तुम्ही युट्यूब, इन्स्टाग्रामवरून पैसे कमावता का? सरकारला तुमच्या कमाईचा हिशोब लागणार नाही, या भ्रमात राहू नका. एक महत्त्वाचं काम लगेच करा.

मुंबई : यूट्यूबवरून पैसे कमावणं कदाचित सोपं वाटत असेल, पण इन्कम आणि टॅक्सच्या हिशोबात गडबड झाली तर पुढे मोठी अडचण होऊ शकते. ITR म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. तुमच्याकडे फक्त ४ दिवस उरले आहेत, त्यामुळे हे काम आजच पूर्ण करा. जे लोक यूट्यूब, फ्रीलान्सिंग, ब्रँड डील किंवा कंटेंट तयार करून पैसे कमावतात, त्यांनी रिटर्न भरण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

आयटीआर भरण्याआधी हे लक्षात ठेवा

सर्वात आधी, तुमच्या एकूण उत्पन्नाचा अचूक हिशोब ठेवा. यूट्यूबमधून मिळणारे पैसे, फ्रीलान्स प्रोजेक्ट्स, कन्सल्टिंग, ब्रँडसोबतची पार्टनरशिप अशा सर्व मार्गांनी होणारी कमाई व्यवस्थित नोंदवून ठेवा.

वैयक्तिक खर्चाला व्यवसायाचा खर्च म्हणून दाखवू नका. तुम्ही घरातून काम करता किंवा स्वतःची गाडी वापरता, म्हणून त्याचा पूर्ण खर्च व्यवसायाचा खर्च म्हणून दाखवता येत नाही. फक्त कामाशी थेट संबंध असलेल्या आणि ज्याच्या पावत्या तुमच्याकडे आहेत, अशाच खर्चांची नोंद करा. एखादा खर्च वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही कामांसाठी होत असेल, तर फक्त कामाशी संबंधित भागावरच क्लेम करता येतो.

कलम 44ADA चा नियम सगळ्यांनाच लागू होत नाही. फक्त फ्रीलान्स काम करतो म्हणून या नियमाचा फायदा घेता येत नाही. तुमचा व्यवसाय या नियमाच्या कक्षेत येतो की नाही, हे आधी तपासून घ्या.

GST चा मुद्दाही विसरू नका. इन्कम टॅक्स आणि GST हे दोन्ही वेगवेगळे कायदे आहेत. तुमच्या कामाचं स्वरूप आणि एकूण उलाढाल (Turnover) यावर GST नोंदणी करणं गरजेचं असू शकतं. परदेशातील क्लायंटकडून पैसे मिळत असतील, तर त्यासंबंधीचे नियमही तपासा.

त्यामुळे, शेवटच्या दिवसाची वाट न पाहता तुमचं उत्पन्न, बिलं, खर्च, कलम 44ADA, GST आणि गरज असल्यास ऑडिटशी संबंधित गोष्टी आत्ताच तपासून घ्या. योग्य कागदपत्रांसह वेळेवर ITR भरल्यास भविष्यात होणारा टॅक्सचा त्रास टाळता येतो.