MG Motor New Editions : एमजी मोटरने भारतात आपल्या M9 आणि सायबरस्टर या इलेक्ट्रिक गाड्यांचे खास 'कौचर एडिशन' लाँच केले आहे. प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्ता यांच्यासोबत मिळून हे मॉडेल तयार केले असून, याला 'सर्पेंट इन्फिनिटी' डिझाइन थीम दिली आहे. भारतात या लक्झरी गाड्यांची फक्त ५० युनिट्स विकली जाणार आहेत.

मुंबई : लक्झरी इलेक्ट्रिक गाड्यांच्या बाजारात एमजी मोटरने (MG Motor) खास धमाका केला आहे. कंपनीने आपल्या नवीन एमजी M9 कौचर एडिशन आणि सायबरस्टर कौचर एडिशन भारतात विक्रीसाठी आणल्या आहेत. या गाड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या जगातल्या प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्ता (Gaurav Gupta) यांच्यासोबत मिळून तयार केल्या आहेत. या गाड्या मर्यादित संख्येतच उपलब्ध असतील. एमजी M9 कौचर एडिशनची एक्स-शोरूम किंमत ८४.९४ लाख रुपये आहे, तर एमजी सायबरस्टर कौचर एडिशनची किंमत ८७.४९ लाख रुपये आहे. संपूर्ण भारतात या गाड्यांची फक्त ५० युनिट्स विकली जातील. या गाड्यांचे बुकिंग सुरू झाले आहे.

खास डिझाइनसह 'कौचर एडिशन'

एमजी M9 आणि सायबरस्टर कौचर एडिशनमध्ये गौरव गुप्ता यांची प्रसिद्ध 'सर्पेंट इन्फिनिटी' डिझाइन थीम वापरण्यात आली आहे. गाडीच्या बाहेरील भागावर 'सर्पेंट इन्फिनिटी' लोगो आणि बॅज लावण्यात आले आहेत. एमजीच्या लोगोला सोनेरी रंगाची फिनिशिंग दिली आहे. गाडीच्या पुढच्या बाजूला असलेल्या एमजी लोगोभोवती नारंगी रंगाचे डिझाइन आणि दोन ब्रोच (Brooches) लावले आहेत. याशिवाय, 'सर्पेंट इन्फिनिटी' लोगो एम्ब्रॉयडरी केलेला टोनो कव्हर आणि डॅशबोर्डवर खास 'कौचर एडिशन' असे लिहिलेले आहे. या डिझाइनमधील बदलांशिवाय गाड्यांच्या तांत्रिक बाबींमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

एमजी M9 कौचर एडिशन : बॅटरी आणि परफॉर्मन्स

एमजी M9 कौचर एडिशनमध्ये ९० किलोवॅट-अवर (kWh) क्षमतेची बॅटरी आहे. यात एकच इलेक्ट्रिक मोटर असून ती पुढच्या चाकांना (Front-Wheel Drive) पॉवर देते. ही मोटर २४५ बीएचपीची ताकद आणि ३५० एनएमचा टॉर्क निर्माण करते. कंपनीचा दावा आहे की, एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही गाडी ५४८ किलोमीटरपर्यंतची एमआयडीसी (MIDC) सर्टिफाइड रेंज देते.

एमजी सायबरस्टर कौचर एडिशन

सायबरस्टर कौचर एडिशनमध्ये ७७ किलोवॅट-अवर (kWh) क्षमतेची बॅटरी आणि ड्युअल मोटर ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) सिस्टम आहे. ही इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार एकूण ५१० बीएचपीची ताकद आणि ७२५ एनएमचा टॉर्क निर्माण करते. विशेष म्हणजे, ही गाडी फक्त ३.२ सेकंदात ० ते १०० किलोमीटर प्रतितास वेग पकडते. कंपनीच्या मते, एका चार्जमध्ये ही गाडी ५८० किलोमीटरपर्यंतची एमआयडीसी रेंज देऊ शकते.

एमजी सिलेक्टची प्रतिक्रिया

एमजी सिलेक्टचे प्रमुख मिलिंद शाह म्हणाले, "एमजी सायबरस्टर आणि M9 या दोन्ही गाड्या त्यांच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक पसंतीच्या लक्झरी इलेक्ट्रिक गाड्या बनल्या आहेत. या 'कौचर एडिशन'च्या माध्यमातून आम्ही या लोकप्रियतेला आणखी खास आणि दुर्मिळ बनवत आहोत. लक्झरी गाड्यांच्या सेगमेंटमध्ये ग्राहकांना वेगळा अनुभव देणारा ब्रँड म्हणून एमजी सिलेक्ट पुढे येत आहे." मर्यादित उपलब्धता आणि खास डिझाइनमुळे या नवीन 'कौचर एडिशन' गाड्या लक्झरी इलेक्ट्रिक कार प्रेमींमध्ये नक्कीच चर्चेचा विषय ठरतील, अशी अपेक्षा आहे.