Mahindra XUV 3XO CNG : २४ किलोमीटर मायलेज, महिंद्राची नवी CNG SUV लाँच
Mahindra XUV 3XO CNG: महिंद्राने त्यांची बहुचर्चित XUV 3XO ही SUV आता CNG मध्ये लाँच केली आहे. या गाडीत २४.७० किमी/किलो मायलेज, शक्तिशाली टर्बो इंजिन आणि पॅनोरमिक सनरूफ सारखे भन्नाट फीचर्स मिळतात.

महिंद्रा XUV 3XO CNG
गाडीप्रेमींची प्रतीक्षा संपवत महिंद्राने त्यांची लोकप्रिय SUV 'XUV 3XO' चे नवीन CNG व्हेरिएंट भारतात लाँच केलं आहे. या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ९.९९ लाख रुपयांपासून सुरू होते. टाटा नेक्सॉन CNG (Tata Nexon CNG) आणि मारुती सुझुकी ब्रेझा CNG (Maruti Suzuki Brezza CNG) ला कडवी टक्कर देण्यासाठी ही गाडी बाजारात आली आहे. यात मिळणारं उत्तम मायलेज आणि टर्बो इंजिन या गाडीचं मुख्य आकर्षण आहे. भारतात पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक आणि आता CNG अशा चारही पॉवरट्रेन ऑप्शनमध्ये उपलब्ध असणारी XUV 3XO ही दुसरी गाडी ठरली आहे.

व्हेरिएंट्स आणि किंमत
ग्राहकांचं बजेट लक्षात घेऊन ही नवी CNG गाडी एकूण ४ व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आली आहे.
XUV 3XO CNG MX Edge (बेस मॉडेल) - ९,९९,००० रुपये.
XUV 3XO CNG RevX Edge (O) - १०,७९,००० रुपये.
XUV 3XO CNG AX5 - ११,१९,००० रुपये.
XUV 3XO CNG RevX A (टॉप मॉडेल) - १२,२७,००० रुपये.
२४.७० किमी मायलेज आणि टर्बो इंजिन
बाजारातील इतर CNG गाड्यांमध्ये सामान्यत: नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिन असतं. मात्र महिंद्रा XUV 3XO CNG मध्ये कंपनीने शक्तिशाली १.२ लिटर टर्बो-पेट्रोल CNG इंजिन वापरलं आहे. CNG मोडवरही हे इंजिन 110 bhp पॉवर आणि 200 Nm टॉर्क जनरेट करतं. टर्बो इंजिनमुळे गाडीला फक्त ११.८ सेकंदात 0 ते १०० किलोमीटर प्रति तास वेग गाठता येतो. इंजिन दमदार असूनही एका किलो CNG मध्ये गाडी २४.७० किलोमीटरचं मायलेज देते. पेट्रोलच्या महागाईपासून बचाव करण्यासाठी, रोजच्या ऑफिस प्रवासासाठी किंवा लाँग ड्राईव्हसाठी ही एक आदर्श CNG गाडी आहे. यात नॉर्मल, कम्फर्ट आणि स्पोर्ट्स असे तीन स्टीयरिंग मोड्स देण्यात आले आहेत.
पॅनोरमिक सनरूफ आणि आधुनिक फीचर्स
बाहेरून ही गाडी रेग्युलर पेट्रोल XUV 3XO प्रमाणेच आकर्षक दिसते. गाडीच्या आत (Interior) प्रीमियम लेदरेट सीट्स आणि फ्रंट आर्मरेस्टमुळे तिला एकदम लक्झरी लूक मिळतो. यात १०.२५ इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, १०.२५ इंचांचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटण, हाईट ॲडजस्टेबल फ्रंट सीट बेल्ट, रियर वायपर आणि डॉल्बी ॲटमॉस (Dolby Atmos) ऑडिओ सिस्टीम यासारखे फीचर्स आहेत. विशेष म्हणजे, या बजेटमध्ये गाडीत मोठं पॅनोरमिक सनरूफ (Panoramic Sunroof) देण्यात आलं आहे.

