अंडर-डिस्प्ले फेस आयडी, सुधारित डायनॅमिक आयलँड, व्हेरिएबल-ॲपर्चर कॅमेरा, सॅटेलाइट-आधारित 5G सपोर्ट आणि नवीन इन-हाऊस चिप iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max मध्ये येण्याचे संकेत YouTuber जॉन प्रॉसरच्या 'फ्रंट पेज टेक' या यूट्यूब चॅनलने दिले आहेत. 

कॅलिफोर्निया: ॲपलचे iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max सप्टेंबर 2026 मध्ये मोठ्या अपग्रेडसह लाँच होण्याची शक्यता आहे. ॲपलच्या अलीकडच्या इतिहासातील सर्वात मोठे हार्डवेअर अपग्रेड iPhone 18 Pro लाइनअपमध्ये येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये अंडर-डिस्प्ले फेस आयडी, सुधारित डायनॅमिक आयलँड, व्हेरिएबल-ॲपर्चर कॅमेरा, सॅटेलाइट-आधारित 5G सपोर्ट आणि नवीन इन-हाऊस चिप यांचा समावेश असल्याचे YouTuber जॉन प्रॉसरच्या 'फ्रंट पेज टेक' या यूट्यूब चॅनलने संकेत दिले आहेत.

iPhone 18 Pro, 18 Pro Max च्या लीक्समध्ये काय आहे?

1. अंडर-डिस्प्ले फेस आयडी

मागून पाहिल्यास iPhone 18 Pro चा लूक जवळपास iPhone 17 Pro सारखाच असेल, पण पुढच्या बाजूला बदल असतील. iPhone 18 Pro मध्ये फेस आयडी हार्डवेअर डिस्प्लेच्या खाली असेल. सेल्फी कॅमेरा मध्यभागी न ठेवता थोडा बाजूला असेल, असा दावा YouTuber जॉन प्रॉसरने केला आहे. डायनॅमिक आयलँड आणखी लहान होण्याची शक्यता आहे. iPhone 18 Pro मॉडेल्सना नवीन कलर व्हेरिएंट मिळतील, असा दावाही त्याने केला आहे.

2. व्हेरिएबल-ॲपर्चर कॅमेरा

iPhone 18 Pro मॉडेल्समधील मुख्य कॅमेऱ्यात व्हेरिएबल-ॲपर्चर कॅमेरा येईल, हे जॉन प्रॉसरने सांगितलेले आणखी एक मोठे अपेक्षित अपग्रेड आहे. ॲपल हे फीचर कदाचित फक्त iPhone 18 Pro Max पुरते मर्यादित ठेवू शकते, असाही प्रॉसरचा दावा आहे.

3. कॅमेरा कंट्रोल बटणमध्ये बदल

मागील आयफोनमध्ये ॲपलने सादर केलेल्या कॅमेरा कंट्रोल बटणामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. आगामी iPhone 18 Pro मध्ये ॲपल कॅपॅसिटिव्ह टच काढून फक्त प्रेशर सेन्सिंग ठेवू शकते. यामुळे हार्डवेअर सोपे होईल आणि उत्पादन व दुरुस्ती सोपी होईल. यामुळे खर्चही कमी होऊ शकतो.

4. 5G आधारित सॅटेलाइट सपोर्ट

इमर्जन्सी एसओएस सॅटेलाइट प्रणाली व्यतिरिक्त, ॲपल iPhone 18 Pro मॉडेल्समध्ये 5G सेल्युलर सॅटेलाइट सपोर्ट मोठ्या प्रमाणावर सादर करण्याची योजना आखत आहे, अशी माहिती जॉन प्रॉसरने दिली आहे. टॉवर-आधारित पारंपरिक नेटवर्कऐवजी ॲपल अधिक सॅटेलाइट सपोर्ट देण्याच्या तयारीत आहे. ॲपलने iPhone 14 मध्ये पहिल्यांदा सॅटेलाइट इमर्जन्सी फीचर सादर केले होते. यामुळे कव्हरेज नसलेल्या ठिकाणी नेटवर्क मिळण्यास मदत होईल.

5. A20 प्रो चिप आणि C2 मॉडेम

iPhone 18 Pro लाइनअप 2nm प्रक्रियेवर आधारित A20 प्रो चिप वापरेल, असे रिपोर्ट्स आहेत. ही गोष्ट जवळपास निश्चित झाली आहे. A20 प्रो चिप फोनला अधिक चांगली कामगिरी आणि बॅटरी कार्यक्षमता देईल, असे मानले जात आहे. क्वालकॉमऐवजी नेक्स्ट-जनरेशन C2 मॉडेम iPhone 18 Pro लाइनअपमध्ये सादर केला जाईल, असा दावाही जॉन प्रॉसरने केला आहे. ॲपल इतर कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी स्वतःच्या चिप्स विकसित करत आहे. आयओएस 26 ची गुपिते लाँचपूर्वी उघड केल्याबद्दल ॲपलने गेल्या वर्षी जॉन प्रॉसरवर खटला दाखल केला होता. त्यामुळे, iPhone 18 Pro मॉडेल्सबद्दल प्रॉसरने आता दिलेल्या माहितीवर ॲपलची प्रतिक्रिया काय असेल, याची उत्सुकता टेक विश्वाला आहे.