लाइफ जॅकेट घातल्याने तुमचा जीव वाचू शकतो, पण त्यासाठी काही नियम पाळणं गरजेचं आहे. नाहीतर पोहता येत नसलेल्यांसाठी लाइफ जॅकेट असूनही उपयोग होणार नाही, असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. जबलपूरच्या घटनेनंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

नवी दिल्ली: मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये नुकत्याच झालेल्या बोट दुर्घटनेतील एका दृश्याने संपूर्ण देश हळहळला. एका आईचा मृतदेह सापडला, जिने स्वतःच्या लाइफ जॅकेटमध्ये आपल्या मुलालाही घट्ट पकडून ठेवलं होतं. मुलाला वाचवण्याचा तिचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला. या घटनेवर आधारित अनेक AI फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण या घटनेमुळे एक महत्त्वाचा प्रश्न समोर आला आहे - लाइफ जॅकेट खरंच जीव कसं वाचवतं? अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या मते, लाइफ जॅकेट घातलं म्हणजे जीव वाचेलच असं नाही. ते योग्य पद्धतीने वापरणं अत्यंत गरजेचं आहे.

बोटिंग करताना प्रवास सुरू झाल्यापासून बोट किनाऱ्यावर परत येईपर्यंत लाइफ जॅकेट शरीरावर असलंच पाहिजे. प्रवासादरम्यान ते काढणं किंवा त्याचे पट्टे सैल ठेवणं धोकादायक ठरू शकतं. बोटीतील सर्व प्रवाशांसाठी एकाच मापाची जॅकेट्स नसतात. प्रत्येक व्यक्तीने आपल्या वजनानुसार योग्य जॅकेट निवडायला हवं. ही जॅकेट्स भारतीय मानक संस्थेच्या (IS) नियमांनुसार बनवलेली असतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या १०० किलो वजन पेलणाऱ्या जॅकेटला १२० किलो वजनाच्या व्यक्तीने घातलं, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही.

चुकीच्या मापाचं लाइफ जॅकेट ठरू शकतं जीवघेणं

हीच गोष्ट लहान मुलांच्या बाबतीतही लागू होते. मुलांनी जर त्यांच्या मापाचं जॅकेट घातलं नसेल, तर ते पाण्यावर तरंगतील, पण त्यातून निसटून पाण्यात बुडण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे मुलांना त्यांच्याच मापाचं जॅकेट घालणं आवश्यक आहे. चुकीच्या मापाचं जॅकेट पाण्यात पडल्यावर शरीरावरून सहज निसटू शकतं. म्हणून जॅकेट घातल्यावर त्याचे बकल्स आणि स्ट्रॅप्स व्यवस्थित घट्ट आहेत की नाही, हे तपासलं पाहिजे. विशेषतः मुलांच्या बाबतीत, त्यांच्या पायाखालून जाणारे स्ट्रॅप्स लावले आहेत याची खात्री करा.

राष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, जबलपूर दुर्घटनेत बोट बुडायला लागल्यावर प्रवाशांच्या दिशेने लाइफ जॅकेट्स फेकण्यात आली. ही एक गंभीर सुरक्षा चूक असल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. त्या आईने मुलाला वाचवण्यासाठी स्वतःच्या जॅकेटमध्ये घेतल्याने, जॅकेटच्या वजन क्षमतेपेक्षा जास्त भार झाला आणि त्यामुळेच दोघांचाही बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

लाइफ जॅकेटची वॉरंटी आणि नियम

काही बोटींमध्ये 'युनिव्हर्सल साइज'ची लाइफ जॅकेट्स वापरली जातात. ही जॅकेट्स साधारणपणे ४० किलो ते १२० किलोपर्यंतचं वजन पेलू शकतात. पण बोटींमध्ये लहान मुलांसाठी वेगळी जॅकेट्स आहेत की नाही, हे पाहण्याची जबाबदारी बोट चालकांची (ऑपरेटर्स) आहे. बहुतेक कंपन्या लाइफ जॅकेटवर तीन ते पाच वर्षांची वॉरंटी देतात. या कालावधीनंतर त्यांची तपासणी करणं अत्यंत आवश्यक असतं.

आपल्या देशात, जसं की केरळमध्ये 'केरळ इनलँड वेसल्स रुल्स, २०१०' नुसार बोटी चालतात. या नियमांनुसार, प्रवासी बोटी, हाऊसबोट्स आणि पर्यटन बोटींमध्ये जेवढे प्रवासी आहेत, त्या सर्वांसाठी लाइफ जॅकेट्स असणं बंधनकारक आहे. सोबतच, एकूण प्रवासी संख्येच्या १० टक्के अधिक जॅकेट्स लहान मुलांसाठी असली पाहिजेत. प्रत्येक लाइफ जॅकेटवर रात्री चमकणारी रिफ्लेक्टिव्ह टेप आणि एक शिट्टी (व्हिसल) असणंही गरजेचं आहे. ही जॅकेट्स खराब नाहीत आणि पाण्यात तरंगण्यास सक्षम आहेत, याची वेळोवेळी तपासणी झाली पाहिजे.

एखादं लाइफ जॅकेट तुमच्या मापाचं आहे की नाही हे ओळखण्याची एक सोपी पद्धत आहे. जॅकेट घालून त्याचे सर्व बकल्स आणि पट्टे लावा. त्यानंतर दोन्ही हात वर उचला. जर जॅकेट तुमच्या चेहऱ्याकडे किंवा गळ्याकडे सरकत असेल, तर ते तुम्हाला सैल (loose) आहे, हे समजावं. आपल्याकडे महाराष्ट्रात किंवा इतर ठिकाणीही अनेकदा अपघात झाल्यावरच काही काळ तपासणी कडक होते आणि नंतर पुन्हा दुर्लक्ष केलं जातं, असं मत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

लाइफ जॅकेट घालणं ही सूचना नाही, तर जबाबदारी आहे

प्रवासात लाइफ जॅकेट घालणं ही केवळ एक सूचना नाही, तर जीव वाचवण्यासाठी एक कायदेशीर बंधन आहे, असं मेरिटाइम बोर्डाने स्पष्ट केलं आहे. अनेक बोट अपघातांमध्ये मृत्यूचं कारण लाइफ जॅकेट नसणं किंवा ते चुकीच्या पद्धतीने घालणं हेच असतं. प्रवासादरम्यान बोटीच्या एकाच बाजूला गर्दी केल्यास बोटीचा तोल जाऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करून बोटीचं संतुलन राखणं गरजेचं आहे.

भारतातील कायद्यानुसार, फक्त डी. जी. शिपिंग (DG Shipping) मान्यताप्राप्त दर्जेदार लाइफ जॅकेट्सच बोटींमध्ये वापरता येतात. जे बोट मालक किंवा प्रवासी सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करतात, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत.