बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचारांचे सत्र  थांबण्याचे नाव घेत नाही. समीर दास नावाच्या एका ऑटो रिक्षाचालकाला संपवले. गेल्या तीन आठवड्यांतील ही आठवी क्रुर घटना  आहे. सरकार अल्पसंख्याकांवरील अत्याचार लपवत असल्याचा आरोपही होत आहे.

बांगलादेशातील फेणी जिल्ह्यातील दगंनभुईया उपजिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय हिंदू रिक्षाचालकाची अज्ञातांकडून निर्घृण हत्या करण्यात आली असून, हल्लेखोरांनी त्याची रिक्षा चोरून नेली आहे. समीर कुमार दास (ज्यांना समीर चंद्र दास म्हणूनही ओळखले जाते) असे या मृत तरुण चालकाचे नाव आहे. या घटनेमुळे स्थानिक परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री समीर आपल्या बॅटरीवर चालणाऱ्या सीएनजी रिक्षासह कामावर असताना, दगंनभुईया उपजिल्हा आरोग्य संकुलाजवळ ही घटना घडली. हल्लेखोरांनी समीर यांना अडवून त्यांना बेदम मारहाण केली आणि देशी शस्त्रांनी त्यांच्यावर प्राणघातक वार केले. हत्या केल्यानंतर हल्लेखोर त्यांची रिक्षा घेऊन पसार झाले.

पहाटे दोनच्या सुमारास दक्षिण करीमपूर मुहुरी बारी परिसरात स्थानिकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक मृतदेह दिसला. त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले, त्यानंतर हा मृतदेह समीर दास यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

कुटुंबाचा आधार हिरावला

समीर हे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षा चालवून आपल्या घराचा गाडा ओढत होते. त्यांच्या कमाईवरच त्यांचे कुटुंब अवलंबून होते. रविवारी सायंकाळपर्यंत समीर घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली होती आणि त्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांच्या निधनाची बातमी आल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. "आमचा आधार हिरावला गेला आहे, आम्हाला लवकरात लवकर न्याय हवा," अशी आर्त हाक त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

तपासाची चक्रे फिरली: हत्येमागे मोठे षड्यंत्र?

दगंनभुईया पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी (OC) मुहम्मद फैजुल अझीम यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या केवळ चोरीच्या उद्देशाने केलेली नसून ती 'पूर्वनियोजित' असल्याचे दिसून येत आहे.

पोलीस सध्या दोन बाजूंनी तपास करत आहेत: १. केवळ रिक्षा चोरी करण्यासाठी ही हत्या झाली का? २. की या हत्येमागे वैयक्तिक शत्रुत्व किंवा इतर काही सामाजिक कारणे आहेत?

न्यायाची मागणी

स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी शोधमोहीम तीव्र केली आहे. परिसरात शांतता राखण्याचे आवाहन करतानाच, ज्यांच्याकडे या घटनेबाबत काहीही माहिती असेल त्यांनी पुढे येण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. एका कष्टकरी तरुणाची अशा प्रकारे झालेली हत्या बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे करत आहे.

दरम्यान, भारतात होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी संघ पाठवणार नाही, असे बांगलादेशने म्हटले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट संबंध इतिहासातील सर्वात मोठ्या संकटातून जात आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलेल्या या वादामुळे आगामी T20 विश्वचषकाच्या आयोजनावरही परिणाम झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने विक्रमी रकमेत (9.2 कोटी रुपये) खरेदी केलेल्या बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला संघातून वगळण्याचे निर्देश BCCI ने दिल्याने या वादाला सुरुवात झाली. बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ हे पाऊल उचलण्यात आल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. यामुळे बांगलादेशचे क्रिकेट चाहते आणि सरकार संतप्त झाले. यानंतर, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ICC कडे भारतात होणाऱ्या T20 विश्वचषकातील आपले सामने अन्यत्र हलवण्याची मागणी केली. मात्र, ICC ने ही मागणी फेटाळून लावली. सध्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही आणि भारतात न खेळल्यास गुण गमावले जातील, असे ICC ने स्पष्ट केले आहे.