इंस्टाग्रामने AI च्या माध्यमातून तयार केलेल्या व्यक्ती असलेल्या प्रोफाइलसाठी ‘AI-Generated Profile’ हे नवीन लेबल आणलं आहे.

मुंबई : इंस्टाग्रामने एआयच्या (AI) माध्यमातून तयार करण्यात आलेल्या व्यक्ती दाखवणाऱ्या प्रोफाइलसाठी आपल्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. प्लॅटफॉर्मने ‘AI Creator’ लेबलचे नाव बदलून ‘AI-Generated Profile’ करण्याचा निर्णय घेतला आहे. एआयने तयार केलेली व्यक्ती असलेल्या प्रोफाइलने त्याबाबत योग्य माहिती दिली नाही, तर त्या प्रोफाइलच्या कंटेंटला इंस्टाग्रामच्या Recommendation मध्ये स्थान मिळण्यात अडचणी येऊ शकतात. मात्र, योग्य एआय लेबल लावणाऱ्या क्रिएटर्सच्या रिचवर वर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही.

AI प्रोफाइलसाठी आता नवीन लेबल

इंस्टाग्रामने ब्लॉग पोस्टद्वारे या बदलाची माहिती दिली आहे. प्लॅटफॉर्मने ‘AI Creator’ वरून लेबलचे नाव ‘AI-Generated Profile’ असे बदलले आहे. या लेबलची चाचणी याच वर्षाच्या सुरुवातीला करण्यात आली होती. यापूर्वी जुन्या लेबलचा वापर करणाऱ्या क्रिएटर्सना नवीन लेबल दिसल्यानंतर ते लागू ठेवायचे की काढून टाकायचे, याचा पर्याय मिळणार आहे. नवीन लेबल विशेषतः अशा प्रोफाइलसाठी असेल, ज्यामध्ये एआयच्या मदतीने तयार केलेली व्यक्ती दाखवण्यात आली आहे.

एआय लेबल नसेल तर Reach वर परिणाम

एआयने तयार केलेली व्यक्ती प्रोफाइलवर दाखवली जात असेल आणि त्याबाबत आवश्यक माहिती दिली नसेल, तर संबंधित प्रोफाइल इंस्टाग्रामच्या रिकमंडेशनसाठी व्हॅलिड ठरणार नाहीये. अशा क्रिएटर्सना याबाबत माहिती दिली जाईल. तसेच Account Status मध्ये जाऊन आपल्या प्रोफाइलवर Reach संदर्भात कोणते निर्बंध आहेत का, हे तपासता येणार आहे.

योग्य लेबल लावल्यास रिच कमी होणार नाही

इंस्टाग्रामने स्पष्ट केलं आहे की AI-Generated Profile असल्याची योग्य माहिती देणाऱ्या क्रिएटर्सच्या रिचवर कोणतीही पेनेल्टी लावली जाणार नाही. एखाद्या क्रिएटरला आपल्या प्रोफाइलवर चुकीच्या पद्धतीने निर्बंध लावल्याचं वाटत असल्यास अकाउंट स्टेटसच्या माध्यमातून अपील करता येणार आहे. अपील मान्य झाल्यानंतर प्रोफाइल आणि त्यावरील कंटेंट पुन्हा रिकमंडेशनसाठी व्हॅलिड ठरणार आहे. मात्र, केवळ कंटेंट तयार करण्यासाठी AI Tools चा वापर केला म्हणून प्रोफाइलवर ‘AI-Generated Profile’ लेबल लावणे आवश्यक असणार नाही.

युजर्सच्या तक्रारीनंतर नियमांमध्ये बदल

अनेक युजर्सनी अशा प्रोफाइलबाबत चिंता व्यक्त केली होती, जी पहिल्या नजरेत एखाद्या खऱ्या व्यक्तीची असल्यासारखी दिसतात. मात्र नंतर त्यातील व्यक्ती एआच्या माध्यमातून तयार करण्यात आल्याचं समोर येतं. युजर्सना प्रोफाइलमागे प्रत्यक्षात कोण किंवा काय आहे, हे अधिक स्पष्टपणे समजावं, यासाठी नवीन लेबलिंग सिस्टम आणण्यात येत असल्याचं प्लॅटफॉर्मने सांगितलं आहे.