चेहऱ्याचा हरवलेला ग्लो परत आणण्यासाठी तुम्ही संत्र्याच्या सालापासून घरीच व्हिटॅमिन सी सीरम बनवू शकता. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे सीरम लावल्यास चेहऱ्याची चमक वेगाने वाढते. बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रीम्सपेक्षा हे खूप जास्त फायदेशीर आहे.
तुमच्या चेहऱ्याची त्वचा निस्तेज झालीय का? ग्लो कुठेतरी हरवलाय असं वाटतंय का? तुम्ही अनेक क्रीम्स वापरून पाहिल्या असतील, पण तरीही चेहऱ्यावरची चमक परत येत नसेल. तर यावर एक जालीम उपाय आहे. तुम्ही घरच्या घरीच एक खास सीरम बनवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त संत्री लागतील. होय, संत्र्यापासून तुम्ही व्हिटॅमिन सी सीरम तयार करू शकता. रोज हे सीरम लावल्याने तुमच्या चेहऱ्याचा ग्लो झटपट परत येईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला बाजारातून महागडे फेस सीरम विकत घेण्याची अजिबात गरज नाही.
व्हिटॅमिन सी सीरम बनवण्यासाठी लागणारे साहित्य
दोन संत्र्यांची साले
एक चमचा गुलाब जल
एक चमचा ग्लिसरीन
एक चमचा कोरफड जेल (अॅलोव्हेरा जेल)
घरच्या घरी व्हिटॅमिन सी सीरम कसं बनवायचं?
सर्वांत आधी दोन संत्र्यांची साले घ्या. त्यांचे छोटे तुकडे करा आणि एका भांड्यात पाण्यासोबत उकळून घ्या. पाणी थंड झाल्यावर त्यात एक चमचा गुलाब जल टाका आणि मिक्सरमध्ये वाटून घ्या. आता ही पेस्ट एका सुती कापडाने गाळून घ्या. या गाळलेल्या मिश्रणात एक चमचा ग्लिसरीन आणि एक चमचा कोरफड जेल मिसळा. तुमचं घरगुती व्हिटॅमिन सी फेस सीरम तयार आहे. हे सीरम एका छोट्या बाटलीत भरून ठेवा.
व्हिटॅमिन सी फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत:
रोज रात्री झोपण्यापूर्वी या व्हिटॅमिन सी फेस सीरमचे दोन थेंब चेहऱ्यावर लावा. अवघ्या १५ दिवसांत तुम्हाला चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसेल.
१ आठवड्यात चेहऱ्यावर ग्लो कसा आणायचा?
जर तुम्हाला एखाद्या लग्नाला किंवा पार्टीला जायचं असेल आणि एका आठवड्यात चेहऱ्यावर ग्लो हवा असेल, तर आजपासूनच हे व्हिटॅमिन सी सीरम लावायला सुरुवात करा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात नक्कीच बदल जाणवेल. घरच्या घरी व्हिटॅमिन सी सीरम कसं बनवायचं हे आपण वर पाहिलंच आहे. फक्त लक्षात ठेवा, रोज रात्री झोपण्यापूर्वीच याचा वापर करायचा आहे.
