Car market : अमेरिकन वाहन ब्रँड जीपने त्यांच्या प्रीमियम एसयूव्ही ग्रँड चेरोकीवर चार लाख रुपयांपर्यंतच्या सवलतीची घोषणा केली आहे. 2.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन, ADAS सारखे प्रगत सुरक्षा फीचर्स आणि उत्कृष्ट ऑफ-रोड क्षमता ही याची वैशिष्ट्ये आहेत.
Car market : सध्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची जोमात घोडदौड सुरू आहे. ग्राहकांकडून गाड्यांची मागणी वाढत आहे. म्हणूनच दिवसेंदिवस नव्या गाड्यांची नोंदणी वाढतच चालली आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न बड्या वाहन उत्पादक कंपन्यांचा आहे. त्यामुळे आपल्या नवनव्या मॉडेल्समध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच सध्या उपलब्ध असलेल्या मॉडेल्सचे अपग्रेडेशन करण्यात येत आहे. त्यातच आता ग्राहकांना गाडी खरेदीवर मोठे डिस्काऊंटही दिले जात आहे.
आयकाॅनिक अमेरिकन वाहन ब्रँड जीप इंडियाने आपल्या मॉडेल्सवर मोठी सवलत जाहीर केली आहे. जीपने त्यांची सर्वात आलिशान आणि प्रीमियम एसयूव्ही असलेल्या ग्रँड चेरोकीवर चार लाखांपर्यंतचे फायदे देऊ केले आहेत. कंपनीने त्यांच्या कारवर दिलेली ही सर्वात मोठी सवलत आहे. इतकेच नाही, तर इतर कोणत्याही कंपनीपेक्षा ही मोठी सवलत आहे. त्यामुळे, जर तुम्ही ही एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जानेवारीमध्ये उपलब्ध असलेल्या या ऑफरचा तुम्ही नक्कीच फायदा घ्यावा. याची एक्स-शोरूम किंमत ६३ लाख रुपये आहे.
जीप ग्रँड चेरोकीची वैशिष्ट्ये
या एसयूव्हीचे डिझाइन पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक असून, यात स्लिम हेडलँप आणि टेललँप देण्यात आले आहेत. समोरच्या बाजूला जीपची सिग्नेचर 7-स्लॉट ग्रिल आणि 'Jeep' लोगो आहे. चौकोनी व्हील आर्च, बॉडी क्लॅडिंग आणि 20-इंच मेटॅलिक अलॉय व्हील्स ग्रँड चेरोकीला एक दमदार लूक देतात. मागील बाजूस, स्लिम एलईडी टेललाइट्स आणि क्रोम सराउंडसह मागील विंडशील्ड हे याचे वैशिष्ट्य आहे.
या एसयूव्हीला 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनमधून शक्ती मिळते, जे 270 एचपी पॉवर आणि 400 एनएम टॉर्क निर्माण करते. ऑफ-रोडिंगमध्ये, ही एसयूव्ही भारतीय बाजारपेठेतील इतर सर्व एसयूव्हींना मागे टाकते. याला 215 मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स मिळतो, ज्यामुळे ग्रँड चेरोकी 533 मिमी पर्यंत खोल पाण्यातून जाऊ शकते. जीप ग्रँड चेरोकी एका व्हेरिएंटमध्ये आणि चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.
डिझाइनच्या बाबतीत, यात 10.25-इंचाच्या फ्रंट को-पॅसेंजर टचस्क्रीन डिस्प्लेसह क्लास-लीडिंग तंत्रज्ञान दिले आहे. यात 10.25-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.0-इंचाचा हेड-अप डिस्प्ले आणि 10.1-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यांचाही समावेश आहे. पहिल्या रांगेतील प्रवाशांसाठी 10-इंचाचा 4K डिस्प्ले आहे. यात 1,076 लिटरची बूट स्पेस आहे.
ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन, ॲम्बियंट लायटिंग, व्हेंटिलेटेड सीट्स, सराउंड-व्ह्यू कॅमेरा, व्हेंटिलेशनसह लेदर सीट्स आणि 9-स्पीकर साउंड सिस्टम ही ग्रँड चेरोकीची इतर वैशिष्ट्ये आहेत. आठ एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, टेरेन रिस्पॉन्स मोड, ॲडव्हान्स्ड ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टीम (ADAS), हिल स्टार्ट असिस्ट, रेन ब्रेक सपोर्ट, हेड-अप डिस्प्ले आणि सराउंड-व्ह्यू कॅमेरा हे सुरक्षा फीचर्स आहेत.


