७,५५० mAh बॅटरीसह पोको F7 भारतात लवकरच लाँच होणार आहे. ड्युअल रियर कॅमेरा, स्नॅपड्रॅगन ८+ Gen १ चिपसेट आणि इतर आकर्षक वैशिष्ट्यांसह येणारा हा फोन भारतातील सर्वात मोठी बॅटरी असलेला फोन असेल.

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर गाजलेला स्मार्टफोन ब्रँड पोको आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन पोको F7 भारतात लाँच करण्यासाठी सज्ज झाला आहे. ७,५५० mAh बॅटरीसह पोको F7 भारतात येणार असल्याचे टीझरमधून स्पष्ट झाले आहे. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरे असतील.

चीनमध्ये या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेल्या Redmi Turbo 4 Pro चा रिब्रँड व्हर्जन म्हणजेच पोको F7 असल्याच्या चर्चा आहेत. जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात फोन लाँच होण्याची शक्यता आहे. पोको स्मार्टफोनच्या टीझरनुसार, पोको F7 मध्ये ७,५५० mAh ची बॅटरी असेल. 

टीझरमधील माहिती खरी असल्यास, हा फोन भारतातील सर्वात मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन असेल. यामुळे वापरकर्त्यांना सरासरी दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळेल, असे चिनी माध्यमांनी म्हटले आहे. ९०W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि २२.५W रिव्हर्स वायरलेस चार्जिंग देखील या फोनमध्ये असण्याची शक्यता आहे.

कमीत कमी दोन रंगांमध्ये पोको F7 लाँच होण्याची शक्यता आहे. यातील एक काळ्या रंगात गोळीच्या आकाराचा ड्युअल कॅमेरा मॉड्यूल आणि उभी LED स्ट्रीप असेल. भारतीय बाजारपेठेसाठी पोको एक विशेष आवृत्ती लाँच करू शकते.

६.८३ इंचाचा १.५K AMOLED डिस्प्लेसह येणाऱ्या पोको F7 मध्ये १२०Hz रिफ्रेश रेट असेल अशी अपेक्षा आहे. क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन ८+ Gen १ चिपसेट या फोनमध्ये असेल. १२GB रॅम, ५१२GB स्टोरेज, ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह ५०MP प्रायमरी सेन्सर, ८MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि २०MP सेल्फी कॅमेरा ही भारतात लाँच होणाऱ्या पोको F7 ची अपेक्षित वैशिष्ट्ये आहेत. पोको F7 ची अधिक वैशिष्ट्ये लवकरच समोर येतील.