LPG Gas Cylinder Home Delivery : भारतात पहिल्यांदा १० मिनिटांत इन्स्टामार्टवरुन एलपीजी सिलेंडरची होम डिलिव्हरी मिळणार आहे. हिंदुस्तान पेट्रोलियमसोबत पार्टनरशिप करत ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

मुंबई : ऑनलाईन पद्धतीने आतापर्यंत आपण फूड, किराण सामान, घरातील घरगुती वस्तू, कपडे अगदी सगळंच ऑर्डर करतो. पण आता एलपीजी गॅस सिलेंडरचीही ऑनलाईन डिलिव्हरी होणार आहे. भारतात पहिल्यांदा क्विव कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन एलपीजी सिलेंडरची ऑन-डिमांड डिलिव्हरी सुरू झाली आहे.

भारतात पहिल्यांच एलपीजी गॅस सिलेंडर अशा ऑनलाईन पद्धतीन ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे. ही गॅसची डिलिव्हरी इन्स्टामार्ट या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन सुरू झाली आहे. इन्स्टामार्टने हिंदुस्तान पेट्रोलियमसह पार्टनरशिप करुन ही सेवा लाँच केली आहे. देशातील ही सर्वात पहिली क्विक कॉमर्स ऑनलाईन सेवा आहे, ज्याद्वारे ग्राहक एलपीजी सिलेंडर ऑर्डर करू शकतील.

१० किलोचा एचपीसीएल नव्या एलपीजी सिलेंडर आणि ५ किलोचा मेटर सिलेंडर इन्स्टामार्टद्वारे ऑर्डर करता येणार आहे. ही सेवा सध्या केवळ बेंगळुरूमध्ये सुरू करण्यात आली आहे. मात्र येणाऱ्या काही काळात इतर शहरांतही इन्स्टामार्टद्वारे सिलेंडर मागवता येतील.

एचपीसीएल नव्या एलपीजी सिलेंडर

एचपीसीएलचा नव्या एलपीजी हा सिलेंडर आपल्या साध्या सिलेंडरपेक्षा हलका आहे. या सिलेंडरला गंज पकडत नाही. त्याशिवाय या सिलेंडरची बॉडी पारदर्शक आहे. या पारदर्शक बॉडीमुळे आतमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे सहजपणे कळतं. हा सिलेंडर लहान कुटुंब, विद्यार्थांसाठी खास तयार करण्यात आला आहे. या सिलेंडरची डिलिव्हरी अधिकृत डिस्ट्रिब्यूटर आणि प्रशिक्षित कर्मचारी यांच्याद्वारे केली जाणार आहे.

या नव्या सिलेंडरमुळे तसंच नव्या ऑनलाइन डिलिव्हरी प्रक्रियेमुळे सिलेंडर खरेदी आणि संपलेला सिलेंडर पुन्हा रिफिल करण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल. हाच या उपक्रमाचा उद्देश असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.