रात्री होणारे अपघात टाळण्यासाठी केंद्र सरकार गाडीच्या हाय-बीम हेडलाईट वापरासाठी नवीन नियम प्रस्तावित करत आहे. या प्रस्तावात लाईटच्या तीव्रतेवर मर्यादा, विनाकारण वापरासाठी दंड आणि लायसन्स निलंबित करण्यासारख्या कठोर कारवाईचा समावेश आहे.

नवी दिल्ली : रात्री गाडी चालवताना समोरून येणाऱ्या गाडीच्या हाय-बीम हेडलाईटमुळे (High Beam Headlight) डोळे दिपतात आणि अपघात होतात. हेच भीषण अपघात रोखण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हेडलाईटच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी हेडलाईटच्या प्रकाशाची तीव्रता आणि कलर टेम्परेचरवर मर्यादा घालणारा एक नवीन कायदा प्रस्तावित केला आहे.

या प्रस्तावावर लोकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यासाठी ३० दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. जर सर्व काही योजनेनुसार झाले, तर पुढच्या वर्षी एप्रिलपासून हे नवीन नियम लागू होऊ शकतात. ऑटोमोबाईल तज्ज्ञ टुटू धवन आणि ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. (ब्रिगेडियर) विजय माथूर यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यांच्या मते, डोळ्यांच्या सुरक्षेसाठी आणि अपघात टाळण्यासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे.

नवीन प्रस्तावात नेमकं काय आहे?

गाडी सुरू होताच लो-बीम - यापुढे तयार होणाऱ्या नवीन गाड्या (विशेषतः दुचाकी) सुरू होताच त्यांचा हेडलाईट फक्त 'लो-बीम' (Low Beam) मोडमध्येच सुरू होईल. गरज असेल तरच चालक त्याला 'हाय-बीम'वर बदलू शकेल. (हा नियम फक्त नवीन गाड्यांना लागू होईल, जुन्या गाड्यांसाठी सध्याचीच व्यवस्था कायम राहील).

60 किमी वेगाच्या आत अलार्म - जर गाडीचा वेग ताशी 60 किलोमीटरपेक्षा कमी असेल आणि चालकाने हाय-बीम वापरला, तर गाडीमध्ये स्पीड वॉर्निंगसारखा अलार्म वाजू लागेल. मात्र, ताशी 60 किमी पेक्षा जास्त वेगाने (उदा. महामार्गावर) गाडी चालवताना हा अलार्म वाजणार नाही.

प्रकाशाची तीव्रता (Intensity) कमी करणार

दुचाकींच्या हेडलाईटच्या प्रकाशाची कमाल तीव्रता 1.5 लाख कॅन्डेला (Candela) वरून 1 लाख कॅन्डेलापर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे. तर, कारसाठी ही तीव्रता 2.25 लाख कॅन्डेलावरून 1.5 लाख कॅन्डेलावर आणण्याचा विचार आहे.

कलर टेम्परेचरवर मर्यादा - जास्त निळ्या-पांढऱ्या प्रकाशामुळे डोळ्यांवर येणारा ताण टाळण्यासाठी हेडलाईटचे कलर टेम्परेचर जास्तीत जास्त 6,500 केल्विन (Kelvin) पर्यंत मर्यादित ठेवलं जाईल.

ट्रक-बससाठी रिफ्लेक्टिव्ह टेप अनिवार्य - रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या बस आणि अवजड मालवाहू ट्रक्स सहज ओळखता यावेत, यासाठी त्यांना रिफ्लेक्टिव्ह सेफ्टी टेप (Reflective Safety Tape) लावणं बंधनकारक केलं जाईल.

नियम मोडल्यास मोठा दंड आणि लायसन्स रद्द

सार्वजनिक रस्ते आणि महामार्गांवर विनाकारण हाय-बीम हेडलाईट वापरून गाडी चालवताना आढळल्यास वाहतूक पोलीस 500 ते 1,500 पर्यंत दंड आकारू शकतात. पहिल्यांदा नियम मोडल्यास 500 दंड असेल. पुन्हा तीच चूक केल्यास 1,500 पर्यंत दंड आकारला जाईल. जर कुणी वारंवार नियम मोडत असेल किंवा हाय-बीममुळे अपघात झाला, तर त्या चालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) निलंबित केला जाईल.

हाय-बीम कधी वापरावा आणि कधी नाही?

कधी वापरू शकता?

  • ज्या ठिकाणी रस्त्यावर अजिबात लाईट नाहीत, अशा ग्रामीण किंवा निर्जन रस्त्यांवर.
  • ज्या महामार्गांवर मोठे डिव्हायडर आहेत (जेणेकरून समोरच्या चालकाच्या डोळ्यांवर प्रकाश पडणार नाही).
  • रस्त्यावरील प्राणी, खड्डे किंवा अडथळे दूरूनच पाहण्यासाठी.

कधी वापरू नये?

  • समोरून वाहन येत असल्यास - समोरून कोणतेही वाहन किंवा व्यक्ती येत असल्यास, तात्काळ हेडलाईट 'लो-बीम'वर टाकावा.
  • शहरात आणि गर्दीच्या ठिकाणी - शहराच्या आतल्या रस्त्यांवर नेहमी लो-बीम हेडलाईट वापरावा.
  • धुकं आणि पावसात - दाट धुकं, मुसळधार पाऊस किंवा धुराचं वातावरण असताना हाय-बीम वापरू नये. कारण प्रकाश त्यावर आदळून परत तुमच्याच डोळ्यांवर येतो (Reflect) आणि रस्ता दिसेनासा होतो.