- Home
- Utility News
- PM Kisan Yojana: पीएम किसानवर मोठा निर्णय! पैसे वाढले का? २२वा हप्ता कधी येणार? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट
PM Kisan Yojana: पीएम किसानवर मोठा निर्णय! पैसे वाढले का? २२वा हप्ता कधी येणार? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट
PM Kisan Yojana: २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने पीएम किसान योजनेसाठी निधी कायम ठेवला असून, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वार्षिक ६,००० रुपयांच्या मदतीत कोणतीही वाढ केलेली नाही. यामुळे शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली.

PM Kisan लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! पैसे वाढणार की नाही?
PM Kisan Yojana : केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२६–२७ च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेसाठी ६३,५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. मात्र ही तरतूद मागील वर्षाइतकीच असल्याने, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वार्षिक आर्थिक मदतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील वर्षातही शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयेच मिळणार आहेत.
पीएम किसान योजनेचा थोडक्यात आढावा
२०१९ साली सुरू झालेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र जमीनधारक शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत दरवर्षी ६,००० रुपये तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी २,००० रुपये थेट बँक खात्यात जमा होतात. शेतीपूर्व खर्चासाठी शेतकऱ्यांना किमान आर्थिक आधार मिळावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
२२ वा हप्ता कधी जमा होणार?
पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानुसार, २२ वा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. मागील वर्षीही याच कालावधीत हप्ता वितरित करण्यात आला होता, त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांना त्याच धर्तीवर पैसे मिळतील, अशी अपेक्षा आहे.
अर्थसंकल्पावर शेतकऱ्यांची नाराजी
२०२६–२७ च्या अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेतील रकमेत वाढ न केल्याने शेतकरी संघटनांमध्ये असंतोष पसरला आहे. वाढती महागाई आणि शेतीवरील खर्च पाहता ६,००० रुपयांची वार्षिक मदत अपुरी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी आणि इंधन दरात झालेली वाढ लक्षात घेता, ही रक्कम प्रत्यक्ष गरजांसाठी तोकडी पडत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
मदत वाढवण्याची मागणी पुन्हा दुर्लक्षित
डिसेंबरमध्ये झालेल्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत अनेक शेतकरी संघटना व कृषी तज्ज्ञांनी पीएम किसान योजनेतील मदत किमान ९,००० ते १२,००० रुपये करण्याची मागणी केली होती. मात्र सरकारने या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे. यामुळे ग्रामीण भागात सरकारविरोधात नाराजी वाढताना दिसत आहे.
आतापर्यंत किती शेतकऱ्यांना लाभ?
सध्या देशभरात सुमारे १० कोटी शेतकरी कुटुंबे पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत केंद्र सरकारने ३.७० लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. आत्तापर्यंत या योजनेचे एकूण २१ हप्ते जारी झाले आहेत.

