लैंगिक संबंधानंतर[ अनेक महिलांच्या योनीला खाज येते. अनेकजणी याकडे गंभीरपणे न पाहता दुर्लक्ष करतात. यामुळे समस्या कमी होण्याऐवजी वाढते. पण याची कारणं काय आहेत ? याबद्दल माहिती घेऊया…
लैंगिक संबंध नात्याला अधिक घट्ट करतात. संतती सुख, मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी सेक्स आवश्यक आहे. नियमित सेक्सचे अनेक फायदे आहेत, असं तज्ज्ञ नेहमी सांगतात. पण सेक्सनंतर काही महिलांच्या योनीमध्ये जळजळ, खाज होते. बहुतेक महिला ही गोष्ट गुप्त ठेवतात. त्या आपल्या जोडीदारालाही समस्या सांगत नाहीत. पण योनीला येणारी खाज कधीकधी लपवता येत नाही. सार्वजनिक ठिकाणी लाजिरवाणे वाटण्यासोबतच, खाज वाढल्यास वेदनाही होतात. सुरुवातीलाच उपचार घेतल्यास ही समस्या वाढण्यापासून रोखता येते. आज आम्ही तुम्हाला संभोगानंतर महिलांना होणाऱ्या खाजेची कारणे सांगणार आहोत.
संभोगानंतर (Intercourse) येणाऱ्या खाजेची (Itching) कारणे :
लॅटेक्स (Latex) ऍलर्जी : लॅटेक्स ऍलर्जीमुळेही योनीला खाज येऊ शकते. लॅटेक्स असलेले कंडोम वापरल्यानंतर अनेक महिलांना योनीला खाज येते. अशावेळी लॅटेक्स-फ्री कंडोम किंवा इतर पर्यायी पद्धतींचा वापर करावा. आधी तुमच्या समस्येचे कारण लॅटेक्स आहे का, हे तपासा आणि मग त्यावर उपाय शोधा.
योनीतील कोरडेपणा : अनेक महिलांना योनीतील कोरडेपणाची समस्या असते. सेक्सनंतर येणाऱ्या खाजेचे हे एक सामान्य कारण आहे. यामध्ये योनीची त्वचा पूर्णपणे कोरडी होते. योनीच्या भिंतींना मुलायम करण्यासाठी पुरेसे ल्युब्रिकंट तयार न झाल्यास असे होते. काही लोकांची त्वचा नैसर्गिकरित्या कोरडी असते, जसे की एक्झिमा. योनीची जास्त स्वच्छता, साबणाचा वापर हे देखील याला कारणीभूत ठरू शकते. कोरडी त्वचा असलेल्या महिलांना सेक्सनंतर खाज येणे सामान्य आहे.
घर्षण : सेक्समुळे योनीला त्रास होऊ शकतो. ल्युब्रिकंटच्या कमतरतेमुळे खाजेचा धोका वाढतो. रजोनिवृत्तीच्या काळात योनीतील ल्युब्रिकंटचे उत्पादन कमी होते. तेव्हा ही समस्या वाढते. तुम्ही बाजारात मिळणारे ल्युब्रिकंट वापरू शकता. पण त्यामुळेही ऍलर्जी होण्याची शक्यता असते, त्यामुळे तपासूनच वापरा.
बॅक्टेरियल व्हजायनोसिस : योनीमध्ये हानिकारक बॅक्टेरियाच्या वाढीमुळे बॅक्टेरियल व्हजायनोसिस होऊ शकतो. यामुळे खाज आणि दुर्गंधी येते. असुरक्षित लैंगिक संबंध हे याचे मुख्य कारण आहे. कंडोमशिवाय लैंगिक संबंध ठेवल्यास बॅक्टेरिया वाढण्याचा धोका जास्त असतो.
वीर्य ऍलर्जी : अनेक महिलांच्या योनीला खाज येण्याचे हे देखील एक कारण आहे. वीर्यातील प्रोटीनमुळे शरीराच्या कोणत्याही भागावर ऍलर्जीची समस्या निर्माण होऊ शकते. वीर्याच्या संपर्कात येणाऱ्या अवयवांमध्ये योनी, त्वचा आणि तोंडाचा समावेश आहे. शारीरिक संबंधानंतर 10 ते 30 मिनिटांत याची लक्षणे दिसू लागतात. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी, तुम्ही संभोगानंतर स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. कोमट पाण्याने आंघोळ करावी. भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.


