जेवण, व्यायाम आणि झोप, हे सर्व व्यवस्थित असेल तरच आरोग्य चांगले राहते. यापैकी एकाही गोष्टीत गडबड झाली तर आजारपण येऊ शकते. त्यातही, जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत व्यसन करत वेळ घालवत असाल, तर आतापासूनच मृत्यूसाठी तयार रहा.
रात्री झोपेत कोणी उचलून नेलं तरी कळणार नाही... मला इतकी गाढ झोप लागते, असं म्हणणाऱ्यांपैकी तुम्ही असाल, तर ही बातमी ऐकून तुम्हाला आनंद होईल. पण ज्यांना रात्री झोपच येत नाही, त्यांना थोडी काळजी वाटणं साहजिक आहे. कारण झोपेचा संबंध आयुर्मानाशी आहे. जे लोक रात्री उशिरापर्यंत जागतात पण व्यसन करत नाहीत, त्यांना अकाली मृत्यूचा धोका नसतो. अकाली मृत्यूचे मुख्य कारण व्यसन असल्याचे या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. चांगल्या आरोग्यासाठी व्यसनांपासून दूर राहून वेळेवर झोपणे महत्त्वाचे आहे.
होय, जर तुम्हाला व्यवस्थित झोप (Sleep) येत नसेल, रात्री उशिरापर्यंत मोबाईल, टीव्ही बघत असाल, किंवा झोपेतून वारंवार जाग येत असेल, तर आजच ही सवय (Practice) सोडलेली बरी. रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या लोकांबद्दल अनेक अभ्यास झाले आहेत. जे लोक रात्री उशिरापर्यंत टीव्ही, मोबाईल बघत वेळ घालवतात, त्यांना झोप लागल्यावरही वारंवार जाग येते. रात्रीची झोप पूर्ण न झाल्यामुळे आरोग्यावर (Health) वाईट परिणाम होतो. पण एका अभ्यासातून मृत्यूविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. झोप आणि मृत्यू यांच्यातील संबंधाबद्दल अभ्यासात काय म्हटलं आहे, ते जाणून घेऊया.
रात्री जागणाऱ्यांचे आयुष्य कमी का होते? : रात्री वारंवार जाग येणे हे अकाली मृत्यूचे कारण बनू शकते. यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. रात्री वारंवार जागणाऱ्या लोकांचे आयुष्य कमी का होते, याचा शोध संशोधकांनी घेतला आहे. दिवसाच्या तुलनेत रात्री जागणारे लोक जास्त मद्यपान आणि धूम्रपान करतात, असे अभ्यासात म्हटले आहे. यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अभ्यासातील डेटा काय सांगतो? : या अभ्यासासाठी सुमारे 23,000 जुळ्या मुला-मुलींचा डेटा वापरण्यात आला. या जुळ्यांनी 1981 ते 2018 या काळात झालेल्या 'फिनिश ट्विन कोहोर्ट' अभ्यासात भाग घेतला होता. त्यापैकी 8,728 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची आकडेवारी धक्कादायक आहे. सकाळी लवकर उठणाऱ्यांच्या तुलनेत रात्री उशिरा झोपणाऱ्या लोकांचा लवकर मृत्यू होण्याची शक्यता 9 टक्क्यांनी जास्त असते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
उशिरा झोपणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी : अभ्यासात उशिरा झोपणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. अभ्यासानुसार, जे लोक मद्यपान किंवा धूम्रपान न करता रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, त्यांना अकाली मृत्यूचा धोका कमी असतो. याउलट, जे लोक मद्यपान करत रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, त्यांचा लवकर मृत्यू होतो, असे अभ्यासाच्या अहवालात म्हटले आहे. म्हणजेच, अकाली मृत्यूचे कारण व्यसन आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
फिनलँडची राजधानी हेलसिंकी येथे 'फिनिश इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ' आहे. तेथील क्रिस्टर हबलिन यांनी हा अभ्यास अहवाल दिला आहे. त्यांच्या मते, जे लोक तंबाखू आणि मद्य यांचे जास्त सेवन करून रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, त्यांनाच अकाली मृत्यूचा धोका जास्त असतो.
चांगल्या झोपेसाठी काय करावे? : अभ्यासात सांगितल्याप्रमाणे, मद्यपान आणि धूम्रपानापासून दूर राहणे खूप महत्त्वाचे आहे. ज्यांना रात्री शांत झोप हवी आहे, त्यांनी रात्री उशिरापर्यंत गॅझेट्स वापरणे टाळावे. रात्री 10 वाजेपर्यंत झोपण्याची सवय लावावी. सुरुवातीला हे कठीण वाटले तरी, आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले आहे, हे लक्षात घेऊन हा बदल करावा.


