चिनी कंपनी ओप्पोने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Oppo K14 5G लाँच केला आहे. 7,000mAh ची मोठी बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर ही याची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
नवी दिल्ली: स्मार्टफोन बनवणाऱ्या चिनी कंपनी ओप्पोने (Oppo) भारतात एक नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. Oppo K14 5G असं या मॉडेलचं नाव असून, हा K14 सीरिजमधला दुसरा फोन आहे. दमदार बॅटरी, उत्तम कॅमेरा आणि जबरदस्त परफॉर्मन्समुळे हा फोन बाजारात धुमाकूळ घालू शकतो, असा अंदाज आहे. यात 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे, ज्यामुळे एकदा चार्ज केल्यावर तासन्तास व्हिडिओ पाहता येतील किंवा नॅव्हिगेशन वापरता येईल, असा कंपनीचा दावा आहे.
Oppo K14 5G: किंमत आणि ऑफर्स
Oppo K14 5G ची भारतातील सुरुवातीची किंमत 17,999 रुपये आहे. या किमतीत 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेले मॉडेल मिळेल. 6GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे, तर 8GB + 256GB या हाय-एंड मॉडेलसाठी 21,999 रुपये मोजावे लागतील. HDFC, ICICI आणि SBI बँक कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना 1,000 रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट मिळेल, असंही कंपनीने सांगितलं आहे. हा फोन 20 मार्चपासून फ्लिपकार्ट आणि ओप्पोच्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. Oppo K14 5G फोन आयसी ब्लू, प्रिझम व्हायलेट आणि प्रिझम व्हाइट या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल.
हा स्मार्टफोन अँड्रॉइड 15 वर आधारित कलरओएस 15 (ColorOS 15) वर चालतो. यात 6.75-इंचाचा मोठा डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,125 निट्सपर्यंत ब्राईटनेस देतो. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी याला IP66, IP68 आणि IP69 रेटिंग मिळाल्या आहेत.
Oppo K14 5G: प्रोसेसर, कॅमेरा आणि बॅटरी
Oppo K14 5G फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 (MediaTek Dimensity 6300) प्रोसेसर वापरण्यात आला आहे. यामुळे फोनचा परफॉर्मन्स दमदार राहतो आणि ॲप्स वेगाने काम करतात. हा प्रोसेसर आधीच्या मॉडेल्सपेक्षा 15 टक्के जास्त चांगला परफॉर्मन्स आणि 20 टक्के वेगाने ॲप्स लोड करतो, असा कंपनीचा दावा आहे. कॅमेराबद्दल बोलायचं झाल्यास, यात 50-मेगापिक्सलचा एआय प्रायमरी कॅमेरा आणि 2MP मोनोक्रोम सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्ससाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. AI रिकम्पोज, AI परफेक्ट शॉट आणि AI इरेझर 2.0 सारखे फीचर्स फोटोंना अधिक आकर्षक बनवतात. 7,000mAh क्षमतेची बॅटरी हे या फोनचं सर्वात मोठं आकर्षण आहे.


