तुम्ही ऑनलाईन नवीन मोबाईल किंवा लॅपटॉप ऑर्डर केलाय का? बॉक्स उघडण्यापूर्वी ही 3 महत्त्वाची कामं करायला विसरू नका. अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. रिटर्न, रिफंड आणि रिप्लेसमेंटच्या त्रासापासून वाचण्यासाठी या टिप्स तुम्हाला नक्की मदत करतील.

मुंबई : आजकाल नवीन स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा इतर कोणतेही गॅजेट्स विकत घेण्यासाठी दुकानात जाण्याची गरज उरलेली नाही. घरबसल्या ऑनलाईन ऑर्डर केली की काही दिवसांतच वस्तू थेट घरी येते. पण डिलिव्हरी मिळाल्यानंतर अनेकदा काही अनपेक्षित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उदाहरणार्थ, बॉक्समध्ये खराब फोन असणं, स्क्रीन तुटलेली असणं किंवा ऑर्डर केलेल्या वस्तूऐवजी भलतीच वस्तू येणं.

मोबाईल अनबॉक्स करण्यापूर्वी हे नक्की करा

अशा वेळी जेव्हा ग्राहक रिटर्न किंवा रिप्लेसमेंटसाठी तक्रार करतात, तेव्हा कंपन्या पुरावा मागतात. त्यामुळे नवीन गॅजेट हातात पडल्यावर लगेच आनंदाच्या भरात बॉक्स उघडण्याची किंवा वापरण्याची घाई करू नका. त्याऐवजी, अनबॉक्सिंग व्हिडीओ (Unboxing Video) बनवताना या 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे जर रिटर्न किंवा रिफंडची वेळ आली, तर हाच व्हिडीओ तुमच्यासाठी महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.

पॅकेट, शिपिंग लेबल आणि कंपनीचं सील दाखवा

नवीन फोन किंवा लॅपटॉप डिलिव्हर झाल्यावर लगेच बॉक्स उघडण्याची घाई करू नका. सर्वात आधी कुरिअर पॅकेट कॅमेऱ्यात दाखवून अनबॉक्सिंग व्हिडीओ सुरू करा. पॅकेटच्या चारही बाजू आणि कोपरे व्यवस्थित रेकॉर्ड करा. यामुळे डिलिव्हरीच्या वेळी पॅकेट कुठे फाटलेलं किंवा खराब झालेलं तर नाही ना, हे समजायला मदत होईल. त्यानंतर पॅकेटवर असलेलं शिपिंग लेबल कॅमेऱ्यासमोर दाखवा. त्यात तुमचं नाव, ऑर्डर आयडी आणि ट्रॅकिंग नंबर स्पष्ट दिसेल याची खात्री करा. पॅकेटमधून मोबाईल किंवा लॅपटॉपचा बॉक्स बाहेर काढल्यावर त्यावर असलेलं ब्रँड सीलही व्हिडीओमध्ये रेकॉर्ड करा. याशिवाय, बॉक्सच्या मागील बाजूस दिलेला IMEI नंबर किंवा सिरीयल नंबरही रेकॉर्ड करा. जर कंपनीचं सील आधीच फाटलेलं असेल किंवा बॉक्स उघडलेल्या स्थितीत असेल, तर तेही व्हिडीओमध्ये दाखवणं खूप गरजेचं आहे.

डिव्हाईस सुरू करण्यापूर्वी पूर्णपणे तपासा

नवीन फोन किंवा लॅपटॉप पाहिल्यानंतर अनेक जण तो लगेच सुरू करण्याचा प्रयत्न करतात. पण त्याआधी डिव्हाईस पूर्णपणे तपासून घेणं आवश्यक आहे. बॉक्स उघडल्यानंतर सर्वात आधी डिव्हाईसची स्क्रीन, बाहेरील भाग, कॅमेरा लेन्स आणि चार्जिंग पोर्ट्स बारकाईने तपासा. डिलिव्हरीच्या वेळी वस्तूंवर दाब आल्यास स्क्रीनला तडे जाऊ शकतात किंवा बाहेरील भागावर ओरखडे येऊ शकतात.

अशी कोणतीही समस्या आढळल्यास ती व्हिडीओमध्ये स्पष्टपणे रेकॉर्ड करा. त्यानंतर बॉक्समधील चार्जर, केबल आणि इतर ॲक्सेसरीज एक-एक करून बाहेर काढा आणि कॅमेऱ्यात दाखवा. काही वेळा बॉक्समधील काही वस्तू गायब असू शकतात किंवा मूळ ॲक्सेसरीजऐवजी दुसऱ्याच वस्तू ठेवलेल्या असू शकतात. त्यामुळे बॉक्समध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत, हे एक-एक करून रेकॉर्ड करणं केव्हाही चांगलं. भविष्यात रिटर्न किंवा रिप्लेसमेंटसाठी तक्रार करावी लागल्यास हा व्हिडीओ तुम्हाला पुरावा म्हणून कामी येऊ शकतो.

अनबॉक्सिंग व्हिडीओ मध्येच थांबवू नका

अनबॉक्सिंग व्हिडीओ बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेकॉर्डिंग सलग सुरू असावं. व्हिडीओ मध्येच थांबवणं, एडिट करणं किंवा डिव्हाईस काही काळासाठी कॅमेऱ्याच्या बाहेर नेणं, यामुळे तुमच्या पुराव्याची विश्वासार्हता कमी होऊ शकते. त्यामुळे मोबाईल स्टँडवर ठेवून व्हिडीओ बनवा किंवा दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्या. डिव्हाईसची प्राथमिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर कॅमेऱ्यासमोरच ते सुरू करा.

जर फोन सुरू झाला नाही, स्क्रीनवर हिरव्या किंवा पिवळ्या रेषा दिसल्या किंवा इतर कोणताही तांत्रिक दोष आढळला, तर तेही व्हिडीओमध्ये रेकॉर्ड करा. स्क्रीन पूर्णपणे सुरू होऊन होम स्क्रीन किंवा सेटअप पेज दिसेपर्यंत रेकॉर्डिंग सुरूच ठेवा.