI च्या तयार उत्तरांमुळे कमी होता कामा नये.”

यासोबतच, कंपन्या युझर्सच्या चॅट्सचा डेटा गोळा करून त्याचं विश्लेषण करू शकतात, असा धोकाही मेरिडिथ विटेकर यांनी वर्तवला आहे. यामुळे जाहिरातदारांच्या फायद्यानुसार उत्तरं बदलली जाण्याची शक्यता आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

AI असिस्टंट्सना बँक कार्ड, ब्राउझिंग हिस्ट्री, मेसेजेस, कॅलेंडर आणि पत्त्यासारख्या अनेक सेवांमध्ये सरसकट प्रवेश देण्याच्या कल्पनेवरही विटेकर यांनी जोरदार टीका केली. अशा प्रकारच्या सिस्टीममुळे आपली प्रायव्हसी आणि वैयक्तिक नियंत्रण धोक्यात येऊ शकतं, असा गंभीर इशारा मेरिडिथ विटेकर यांनी दिला आहे.