स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) बेसिक सेव्हिंग्ज डिपॉझिट (BSBD) खातेधारकांसाठी १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू केले आहेत. यानुसार, आता महिन्यातून फक्त चार वेळाच मोफत पैसे काढता येतील. त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर १५ रुपये आणि जीएसटी आकारला जाईल.
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या बेसिक सेव्हिंग्ज डिपॉझिट (BSBD) खातेधारकांसाठी सेवा शुल्कात काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. हे नवीन नियम १ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत.
पैसे काढण्याचे नवे नियम
या नवीन नियमांनुसार, BSBD खातेधारकांना आता महिन्यातून फक्त चार वेळाच मोफत पैसे काढता येणार आहेत. चार वेळेची मर्यादा संपल्यानंतर, प्रत्येक वेळी पैसे काढल्यावर १५ रुपये आणि त्यावर जीएसटी असं सर्व्हिस चार्ज लागेल. बँकेच्या शाखेतून, एटीएम, मायक्रो-एटीएम, AEPS आणि कॅश ॲट पीओएस (PoS) द्वारे पैसे काढण्यावरही हा नियम लागू असेल.
डिजिटल व्यवहार मात्र मोफतच
पैसे काढण्यावर नवीन नियम आले असले तरी, डिजिटल व्यवहारांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. UPI, IMPS, NEFT आणि RTGS द्वारे होणारे डिजिटल व्यवहार पूर्णपणे मोफत असतील, असं SBI ने स्पष्ट केलं आहे.
BSBD खात्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी
ज्यांचं दुसऱ्या कोणत्याही बँकेत BSBD खातं नाही, अशी कोणतीही व्यक्ती आवश्यक KYC कागदपत्रं देऊन SBI मध्ये हे खातं उघडू शकते. हे खातं वैयक्तिक किंवा जॉइंट (संयुक्त) असू शकतं. या खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही. तसेच, खात्यात जास्तीत जास्त किती रक्कम ठेवावी किंवा महिन्याला किती पैसे जमा करावेत, यावर कोणतीही मर्यादा नाही. तुमचं सध्याचं बचत खातं (Savings Account) सुद्धा तुम्ही BSBD खात्यात बदलू शकता. पण त्यासाठी तुमचं दुसऱ्या बँकेत असं खातं नाही, याची खात्री करावी लागेल.
