PM Kisan Update : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना! आधार कार्ड आणि पीएम किसान पोर्टलवरील नावात फरक असल्यास २० वा हप्ता अडकू शकतो. ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने नाव दुरुस्त करा.

मुंबई: तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे (PM Kisan Scheme) लाभार्थी असाल आणि तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि पीएम किसान पोर्टलवर नोंदवलेले नाव यामध्ये फरक असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. या नावातील विसंगतीमुळे तुमचा २० वा हप्ता अडकू शकतो!

२० वा हप्ता कधी येणार?

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता जून महिन्यात मिळण्याची अपेक्षा होती, मात्र अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता जारी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे, तुमच्या नावातील चूक तातडीने दुरुस्त करून घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तुमचा हप्ता थांबू शकतो.

नावातील चूक दुरुस्त करण्याची सोपी पद्धत, आता घरबसल्याही शक्य!

जर तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि पीएम किसानमधील नाव वेगळे असेल, तर तुम्ही हे काम घरी बसून ऑनलाइन किंवा जवळच्या केंद्रात जाऊन ऑफलाईन पद्धतीने दुरुस्त करू शकता.

ऑनलाइन पद्धत

सर्वात आधी https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा.

'शेतकरी कॉर्नर' विभागातील 'स्वयं-नोंदणीकृत शेतकऱ्याचे अपडेट' या पर्यायावर क्लिक करा.

तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरून पुढे जा.

त्यानंतर आधारवर असलेले योग्य नाव निवडा.

नाव अपडेट करून सबमिट करा.

ऑफलाइन पद्धत

जर तुम्हाला ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) किंवा कृषी विभाग कार्यालयात जाऊ शकता. यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे सोबत ठेवावी लागतील:

आधार कार्ड

जमीन नोंदीची प्रत (७/१२ उतारा)

बँक पासबुक

किसान आयडी (असल्यास)

केंद्रातील कर्मचारी तुमचे नाव योग्यरित्या दुरुस्त करण्यात तुम्हाला मदत करतील.

महत्त्वाचे!

नावातील विसंगती दूर न केल्यास तुमचे पेमेंट रोखले जाऊ शकते. दुरुस्ती झाल्यानंतर पोर्टलवर तुमची स्थिती तपासायला विसरू नका. अधिक मदतीसाठी तुम्ही पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक १५५२६१ किंवा ०११-२४३००६०६ वर संपर्क साधू शकता.