दक्षिण कोरियन कार ब्रँड Hyundai ने आपली कॉम्पॅक्ट एसयूव्ही Venue चे नवीन HX5+ व्हेरिएंट भारतात 9.99 लाख रुपयांना लाँच केले आहे. या प्रीमियम फीचर्स उपलब्ध करून दिलेले आहे. कोणते नवीन फीचर्स आहेत हे जाणून घेऊया.
दक्षिण कोरियन कार ब्रँड Hyundai India ने नुकत्याच लाँच केलेल्या नव्या पिढीच्या Venue चे नवीन HX5+ व्हेरिएंट सादर केले आहे. या नवीन व्हेरिएंटची किंमत ₹9.99 लाख (एक्स-शोरूम) आहे. यामुळे फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीत हे कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक आकर्षक पर्याय ठरते. सध्या, Venue हे HX2 ते HX10 पर्यंतच्या ट्रिम्समध्ये विकले जाते. मध्यम आणि उच्च-स्तरीय व्हेरिएंटमधील अंतर भरून काढण्यासाठी HX5+ खास लाँच करण्यात आले आहे. या नवीन व्हेरिएंटमुळे अधिक ग्राहकांना प्रीमियम फीचर्स उपलब्ध होतील, असा कंपनीला विश्वास आहे.
उत्तम रोड प्रेझेन्स
नवीन HX5+ व्हेरिएंटमध्ये Hyundai चे विश्वसनीय 1.2-लिटर कप्पा पेट्रोल इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. हे सेटअप दैनंदिन ड्रायव्हिंग आणि शहरी वापरासाठी संतुलित कामगिरी देईल असे म्हटले जाते. HX5+ च्या डिझाइन आणि बाह्य तपशिलांमध्ये अनेक व्हिज्युअल अपडेट्स समाविष्ट आहेत, जे त्याचा रोड प्रेझेन्स वाढवतात. यात रूफ रेल्स, क्वाड-बीम LED हेडलॅम्प, रिअर वायपर आणि वॉशर यांसारखी वैशिष्ट्ये जोडली आहेत, जी पूर्वी या किमतीत उपलब्ध नव्हती.
आश्चर्यकारक फीचर्स
केबिनमध्ये, Hyundai ने आराम आणि सोयीस्करतेवर लक्ष केंद्रित केले आहे. Hyundai Venue HX5+ मध्ये वायरलेस स्मार्टफोन चार्जर आहे, ज्यामुळे केबल्सची अडचण दूर होते. याशिवाय, ड्रायव्हरसाठी स्टोरेजसह आर्मरेस्ट जोडला आहे, ज्यामुळे लांबच्या प्रवासात आराम मिळतो. मागील सीटवरील प्रवाशांसाठी मागील विंडो सनशेड्स देखील देण्यात आले आहेत, जे विशेषतः उष्ण हवामानात एक उपयुक्त वैशिष्ट्य ठरते.
विशेष म्हणजे, HX5+ सोबत, Hyundai ने सध्याचे HX4 Venue व्हेरिएंट देखील अपडेट केले आहे. यामध्ये आता ड्रायव्हर सीटची उंची ॲडजस्ट करण्याची सोय उपलब्ध आहे. नव्या पिढीच्या Venue ला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच हे नवीन व्हेरिएंट आले आहे. लाँच झाल्यापासून या सब-4 मीटर एसयूव्हीसाठी 50,000 हून अधिक बुकिंग्स मिळाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन HX5+ व्हेरिएंट अधिक मूल्य प्रदान करेल, असे Hyundai चे एमडी आणि सीईओ तरुण गर्ग यांनी सांगितले.


