- Home
- Utility News
- Blinkit Train Delivery : चालत्या ट्रेनमध्ये विसरलात चार्जर? आता ब्लिंकिट करणार डिलिव्हरी!
Blinkit Train Delivery : चालत्या ट्रेनमध्ये विसरलात चार्जर? आता ब्लिंकिट करणार डिलिव्हरी!
ट्रेनने प्रवास करताना चार्जर, औषधं किंवा इतर महत्त्वाच्या वस्तू न्यायला विसरलात? आता टेन्शन घेऊ नका. क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ब्लिंकिटने आता चालत्या ट्रेनमध्येही डिलिव्हरी देण्यास सुरुवात केली आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी नवी सुविधा
सध्या ट्रेनमध्ये भूक लागल्यास आपण स्विगी आणि झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करतो. प्रवाशांनी आधीच ऑर्डर केल्यास ठराविक स्टेशनवर जेवण मिळतं. आता याच धर्तीवर प्रवाशांना अत्यावश्यक वस्तूही मिळणार आहेत. प्रवासात तुम्ही फोनचा चार्जर विसरलात किंवा इतर काही महत्त्वाच्या वस्तू हव्या असतील, तर तुम्ही ब्लिंकिट ॲपवरून ऑर्डर करू शकता. पण ही सुविधा सध्या सर्वच रेल्वे स्टेशनवर उपलब्ध नाही. त्यामुळे ऑर्डर करण्यापूर्वी तुमच्या स्टेशनवर ही सुविधा आहे की नाही, हे नक्की तपासा.

दक्षिण रेल्वे आणि ब्लिंकिटची भागीदारी
दक्षिण रेल्वेच्या सेलम डिव्हिजनने क्विक कॉमर्स कंपनी ब्लिंकिटसोबत नुकताच एक करार केला आहे. या भागीदारीतून रेल्वे प्रवाशांना त्यांच्या गरजेच्या वस्तू थेट ट्रेनमध्ये पोहोचवल्या जातील. सध्या हा एक पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केला आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास भविष्यात इतर प्रमुख रेल्वे स्टेशनवरही ही सुविधा सुरू होऊ शकते.
ब्लिंकिटवरून कोणत्या वस्तू ऑर्डर करता येतील?
प्रवासी आता ब्लिंकिटवरून त्यांच्या गरजेनुसार अनेक प्रकारच्या वस्तू ऑर्डर करू शकतात. यामध्ये प्रामुख्याने औषधं, हेल्थकेअर प्रॉडक्ट्स, मोबाईल चार्जर, पर्सनल केअरच्या वस्तू, स्नॅक्स आणि लहान मुलांसाठी लागणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे. पण कोणत्या वस्तू मिळतील हे त्या स्टेशनवरील स्टॉकवर अवलंबून असेल. तसेच औषधांसारख्या काही वस्तूंवर निर्बंध असू शकतात.
ब्लिंकिटवरून वस्तू कशा ऑर्डर करायच्या?
ट्रेनमध्ये वस्तू ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. सर्वात आधी फोनमध्ये ब्लिंकिट ॲप उघडा. ज्या स्टेशनवर तुम्हाला वस्तू हवी आहे, ते लोकेशन म्हणून निवडा. त्यानंतर हव्या असलेल्या वस्तू कार्टमध्ये ॲड करा. ॲपने विचारल्यास ट्रेन नंबर, कोच आणि बर्थची माहिती भरा. ऑर्डर कन्फर्म करा आणि डिलिव्हरीच्या सूचना नीट वाचा. ट्रेन त्या स्टेशनवर पोहोचल्यावर ॲपमध्ये दिलेल्या डिलिव्हरी पॉईंटवरून तुमची ऑर्डर कलेक्ट करा.
ऑर्डर करण्यापूर्वी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा
तुम्ही ऑर्डर करण्यापूर्वी स्टेशनचं लोकेशन, वस्तूंची उपलब्धता आणि डिलिव्हरीची वेळ नक्की तपासा. ट्रेन स्टेशनवर किती वेळ थांबणार आहे आणि त्या वेळेत वस्तू मिळणं शक्य आहे का, याची खात्री करा. सध्या ही सुविधा फक्त निवडक स्टेशनवरच मिळत आहे. त्यामुळे प्रत्येक ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर डिलिव्हरी मिळेलच असं नाही, हे प्रवाशांनी लक्षात ठेवायला हवं.








