हवेतील सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साईडसारखे वायू डोळ्यांतील अश्रूंचा थर नष्ट करतात. यामुळे डोळ्यांची जळजळ, सतत पाणी येणे आणि डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसतात. यापासून डोळ्यांचे संरक्षण कसे करावे, याचे काही उपाय जाणून घ्या.

दिवसागणिक वाढत असलेली वाहनांची संख्या तसेच ठिकठिकाणी सुरू असलेली पायाभूत सुविधांची कामे यामुळे हवेतील प्रदूषणाची पातळी दररोज वाढतच आहे. परिणामी, अनेकांच्या बाबतीती आरोग्याच्या कुरबुरी सुरू झाल्या आहेत. विविध श्वसनविकारांचा धोकाही वाढला आहे. याशिवाय, डोळ्यांवरही या वायू प्रदूषणाचा विपरित परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. डोळे शुष्क होत चालले आहेत. त्यामुळे आपणच खबरदारी घेण्याची गरज आहे. मात्र, गंभीर त्रास जाणवत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. 

प्रदूषणामुळे अश्रूंची निर्मिती कमी होत आहे, ज्यामुळे डोळ्यांच्या नुकसान होण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. घराबाहेर पडताना मास्क आणि चष्मा घाला, भरपूर पाणी प्या, ओमेगा-3 युक्त पदार्थ खा, स्क्रीन टाइम कमी करा आणि डोळे चोळणे टाळा. काही समस्या असल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या, कारण धुळीचे कण आणि रासायनिक पदार्थ डोळ्यांमध्ये जळजळ, कोरडेपणा, लालसरपणा आणि ॲलर्जी निर्माण करू शकतात, ज्यामुळे दीर्घकाळात दृष्टीला हानी पोहोचू शकते.

प्रदूषणामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या समस्या

कोरडेपणा आणि जळजळ : हवेतील धुळीचे कण आणि प्रदूषणामुळे डोळ्यांतील अश्रूंचा नैसर्गिक थर कमकुवत होतो, ज्यामुळे डोळे कोरडे होतात आणि जळजळ करतात.

लालसरपणा आणि पाणी येणे : प्रदूषण थेट डोळ्यांच्या कंजंक्टिव्हाला (conjunctiva) उत्तेजित करतात, ज्यामुळे डोळे लाल होतात आणि त्यातून पाणी येऊ लागते.

ॲलर्जिक कंजंक्टिवायटिस : धूळ आणि ॲलर्जी निर्माण करणारे घटक डोळ्यांच्या ॲलर्जीचे कारण बनतात, ज्यामुळे खाज आणि सूज येते.

संसर्गाचा धोका : प्रदूषणामुळे डोळ्यांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते, विशेषतः कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांसाठी.

दीर्घकालीन नुकसान : दीर्घकाळ प्रदूषणामुळे डोळ्यांचा पडदा (रेटिना) खराब होऊ शकतो आणि डोळ्यांचे इतर आजार होऊ शकतात.

काळजी घेण्यासाठी काय कराल?

घराबाहेर पडताना संरक्षणाच्या उपाययोजना करा.

चष्म्याचा वापर : धूळ आणि प्रदूषणापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी साधा चष्मा किंवा सनग्लासेस वापरा (कॉन्टॅक्ट लेन्स टाळा).

मास्कचा वापर : चेहरा झाकण्यासाठी मास्क वापरा, ज्यामुळे डोळ्यांनाही काही प्रमाणात संरक्षण मिळेल.

शक्यतो घरातच राहा : जेव्हा हवेतील प्रदूषणाची पातळी खूप जास्त असते, तेव्हा घराबाहेर जाणे टाळा, विशेषतः सकाळी.

डोळ्यांची काळजी

हात धुणे आणि डोळ्यांना स्पर्श न करणे : वारंवार हात धुवा आणि डोळ्यांना स्पर्श करणे टाळा.

डोळे चोळणे टाळा : डोळ्यांमध्ये अस्वस्थता जाणवल्यास ते चोळू नका, यामुळे नुकसान होऊ शकते.

आय ड्रॉप्स : डॉक्टरांच्या सल्ल्याने ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप्स वापरू शकता.

जीवनशैलीत बदल

पुरेसे पाणी प्या : शरीर हायड्रेटेड ठेवल्याने अश्रूंच्या निर्मितीस मदत होते.

आरोग्यदायी आहार : ओमेगा-3 फॅटी ॲसिड, हिरव्या पालेभाज्या, बदाम, मासे इत्यादी डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत.

स्क्रीन टाइम कमी करणे : मोबाईल, लॅपटॉपचा वापर कमी करून डोळ्यांना विश्रांती द्या.

स्वच्छता : घरातील वातावरण स्वच्छ ठेवा आणि एअर प्युरिफायरचा वापर करा.

डॉक्टरांचा सल्ला : डोळ्यांमध्ये जळजळ, वेदना, अंधुक दिसणे किंवा इतर कोणतीही समस्या कायम राहिल्यास, उशीर न करता नेत्रतज्ज्ञांशी संपर्क साधा.