हिरो मोटोकॉर्पने आपली नवीन 2026 Xtreme 160R 4V बाईक भारतात लाँच केली आहे. तीन व्हेरियंट्समध्ये आलेली ही बाईक महागड्या बाईक्सचे फीचर्स देते. बजाज पल्सर आणि टीव्हीएस अपाचेला ती तगडी टक्कर देणार आहे.

मुंबई : हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) भारतीय बाजारात आपली नवीन आणि अपडेटेड 2026 Xtreme 160R 4V बाईक लाँच केली आहे. कंपनीने या बाईकला नवीन लूक आणि काही खास फीचर्ससह मार्केटमध्ये उतरवले आहे. या बाईकच्या टॉप व्हेरियंटमध्ये क्रूझ कंट्रोलसारखे भन्नाट फीचर मिळणार आहे. हे फीचर सहसा फक्त महागड्या बाईक्समध्ये पाहायला मिळते. त्यामुळे आता कमी किंमतीत तुम्हाला हे भारी फीचर अनुभवता येणार आहे.

तीन व्हेरियंट्स आणि बुकिंग

Xtreme 160R 4V बाईक तुम्हाला Standard, Pro आणि Carbon अशा तीन व्हेरियंट्समध्ये मिळेल. यात Carbon व्हेरियंटची किंमत सर्वात जास्त आहे. Carbon व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत १.४१ लाख रुपये आहे. ग्राहक कंपनीच्या वेबसाईट किंवा शोरूममधून ही बाईक बुक करू शकतात. Pro आणि Carbon व्हेरियंटचे बुकिंग याच नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे, तर Standard व्हेरियंटच्या बुकिंगसाठी ग्राहकांना जानेवारी २०२७ पर्यंत वाट पाहावी लागेल. उरलेल्या व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत १.२७ लाख रुपये आहे.

Hero Xtreme 160R 4V चा नवा लूक आणि कलर्स

2026 च्या या मॉडेलची डिझाईन आधीपेक्षा जास्त स्पोर्टी बनवण्याचा प्रयत्न झाला आहे. फ्युएल टँक आणि मागच्या सीटमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. ग्राहकांना आता त्यांच्या आवडीनुसार व्हेरियंट आणि कलर्स निवडण्याची सोय कंपनीने दिली आहे.

तीन व्हेरियंट्सचे कलर्स

  • Standard बाईक Firestorm Red आणि Pearl Black कलरमध्ये उपलब्ध आहे.
  • Pro व्हेरियंट Pro Red आणि Pro Black कलर्समध्ये मिळेल.
  • Carbon व्हेरियंट Carbon Red, Carbon Black, Carbon Gray आणि Abrax Orange रंगात उपलब्ध आहे.

यावेळी कंपनीने व्हेरियंट्सची नावेही बदलली आहेत. जुन्या बेस मॉडेलला आता Standard म्हटले जाईल. Combat Edition चे नाव बदलून Pro ठेवण्यात आले आहे. या दोन्हींसोबतच Carbon नावाचे नवीन व्हेरियंट जोडले गेले आहे.

इंजिनमध्ये काय बदल झालेत?

Xtreme 160R 4V च्या तिन्ही व्हेरियंट्समध्ये 164.32cc ऑईल-कूल्ड, 7-व्हॉल्व्ह इंजिन दिले आहे. याची मॅक्सिमम पॉवर आता 17.1 hp झाली असून ती 8,750 rpm वर सर्वोच्च पातळी गाठते. जुन्या मॉडेलच्या तुलनेत यात थोडी वाढ झाली आहे. टॉर्क मात्र 14.6 Nm वर कायम असून तो 6,500 rpm वर सर्वोच्च पातळी गाठतो.

Pro व्हेरियंटमध्ये मिळणार क्रूझ कंट्रोल

कंपनीने आपल्या तिन्ही व्हेरियंट्समध्ये स्पष्ट फरक ठेवला आहे. Standard मॉडेलमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क, मेकॅनिकल थ्रॉटल, सिंगल-चॅनेल ABS सोबत दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक आणि LCD इन्स्ट्रुमेंट कन्सोल दिले आहे.

दुसरीकडे, Pro व्हेरियंटमध्ये 37mm KYB USD फ्रंट फोर्क आणि ॲडजस्टेबल प्रीलोड रिअर मोनोशॉक सस्पेन्शन मिळते. यात ड्युअल-चॅनेल ABS, राईड-बाय-वायर सिस्टीम आणि रेन, रोड, स्पोर्ट्स असे तीन रायडिंग मोड्स दिले आहेत. यात क्रूझ कंट्रोलचे फीचरही डिझाईन केले आहे. बाईकच्या सीटची उंची आता 805mm झाली असून ती आधीपेक्षा 2mm ने वाढली आहे. वजन 1.5kg ने वाढून 149kg वर पोहोचले आहे.

Carbon व्हेरियंटमध्ये TFT स्क्रीन

Carbon व्हेरियंटमध्ये Pro मधील सर्व प्रमुख फीचर्स मिळतात. पण यात LCD ऐवजी 4.2 इंचाची TFT स्क्रीन दिली आहे. हीच स्क्रीन Xpulse 210 मध्येही पाहायला मिळते, पण Xtreme 160R 4V मधील डिझाईन तिच्या स्पोर्टी स्टाईलला साजेसे असे वेगळे ठेवले आहे. भारतीय बाजारात Xtreme 160R 4V ही बाईक Bajaj Pulsar NS160 आणि TVS Apache RTR 160 या बाईक्सना थेट टक्कर देईल.