पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या T20 विश्वचषकात बांगलादेशचे तीन सामने कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होणार आहेत.

दुबई: T20 विश्वचषकात सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळू शकत नसल्याने सामन्यांचे ठिकाण बदलण्याची बांगलादेश क्रिकेट बोर्डाची मागणी ICC ने फेटाळून लावली आहे. विश्वचषकातील बांगलादेशचे सामने स्पर्धेचे संयुक्त यजमान असलेल्या श्रीलंकेत हलवावेत, अशी मागणी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केली होती. मात्र, ही मागणी मान्य करता येणार नाही आणि सध्या जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बांगलादेशने स्पर्धेत खेळावे, असे निर्देश ICC ने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला दिले आहेत, असे क्रिकइन्फोने म्हटले आहे. मात्र, ICC कडून अद्याप कोणतीही अधिकृत सूचना मिळाली नसल्याची भूमिका बांगलादेश क्रिकेट बोर्डाने घेतली आहे.

बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, मुस्तफिजुर रहमानला संघात घेतल्याबद्दल कोलकाता नाईट रायडर्स आणि संघाचे मालक शाहरुख खान यांच्याविरोधात निदर्शने झाली. त्यानंतर बीसीसीआयने कोलकाताला मुस्तफिजुरला संघातून मुक्त करण्यास सांगितले. याला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेशने भारतात विश्वचषक सामने खेळण्यास नकार दिला. सुरक्षेची कारणे देत बांगलादेशने हे पाऊल उचलले. बांगलादेशची मागणी ICC मान्य करेल, असे संकेत आधी मिळत होते. मुस्तफिजुरला संघातून मुक्त केल्यानंतर बांगलादेशने देशात आयपीएलच्या प्रक्षेपणावरही बंदी घातली होती.

पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या T20 विश्वचषकात बांगलादेशचे तीन सामने कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होणार आहेत. कोलकातामध्ये बांगलादेशचा सामना ७ फेब्रुवारीला वेस्ट इंडिज, ९ फेब्रुवारीला इटली आणि १४ फेब्रुवारीला इंग्लंडशी होईल. शेवटच्या गट सामन्यात बांगलादेश १७ फेब्रुवारीला मुंबईत नेपाळशी सामना करेल.