Gardening Tips उन्हाळ्यात बाल्कनी फुलांनी सजवायची आहे? गुलाबासारखं दिसणारं पण बिनकाट्याचं 'नंदिनी' फूल हा एक उत्तम पर्याय आहे. याला 'लिसिएंथस' (Lisianthus) असंही म्हणतात. हे फूल कसं लावायचं आणि त्याची काळजी कशी घ्यायची, याबद्दलच्या काही सोप्या टिप्स जाणून घेऊया.
कडक उन्हाळ्यातही तुमची बाल्कनी सुंदर आणि रंगीबेरंगी फुलांनी सजलेली हवी असेल, तर गुलाबासारखं दिसणारं पण बिनकाट्याचं 'नंदिनी' फूल तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. या फुलाला 'लिसिएंथस' (Lisianthus) असंही म्हणतात. या रोपाला वेगवेगळ्या रंगांची फुलं येतात, जी 'समर रोज' म्हणूनही ओळखली जातात. उन्हाळ्यात जास्त तापमान आणि कडक उन्हामुळे अनेक जण फुलझाडं लावणं टाळतात, पण नंदिनीचं रोप यासाठी उत्तम पर्याय आहे. चला तर मग, जाणून घेऊया पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाची फुलं देणारं हे रोप कसं लावायचं.

कुंडीचा आकार योग्य निवडा
नंदिनीचं रोप लावण्यासाठी तुम्हाला साधारण १० ते १२ इंच आकाराची कुंडी निवडावी लागेल. कुंडीच्या तळाशी पाणी जाण्यासाठी छिद्र आहे की नाही, हे नक्की तपासा. जर रोप मोठं असेल, तर तुम्ही ते मोठ्या कुंडीतही लावू शकता.
अशी तयार करा माती
नंदिनीच्या रोपासाठी माती तयार करताना ५०% साधी बागेतली माती, २५% शेणखत आणि २५% वाळू किंवा कोकोपीट (नारळाचा भुसा) एकत्र मिसळून मिश्रण तयार करा.
नर्सरीतून लहान रोप आणा
नंदिनीचं रोप लावण्यासाठी तुम्ही नर्सरीमधून एक लहान रोप विकत आणू शकता. हे रोप तयार केलेल्या मातीत व्यवस्थित लावा. रोप लावल्यानंतर माती हाताने थोडी दाबून सेट करा. नंदिनीच्या रोपाला थेट सूर्यप्रकाशाची गरज असते, त्यामुळे त्याला रोज ४ ते ६ तास ऊन मिळेल याची खात्री करा. बाल्कनीमध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे काही वेळेसाठी ऊन येत असेल.
खताचा वापर आवश्यक
तुम्ही रोपाला दर २० ते ३० दिवसांनी शेणखत किंवा मोहरीची पेंड (सरसों की खली) घातल्यास त्याचा परिणाम दिसू लागेल. रोपांना भरपूर फुलं येतील आणि त्यांची वाढही वेगाने होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा की कडक उन्हाळ्यात कुंडीतील माती पूर्णपणे कोरडी होऊ देऊ नका आणि वेळेवर पाणी देत राहा.


