JSW मोटर्सने भारतात त्यांच्या नव्या इलेक्ट्रिक SUV चं डिझाईन पेटंट मिळवलं आहे. चेरी आयकार V23 (Chery iCar V23) वर आधारित ही कार महिंद्रा थार रॉक्सला थेट टक्कर देईल. पॅनोरमिक सनरूफ आणि दोन बॅटरी ऑप्शन्ससह येणाऱ्या या कारची किंमत २० लाख रुपयांच्या आसपास असू शकते.
भारतीय इलेक्ट्रिक वाहन (EV) बाजारात JSW मोटर्स लवकरच आपली नवी SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. चेरी आयकार V23 (Chery iCar V23) वर आधारित या नव्या इलेक्ट्रिक SUV च्या डिझाईनला भारतात पेटंट मिळाल्याची माहिती समोर आली आहे. ही कार JSW मोटर्सच्या ब्रँडखाली बाजारात येण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध असलेल्या आयकार V23 शी ही नवी SUV बरीच मिळतीजुळती असेल. पण, भारतीय ग्राहकांची आवड लक्षात घेऊन याच्या डिझाईनमध्ये काही बदल केले जाऊ शकतात. लाँच झाल्यानंतर ही कार महिंद्रा थार रॉक्स (Mahindra Thar Roxx) आणि फोर्स गुरखा ५-डोअर (Force Gurkha 5-door) सारख्या ऑफ-रोड SUV ला थेट भिडेल.
बॉक्सी डिझाईन आणि राऊंड हेडलाईट्स
पेटंटच्या फोटोंमध्ये या नव्या SUV चं बॉक्सी आणि दणकट डिझाईन स्पष्टपणे दिसतंय. कारच्या पुढच्या बाजूला राऊंड LED हेडलाईट्स आणि DRLs देण्यात आले आहेत. याच्या क्लोज्ड ग्रिलचं डिझाईन आंतरराष्ट्रीय मॉडेलपेक्षा थोडं वेगळं आहे. फ्रंट बंपर मात्र जवळपास तसाच ठेवण्यात आलाय. साईड प्रोफाईलबद्दल बोलायचं तर, यात फ्लेर्ड व्हील आर्च आणि साईड स्टेप्स मिळतात. भारतीय व्हर्जनमध्ये नवीन अलॉय व्हील्स मिळण्याची शक्यता आहे. पेटंट फोटोंमध्ये C-पिलर आणि D-पिलरच्या मध्ये एका बंद भागात खास आयताकृती डिझाईन पाहायला मिळतंय, जे आंतरराष्ट्रीय मॉडेलमध्ये नाहीये.
पॅनोरमिक सनरूफची सुविधा
आंतरराष्ट्रीय आयकार V23 मध्ये नसलेलं आणखी एक फीचर भारतीय मॉडेलमध्ये मिळू शकतं. पेटंटच्या फोटोंमध्ये पॅनोरमिक सनरूफ स्पष्ट दिसत आहे. मागच्या बाजूला स्लिम LED टेललाईट्स आणि टेलगेटवर लावलेला स्टोरेज बॉक्स कायम राहील. एकूणच, या कारचं डिझाईन तिचा ऑफ-रोड लूक टिकवून ठेवणारं असेल.
५-सीटर केबिन
इंटेरियरच्या बाबतीतही ही कार आयकार V23 च्या पावलावर पाऊल ठेवेल अशी अपेक्षा आहे. ग्लोबल मॉडेलमध्ये मिनिमलिस्ट डॅशबोर्डसह ५-सीटर लेआउट मिळतो. यात पारंपारिक ड्रायव्हर डिस्प्लेऐवजी १५.४ इंचाच्या मोठ्या टचस्क्रीनवरच सगळी महत्त्वाची माहिती दिसते. ३-स्पोक स्टीयरिंग व्हील, रोटरी कंट्रोल्स आणि लेदरसारख्या सीट्स ग्लोबल मॉडेलमध्ये आहेत. भारतीय व्हर्जनमध्ये मात्र वेगळी केबिन थीम आणि नवीन सीट अपहोल्स्ट्री पाहायला मिळू शकते.
दोन बॅटरी ऑप्शन्स
आंतरराष्ट्रीय बाजारात आयकार V23 दोन बॅटरी ऑप्शन्ससह येते. यात ५९.९३kWh (59.93kWh) आणि ८१.७६kWh (81.76kWh) क्षमतेचे बॅटरी पॅक मिळतात. छोट्या बॅटरी व्हर्जनमध्ये रिअर मोटरसह रिअर-व्हील ड्राईव्ह (RWD) सिस्टीम मिळते. तर, मोठ्या बॅटरी व्हर्जनमध्ये ड्युअल-मोटर ऑल-व्हील ड्राईव्ह (AWD) सिस्टीम दिली आहे. मोठ्या बॅटरी व्हर्जनमधून २०८ hp पॉवर आणि २९२ Nm टॉर्क जनरेट होतो. भारतीय व्हर्जनमध्येही ड्युअल-मोटर ऑल-व्हील ड्राईव्ह सिस्टीम मिळण्याची दाट शक्यता आहे.
किंमत २० लाखांच्या घरात?
या नव्या इलेक्ट्रिक SUV बद्दल JSW मोटर्सने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण, रिपोर्ट्सनुसार भारतात ही कार एक इलेक्ट्रिक ऑफ-रोडिंग SUV म्हणून लाँच केली जाईल. या कारची एक्स-शोरूम किंमत साधारण २० लाख रुपयांच्या आसपास असू शकते. अर्थात, कंपनीने अद्याप याच्या फायनल किंमतीचा आणि लाँचिंगच्या तारखेचा खुलासा केलेला नाही.
