रॉयल एनफिल्ड लवकरच भारतात नवीन हिमालयन 440 लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. ही बाईक हिमालयन 450 पेक्षा स्वस्त पर्याय म्हणून सादर केली जाईल.

मुंबई : रॉयल एनफिल्ड भारतात नवीन हिमालयन 440 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती समोर येत आहे. कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, पण सप्टेंबर 2026 पर्यंत हे नवीन मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. ही बाईक सध्याच्या रॉयल एनफिल्ड Scram 440 प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल आणि तिची जागा Scram 440 आणि हिमालयन 450 यांच्यामध्ये असेल.

यात असेल 443cc इंजिन

नवीन हिमालयन 440 मध्ये Scram 440 प्रमाणेच 443cc क्षमतेचं सिंगल-सिलेंडर, एअर-ऑइल कूल्ड इंजिन वापरलं जाण्याची शक्यता आहे. हे इंजिन सहा-स्पीड गिअरबॉक्ससह 25.4 PS पॉवर आणि 34 Nm टॉर्क निर्माण करतं. शहरातील रायडिंग, हायवे टूरिंग आणि हलक्या-फुलक्या ऑफ-रोडिंगसाठी हे इंजिन खास ट्यून केलं जाईल, जेणेकरून कमी RPM वर चांगला टॉर्क मिळेल.

ऑफ-रोडिंगसाठी उत्तम सेटअप

सस्पेन्शनसाठी, या बाईकमध्ये पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क आणि मागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेन्शन दिले जाण्याची अपेक्षा आहे. ब्रेकिंगसाठी दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक मिळतील. सुरक्षेसाठी ड्युअल-चॅनल ABS स्टँडर्ड असेल, पण ऑफ-रोडिंगसाठी मागच्या चाकाचा ABS बंद करण्याचा पर्यायही दिला जाईल, असं रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. खराब रस्ते आणि ऑफ-रोड ट्रॅकवर उत्तम स्थिरता मिळावी यासाठी कंपनी पुढच्या बाजूला 21-इंच आणि मागच्या बाजूला 17-इंचाचं चाक देणार आहे.

हिमालयन 450 प्रमाणेच, नवीन हिमालयन 440 च्या टॉप व्हेरियंटमध्ये TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि मॅप मिररिंग यांसारखी आधुनिक फीचर्स दिली जाऊ शकतात. मात्र, हिमालयन 450 च्या तुलनेत यात इलेक्ट्रॉनिक फीचर्स कमी असतील, असंही मानलं जात आहे.

काय असेल अपेक्षित किंमत?

रिपोर्ट्सनुसार, नवीन हिमालयन 440 ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 2.5 लाख रुपये असू शकते. यामुळे ज्यांना अ‍ॅडव्हेंचर बाईक हवी आहे, पण हिमालयन 450 थोडी महाग वाटते, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. रॉयल एनफिल्डचं मुख्य लक्ष्य पारंपरिक मेकॅनिकल सेटअप आणि दमदार लो-एंड परफॉर्मन्स पसंत करणाऱ्या रायडर्सवर आहे.

हिमालयन 750 वरही काम सुरू

दरम्यान, रॉयल एनफिल्ड एका अधिक शक्तिशाली हिमालयन 750 मॉडेलची चाचणीदेखील करत आहे. ही बाईक EICMA 2026 मोटर शोमध्ये जागतिक स्तरावर पदार्पण करेल अशी अपेक्षा आहे. या मॉडेलमध्ये नवीन 750cc पॅरलल-ट्विन एअर-ऑइल कूल्ड इंजिन असेल, जे सुमारे 55 PS पॉवर आणि 60 Nm टॉर्क निर्माण करेल, असं म्हटलं जातंय. यात क्रूझ कंट्रोल, मल्टिपल रायडिंग मोड्स, TFT डिस्प्ले आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी यांसारखी आधुनिक फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. मात्र, रॉयल एनफिल्डने अद्याप हिमालयन 440 किंवा हिमालयन 750 च्या लॉन्चची तारीख, किंमत किंवा फीचर्सबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही.