ISS Crash नासा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन (ISS) पॅसिफिक महासागरात पाडण्याच्या तयारीत आहे. पण या योजनेमुळे समुद्रातील पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती पर्यावरण कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी या योजनेच्या परिणामांचा सखोल अभ्यास करण्याची मागणी केली आहे.
ISS Crash अमेरिकेची अंतराळ संस्था नासा (NASA) सध्या पृथ्वीभोवती फिरणारं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन (ISS) समुद्रात पाडण्याच्या मोठ्या योजनेवर काम करत आहे. येत्या काही वर्षांत हे स्टेशन नियंत्रित पद्धतीने पॅसिफिक महासागरात क्रॅश केलं जाईल. पण नासाच्या या योजनेवर पर्यावरण कार्यकर्ते आणि समुद्र तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. यामुळे समुद्रातील पर्यावरणाचं मोठं नुकसान होऊ शकतं, असा इशारा त्यांनी दिला आहे.

नासाच्या सध्याच्या योजनेनुसार, 2028 पासून ISS ची कक्षा हळूहळू कमी केली जाईल. पृथ्वीच्या वातावरणात नैसर्गिकरित्या बदल करून आणि रशियन विभागाच्या मदतीने हे केलं जाईल. त्यानंतर 2029 मध्ये, स्पेसएक्सने (SpaceX) बनवलेलं एक खास वाहन (U.S. Deorbit Vehicle - USDV) ISS ला जोडलं जाईल. या वाहनाच्या मदतीने स्टेशनला पृथ्वीच्या वातावरणात आणून पॅसिफिक महासागरातील 'पॉइंट निमो' (Point Nemo) नावाच्या ठिकाणी पाडलं जाईल. हे ठिकाण मानवी वस्तीपासून खूप दूर आणि जगातील सर्वात निर्जन सागरी क्षेत्र आहे.
मात्र, 'द ओशन फाऊंडेशन' (The Ocean Foundation) या सागरी संवर्धन संस्थेने या योजनेला विरोध केला आहे. संस्थेचे अध्यक्ष मार्क स्पाल्डिंग (Mark Spalding) यांनी म्हटलं आहे की, एवढी मोठी अंतराळ वस्तू समुद्रात पडल्यास पर्यावरणावर काय परिणाम होईल, याबाबत पुरेशी माहिती किंवा अभ्यास उपलब्ध नाही. त्यांनी 1972 च्या 'स्पेस लायॅबिलिटी कन्व्हेन्शन'चा (Space Liability Convention) उल्लेख केला. या करारानुसार, अंतराळ कचरा दुसऱ्या देशाच्या जमिनीवर पडून नुकसान झाल्यास भरपाई द्यावी लागते. पण समुद्रात कचरा टाकल्यास अशी कोणतीही कायदेशीर जबाबदारी निश्चित नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुद्राचा वापर 'कचराकुंडी' म्हणून करू नये, असं त्यांचं म्हणणं आहे.
तज्ज्ञांच्या मते, ISS चा बराचसा भाग वातावरणात जळून खाक होईल, पण काही जड भाग समुद्राच्या तळापर्यंत पोहोचतील. यामुळे समुद्रातील जीवसृष्टी आणि नैसर्गिक अधिवासावर काय परिणाम होईल, हे स्पष्ट नाही. ही अनिश्चितताच मोठी चिंतेची बाब आहे, असं स्पाल्डिंग म्हणाले.
याशिवाय, ही आतापर्यंतची सर्वात मोठी नियंत्रित 'स्पेस री-एन्ट्री' असल्यामुळे वातावरणीय प्रदूषणाचा धोकाही अभ्यासला पाहिजे, अशी मागणी संस्थेने केली आहे. समुद्रात आणि वातावरणात होणाऱ्या परिणामांवर एक सविस्तर पर्यावरण अभ्यास करावा आणि समुद्रात पडणाऱ्या अवशेषांची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मानवी सुरक्षेसाठी स्टेशनला नियंत्रित पद्धतीने खाली आणणं गरजेचं आहे, हे पर्यावरण कार्यकर्त्यांना मान्य आहे. पण त्याचवेळी समुद्राचं महत्त्व आणि तिथली जैवविविधता दुर्लक्षित करून चालणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

