सणासुदीच्या काळात मारुती सुझुकीने त्यांच्या 'व्हिक्टोरिस' (Victoris) एसयूव्हीवर तब्बल १.३६ लाख रुपयांपर्यंतची घसघशीत सूट जाहीर केली आहे. ५ स्टार सेफ्टी रेटिंग आणि २८ किमी पेक्षा जास्त मायलेज देणाऱ्या या कारमध्ये अनेक भन्नाट फीचर्स आहेत.
मुंबई : सणासुदीच्या मुहूर्तावर नवीन एसयूव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर मारुती सुझुकीने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. कंपनीने ऑक्टोबर २०२६ मध्ये आपल्या विविध मॉडेल्सवर डिस्काउंट जाहीर केले असून, लोकप्रिय मिड-साईझ एसयूव्ही 'मारुती सुझुकी व्हिक्टोरिस'वरही (Maruti Suzuki Victoris) ग्राहकांना मोठा फायदा मिळत आहे. या कारवर तुम्ही तब्बल १,३६,००० रुपयांपर्यंत बचत करू शकता. ५ स्टार सेफ्टी रेटिंग आणि २८ किलोमीटरपेक्षा जास्त मायलेज, ही या कारची सर्वात मोठी खासियत आहे.
व्हिक्टोरिसवर १.३६ लाख रुपयांपर्यंत सूट
ऑक्टोबर महिन्यात व्हिक्टोरिस खरेदी केल्यास ग्राहकांना २०,००० रुपयांचा कॅश डिस्काउंट मिळेल. जर तुम्ही १० ऑक्टोबरपर्यंत बुकिंग करून २० ऑक्टोबरच्या आत कारची डिलिव्हरी घेतली, तर तुम्हाला अतिरिक्त ११,००० रुपयांची सूट मिळेल. याशिवाय, ५०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस, २५,००० रुपयांचा स्मार्ट एक्सचेंज प्लॅन, ३०,००० रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि १५,००० रुपयांची इन्स्टिट्यूशनल ऑफरही दिली जात आहे. हे सर्व मिळून एकूण १,३६,००० रुपयांपर्यंतचा फायदा ग्राहकांना घेता येईल.
२८ किलोमीटरपेक्षा जास्त मायलेज
व्हिक्टोरिसमध्ये पेट्रोल, हायब्रिड आणि सीएनजी असे वेगवेगळे पॉवरट्रेन पर्याय मिळतात. ग्राहक १.५ लिटर माईल्ड हायब्रिड, १.५ लिटर स्ट्रॉंग हायब्रिड आणि १.५ लिटर सीएनजी यापैकी एक पर्याय निवडू शकतात. यातील साधे पेट्रोल मॉडेल २१.१८ किमी/लिटर मायलेज देते. तर सीएनजी मॉडेलमध्ये २७ किमी/लिटर आणि स्ट्रॉंग हायब्रिड मॉडेलमध्ये तब्बल २८.६५ किमी/लिटरपर्यंत मायलेज मिळेल, असा कंपनीचा दावा आहे.
भन्नाट फीचर्सची रेलचेल
बोल्ड क्रोम ग्रिल, स्लीक एलईडी हेडलाईट्स, मस्क्युलर बंपर आणि अलॉय व्हील्स यामुळे ही कार बाहेरून खूपच आकर्षक दिसते. कारच्या आतमध्ये प्रशस्त केबिन, प्रीमियम ड्युअल-टोन डॅशबोर्ड आणि १०.२५ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. यासोबतच पॅनोरमिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यांसारखे आधुनिक फीचर्सही यात मिळतात.
५ स्टार सेफ्टी आणि लेव्हल २ ADAS
सुरक्षेच्या बाबतीतही व्हिक्टोरिस एकदम भारी आहे. भारत एनसीएपी (Bharat NCAP) क्रॅश टेस्टमध्ये या कारला ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. याच्या सर्व व्हेरियंट्समध्ये ६ एअरबॅग्स स्टँडर्ड म्हणून मिळतात. तसेच इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट आणि ईबीडीसह एबीएस (ABS with EBD) यांसारखे सेफ्टी फीचर्सही यात आहेत. टॉप व्हेरियंट्समध्ये लेव्हल २ एडीएएस (Level 2 ADAS) आणि ३६०-डिग्री पार्किंग कॅमेरा यांसारख्या सुविधाही मिळतात.
किंमत १०.५० लाख रुपयांपासून सुरू
मारुती सुझुकी व्हिक्टोरिसची एक्स-शोरूम किंमत साधारणपणे १०.५० लाख रुपयांपासून ते १९.९९ लाख रुपयांपर्यंत आहे. शहर आणि स्थानिक करांनुसार ऑन-रोड किंमतीत थोडाफार बदल होऊ शकतो. ज्या कुटुंबांना उत्तम मायलेज, ५ स्टार सेफ्टी आणि आधुनिक फीचर्स एकाच कारमध्ये हवे आहेत, त्यांच्यासाठी सणासुदीची ही ऑफर नक्कीच फायद्याची ठरू शकते.
एक गोष्ट लक्षात ठेवा, वर दिलेली डिस्काउंटची माहिती वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरून घेतली आहे. देशातील वेगवेगळी राज्ये, शहरे, डीलरशिप्स, कारचा स्टॉक, रंग आणि व्हेरियंटनुसार या ऑफर्समध्ये बदल होऊ शकतो. म्हणजेच, तुमच्या शहरातील डीलरकडे ही सूट कमी किंवा जास्त असू शकते. त्यामुळे कार बुक करण्यापूर्वी, डिस्काउंट आणि इतर माहितीची खात्री करण्यासाठी तुमच्या जवळच्या स्थानिक डीलरशी नक्की संपर्क साधा.


