Car market : रिअरव्ह्यू कॅमेऱ्यातील सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने स्वीडिश कार निर्माता कंपनी व्होल्वोने,अमेरिकेत ४ लाखांहून अधिक गाड्या परत बोलावल्या आहेत. याचा परिणाम प्रामुख्याने २०२१-२०२५ च्या XC40 मॉडेल्सवर झाला आहे. 

Car market : पल्या उत्पादनात कोणतीही चूक राहू नये, यासाठी सर्वच कंपन्या सतर्क असतात. एखादी चूक आढळल्यास अनेक कंपन्या बाजारातून ते उत्पादन माघारी घेतात. सध्या कार मार्केट विस्तारत चालले आहे. परिणामी तेथील बड्या कार उत्पादक कंपन्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न या कंपन्यांचा असतो. अशा वेळी एखादी तांत्रिक चूक देखील भविष्यातील कार विक्रीवर परिणाम करू शकते. 

स्वीडिश लक्झरी कार निर्माता कंपनी व्होल्वो कार्सने रिअरव्ह्यू कॅमेरा सिस्टीममधील तांत्रिक समस्येमुळे अमेरिकेत ४ लाखांहून अधिक वाहने परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेची रस्ते सुरक्षा एजन्सी NHTSA (नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशन) ने याला दुजोरा दिला आहे. NHTSA नुसार, या रिकॉलमध्ये एकूण ४,१३,१५१ वाहनांचा समावेश आहे. यामध्ये २०२१ ते २०२५ दरम्यान तयार करण्यात आलेल्या व्होल्वो XC40 मॉडेल्सचा सर्वाधिक समावेश आहे.

या समस्येमुळे बाधित वाहनांमधील रिअरव्ह्यू कॅमेरा खराब झाल्यामुळे, गाडी रिव्हर्स घेताना चालकाला मागील दृश्य स्पष्टपणे दिसू शकत नाही. पार्किंग करताना आणि रिव्हर्स घेताना अपघात टाळणे हे रिअरव्ह्यू कॅमेऱ्याचे काम असल्याने, ही समस्या थेट सुरक्षेशी संबंधित आहे.

ही समस्या दूर करण्यासाठी डीलरशिपवर मोफत सॉफ्टवेअर अपडेट दिले जाईल किंवा OTA (ओव्हर-द-एअर) अपडेटद्वारे नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले जाईल, असे व्होल्वोने स्पष्ट केले आहे. यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. याच समस्येसाठी या गाड्यांना परत बोलावण्याची ही दुसरी वेळ आहे. व्होल्वोने सांगितले की, मे २०२५ मध्ये याच मॉडेलला याच बाजारात परत बोलावण्यात आले होते. आता, एक नवीन, अतिरिक्त सॉफ्टवेअर समस्या समोर आली आहे, ज्यामुळे तीच अडचण निर्माण होत आहे. कंपनीच्या मते, दुसऱ्यांदा परत बोलावण्याचे कारण पहिल्यापेक्षा वेगळे आहे, परंतु त्याचा परिणाम सारखाच आहे.

व्होल्वोचे म्हणणे आहे की, सर्व सदोष वाहनांसाठी नवीन निराकरण करणारे सॉफ्टवेअर विकसित केले जात आहे. येत्या आठवड्यात हे अपडेट OTA द्वारे जारी केले जाईल.