भारतातील टू-व्हीलर मार्केटमध्ये मोठा बदल दिसतोय. ग्राहक आता मायलेजवाल्या गाड्या सोडून प्रीमियम आणि पॉवरफुल बाइक्सकडे वळत आहेत. या बदलात रॉयल एनफिल्डचा मार्केट शेअर वाढलाय, तर बजाज ऑटोला मात्र फटका बसला आहे.
भारतात बाईक खरेदी करण्याचा ट्रेंड झपाट्याने बदलत आहे. आता भारतीय टू-व्हीलर मार्केट फक्त मायलेजपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. पूर्वी लोक परवडणाऱ्या आणि जास्त मायलेज देणाऱ्या मोटरसायकलला पसंती द्यायचे, पण आता ग्राहकांना अपग्रेड करायचं आहे. त्यामुळेच 125cc पेक्षा जास्त क्षमतेच्या बाईक्सची विक्री सातत्याने वाढत आहे. प्रीमियम सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा मोठी हालचाल दिसून येत आहे. आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या नऊ महिन्यांत, मिड-साईज ते मोठ्या मोटरसायकल सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्डने आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मिड-साईज ते मोठ्या मोटरसायकल सेगमेंटमध्ये स्पर्धा चांगलीच वाढली आहे. रॉयल एनफिल्डने या सेगमेंटमधला आपला मार्केट शेअर जवळपास 27% वरून तब्बल 32% पर्यंत वाढवला आहे. टीव्हीएस मोटर कंपनीचा वाटा 15% वरून सुमारे 19% झाला आहे. त्याच वेळी, बजाज ऑटोचा मार्केट शेअर मात्र 32% वरून घसरून जवळपास 22% वर आला आहे. यावरून स्पष्ट दिसतंय की ग्राहकांची आवड बदलत आहे आणि ते जास्त पॉवरफुल बाईक्सकडे वळत आहेत.
आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या 10 महिन्यांत, एकूण विक्रीमध्ये 125cc पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या बाईक्सचा वाटा जवळपास 26% होता. गेल्या पाच वर्षांतील हा सर्वाधिक आकडा आहे. एन्ट्री-लेव्हल बाईक्स (100-125cc) अजूनही बाजाराचा जवळपास 73% हिस्सा व्यापतात, पण 150cc ते 350cc च्या बाईक्स हळूहळू आपली जागा बनवत आहेत. गेल्या वर्षी हा वाटा (125cc+ बाईक्सचा) जवळपास 23% होता, जो आता सुमारे 25% झाला आहे.
या बदलामागे अनेक कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे टॅक्समध्ये मिळालेली सूट. गेल्या वर्षीच्या अखेरीस झालेल्या काही कर बदलांमुळे काही सेगमेंटमधील खर्च लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. शिवाय, बाईक्ससाठी कर्ज मिळणंही पूर्वीपेक्षा सोपं झालं आहे. कमी डाउन पेमेंट आणि सोपे EMI यामुळे ग्राहकांना अपग्रेड करण्याची संधी मिळाली आहे.
आर्थिक वर्ष 2025 मध्ये, 125cc पेक्षा जास्त क्षमतेच्या बाईक्सचा वाटा सुमारे 24.4% होता, आणि आता तो आणखी वाढला आहे. हे बाजारातील एका मोठ्या बदलाचे स्पष्ट संकेत आहेत. कम्युटर बाईक्स अजूनही विक्रीचा मोठा आधार आहेत, पण मिड-वेट आणि हाय-सीसी बाईक्सची मागणी वेगाने वाढत आहे. रिपोर्ट्सनुसार, येत्या काळात कंपन्या अधिक शक्तिशाली, जास्त फीचर्स असलेल्या आणि लाइफस्टाइलवर आधारित मोटरसायकल लाँच करण्यावर लक्ष केंद्रित करू शकतात.


