inspiring story : आपले रोजचे स्वच्छतेचे काम करत असताना, पद्मा यांना एक संशयास्पद बॅग दिसली. ती उघडल्यावर, सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली पाहून त्या थक्क झाल्या.
चेन्नई: रस्त्यावर सापडलेले 45 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने न डगमगता मालकाला परत करून एका सफाई कर्मचारी महिलेने आदर्श निर्माण केला आहे. चेन्नईतील टी नगरमधील मुप्पत्मन टेंपल स्ट्रीट येथील सफाई कर्मचारी पद्मा यांनी हे कौतुकास्पद काम केले आहे. रस्त्याच्या कडेला सापडलेली 45 तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग परत केल्याने पद्मा खऱ्या हिरो ठरल्या आहेत.
आपले रोजचे स्वच्छतेचे काम करत असताना, पद्मा यांना एक संशयास्पद बॅग दिसली. ती उघडल्यावर, सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली पाहून त्या थक्क झाल्या. कोणताही विचार न करता, त्यांनी ती बॅग थेट पाँडी बाजार पोलीस स्टेशनमध्ये नेऊन अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केली. पोलिसांनी दागिन्यांचे वजन आणि किंमत तपासली. त्यानंतर लगेचच त्यांनी बॅगेच्या मालकाचा शोध सुरू केला.
ही बॅग नंगनल्लूर येथील रहिवासी रमेश यांची असल्याचे आढळून आले. त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची बॅग हरवल्याची तक्रार आधीच दाखल केली होती. योग्य तपासणी आणि चौकशीनंतर पोलिसांनी दागिने त्यांना परत केले.
कोरोना काळात परत केले दीड लाख रुपये -
पद्मा यांच्या प्रामाणिकपणाचे अधिकारी आणि नागरिकांकडून खूप कौतुक होत आहे. कोविड-19 लॉकडाऊनच्या काळात त्यांचे पती सुब्रमणी यांना मरीना बीचजवळ 1.5 लाख रुपये सापडले होते, जे त्यांनी पोलिसांना परत केले होते. हे जोडपे दोन मुलांसह भाड्याच्या घरात राहते. पद्मा यांच्या या आदर्श कृतीबद्दल तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि कौतुक म्हणून एक लाख रुपयांचे बक्षीस दिले.


