पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे CNG गाड्या एक चांगला पर्याय आहेत. पण गाडीची देखभाल आणि चालवण्याच्या पद्धतीतल्या चुकांमुळे मायलेजवर परिणाम होतो. टायर प्रेशर, एअर फिल्टर आणि ड्रायव्हलिंगच्या सवयींकडे लक्ष दिल्यास CNG गाडीची कार्यक्षमता वाढवता येते.
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे कमी खर्चात प्रवास करण्यासाठी अनेकजण CNG गाड्यांना पसंती देत आहेत. पण अनेकदा गाडीच्या वापरातील आणि देखभालीतील छोट्या-छोट्या चुकांमुळे मायलेज कमी मिळतं.
जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या गाडीचं मायलेज पूर्वीपेक्षा कमी झालंय, तर काही गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही गाडीची इंधन कार्यक्षमता (fuel efficiency) सुधारू शकता. टायरमधील हवेचा दाब, एअर फिल्टर, स्पार्क प्लग आणि गाडी चालवण्याची पद्धत यांसारख्या गोष्टींचा थेट मायलेजवर परिणाम होतो. चला तर मग, CNG गाडीचं मायलेज वाढवण्यासाठी या ५ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.
टायरमध्ये योग्य हवा ठेवा
CNG सिलेंडरमुळे गाडीच्या मागच्या भागावर अतिरिक्त वजन येतं. अशावेळी टायरमध्ये हवा कमी असेल, तर रस्त्याशी होणारं घर्षण वाढतं. यामुळे गाडी पुढे ढकलण्यासाठी इंजिनला जास्त जोर लावावा लागतो आणि CNG जास्त खर्च होतो. त्यामुळे, आठवड्यातून एकदा तरी टायरमधील हवेचा दाब तपासा आणि कंपनीने सांगितलेल्या पातळीवर तो कायम ठेवा. योग्य टायर प्रेशरमुळे इंजिनवर येणारा अनावश्यक ताण कमी होतो.
एअर फिल्टर आणि स्पार्क प्लग तपासा
इंजिनला व्यवस्थित काम करण्यासाठी पुरेशी हवा मिळणं गरजेचं आहे. एअर फिल्टरमध्ये धूळ आणि घाण साचल्यास हवेचा प्रवाह अडतो आणि इंजिनच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. त्यामुळे साधारणपणे प्रत्येक ५,००० किलोमीटरवर एअर फिल्टर तपासा. गरज वाटल्यास तो स्वच्छ करा किंवा बदला. CNG ला पेट घेण्यासाठी पेट्रोलपेक्षा जास्त ताकदीच्या स्पार्कची गरज असते. जुने किंवा खराब झालेले स्पार्क प्लग असतील तर इंजिनमध्ये कंपनं जाणवतात आणि CNG जास्त वापरला जातो. त्यामुळे स्पार्क प्लग आणि CNG किटची नियमित तपासणी करून ट्युनिंग करणं महत्त्वाचं आहे.
गाडी शांतपणे चालवा
तुमची ड्रायव्हिंगची स्टाईल थेट मायलेजवर परिणाम करते. अचानक गाडीचा वेग वाढवणं (sudden acceleration) आणि वारंवार जोरात ब्रेक दाबणं या सवयींमुळे CNG जास्त खर्च होतो. चांगलं मायलेज मिळवण्यासाठी शक्यतोवर एकाच वेगात गाडी चालवा आणि योग्य वेळी गिअर बदला. साधारणपणे ताशी ५० ते ७० किलोमीटरचा वेग कायम ठेवल्यास मायलेज सुधारण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे उगाच रेस करणं आणि सारखं ब्रेक दाबणं टाळा.
योग्य वेळी CNG भरा
CNG भरण्याची वेळसुद्धा गॅसच्या प्रमाणावर परिणाम करू शकते. असं म्हणतात की, सकाळी लवकर किंवा रात्रीच्या वेळी वातावरणाचं तापमान कमी असतं. तापमान कमी असताना गॅस जास्त चांगल्या प्रकारे कॉम्प्रेस होतो. यामुळे सिलेंडरमध्ये योग्य दाबाने जास्त CNG भरता येतो. त्यामुळे CNG भरताना कमी तापमानाची वेळ निवडणं तुमच्या फायद्याचं ठरू शकतं.
गाडीची नियमित देखभाल करा
CNG गाडीचं मायलेज टिकवून ठेवण्यासाठी नियमित सर्व्हिसिंग खूप महत्त्वाची आहे. इंजिन, CNG किट, स्पार्क प्लग, एअर फिल्टर यांसारख्या भागांची ठराविक वेळेनंतर तपासणी झालीच पाहिजे. छोट्या-छोट्या समस्या सुरुवातीलाच सोडवल्या, तर इंजिनची कार्यक्षमता टिकून राहते आणि अनावश्यक इंधन खर्च टाळता येतो.
लहान सवयी, मोठा फायदा
टायर प्रेशर तपासण्यापासून ते गाडी शांतपणे चालवण्यापर्यंत आणि वेळेवर सर्व्हिसिंग करण्यापर्यंत, या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. याकडे लक्ष दिल्यास तुम्ही CNG गाडीचं मायलेज वाढवू शकता आणि रोजच्या खर्चात बचत करू शकता. अर्थात, गाडीचं मायलेज हे गाडीचं मॉडेल, रस्त्याची स्थिती, ट्रॅफिक, हवामान आणि तुमच्या ड्रायव्हिंगच्या पद्धतीवरही अवलंबून असतं.

