Home gardening tips : कमळाची फुलं आता फक्त तलावातच नाही, तर तुम्ही तुमच्या बाल्कनीत किंवा बागेतही सहज उगवू शकता. यासाठी फक्त योग्य कुंडी, माती, ऊन आणि पाण्याची गरज आहे.
Home gardening tips : कमळ हे भारताचे 'राष्ट्रीय फूल' असून ते पवित्रता, सौंदर्य आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. हे प्रामुख्याने चिखल असलेल्या गोड्या पाण्यात उमलते. गुलाबी, पांढऱ्या रंगांची मोठी, सुगंधी फुले आणि छत्राकृती पाने हे या वनस्पतीच्या वैशिष्ट्ये आहेत. कमळाचा बहर मार्च ते सप्टेंबर या काळात असतो. सांस्कृतिकदृष्ट्या कमळला अत्यंत महत्त्व आहे. हिंदू आणि बौद्ध धर्मात कमळाला पवित्र मानले जाते. देवी-देवता अनेकदा कमळावर बसलेले दाखवले जातात. हे ज्ञानाचे, अध्यात्मिकतेचे आणि अलिप्ततेचे (चिखलात राहूनही पाण्यापासून दूर) प्रतीक आहे.
कमळाचं फूल हे पवित्रता, शांती आणि सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं. अनेकांना वाटतं की कमळ फक्त तलावातच उगवतं, पण योग्य पद्धत वापरल्यास तुम्ही ते तुमच्या बाल्कनीत किंवा बागेतही सहज उगवू शकता. थोडी तयारी आणि नियमित काळजी घेतली, तर कमळाचं रोप दीर्घकाळ हिरवंगार राहतं आणि त्याला सुंदर फुलंही येतात.
स्टेप १: योग्य कुंडी आणि माती निवडा
कमळ लावण्यासाठी एक पसरट आणि खोल कुंडी गरजेची आहे. ही कुंडी किमान १२-१८ इंच खोल असावी आणि महत्त्वाचं म्हणजे तिला पाणी बाहेर जाण्यासाठी छिद्र नसावं. कुंडीमध्ये भारी किंवा चिकणमाती भरा, जेणेकरून मुळं घट्ट रुजतील आणि पाण्यात तरंगणार नाहीत.
स्टेप २: कमळाचा कंद (Rhizome) योग्य पद्धतीने लावा
बियाण्यांपेक्षा कंदापासून कमळ लावणं जास्त सोपं आहे. हा कंद मातीत एका बाजूला तिरकस दाबा; त्याला पूर्णपणे गाडू नका. कंदाचं टोक मातीच्या बाहेर राहील याची खात्री करा. त्यानंतर, माती हलू नये याची काळजी घेत कुंडीत हळूवारपणे पाणी भरा.
स्टेप ३: पाणी आणि उन्हाचा योग्य समतोल साधा
कमळाच्या कुंडीत नेहमी पाणी भरलेलं असावं. पाण्याची पातळी मातीच्या वर असली पाहिजे. कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथे दररोज किमान 5-6 तास थेट सूर्यप्रकाश मिळेल. योग्य ऊन आणि पाणी मिळाल्यास रोपाची वाढ वेगाने होते आणि फुलंही चांगली येतात.
कमळाच्या रोपाची काळजी कशी घ्याल?
- कुंडीतील पाणी कधीही पूर्णपणे सुकू देऊ नका.
- आठवड्यातून एकदा पाणी बदलणं फायदेशीर ठरतं.
- महिन्यातून एकदा सेंद्रिय कंपोस्ट किंवा पाण्यात विरघळणारं खत घाला.
- वेळोवेळी पिवळी किंवा सुकलेली पानं छाटून टाका.
- हिवाळ्यात रोपाची वाढ कमी होते, ही एक सामान्य गोष्ट आहे.


