प्रत्येक कसोटी मालिकेपूर्वी संघाला चांगल्या तयारीची गरज आहे, असे कसोटी कर्णदार शुभम गिलने निवडकर्ते आणि बीसीसीआय प्रतिनिधींसोबतच्या अनौपचारिक चर्चेत स्पष्ट केल्याचे समजते.
मुंबई: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलची आशा कायम ठेवण्यासाठी कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलने एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत झालेल्या पराभवामुळे भारताच्या WTC फायनलच्या आशांना मोठा धक्का बसला होता. यानंतर, प्रत्येक कसोटी मालिकेपूर्वी संघासाठी १५ दिवसांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याची मागणी गिलने बीसीसीआयकडे केली आहे, असे 'टाइम्स ऑफ इंडिया'ने म्हटले आहे.
प्रत्येक कसोटी मालिकेपूर्वी संघाला चांगल्या तयारीची गरज आहे, असे गिलने निवडकर्ते आणि बीसीसीआय प्रतिनिधींसोबतच्या अनौपचारिक चर्चेत स्पष्ट केल्याचे समजते. भारतीय संघ सतत सामने खेळत असल्याने, प्रत्येक कसोटी मालिकेपूर्वी १५ दिवसांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचा गिलचा प्रस्ताव कितपत व्यावहारिक ठरेल, याबाबत शंका आहे. गेल्या वर्षी आयपीएल संपल्यानंतर एका आठवड्याचीही विश्रांती न घेता भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी गेले होते.
त्याचप्रमाणे, २८ सप्टेंबरला आशिया कप संपल्यानंतर २ ऑक्टोबर रोजी भारताने गिलच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळली. आशिया कपमध्येही गिल भारताचा सलामीवीर आणि उपकर्णधार म्हणून खेळला होता. तसेच, वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका ८ नोव्हेंबरला संपल्यानंतर, संघ १४ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर बीसीसीआयने प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार शुभमन गिल आणि निवडकर्त्यांसोबत भारतीय संघाच्या कामगिरीचा आढावा घेतला होता. याच बैठकीत गिलने कसोटी मालिकेपूर्वी संघासाठी १५ दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचा प्रस्ताव ठेवला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवामुळे भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. WTC मध्ये आता उर्वरित नऊ कसोटी सामन्यांपैकी सात जिंकल्यासच भारताला पहिल्या दोन स्थानांमध्ये स्थान मिळवता येईल. यापैकी चार सामने श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध परदेशात आहेत, तर पाच सामने मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत, हे भारतासाठी मोठे आव्हान आहे.


