टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने क्रिकेटच्या मैदानावर आपली वेगळी ओळख निर्माण केलीये. आता तो बिझनेसच्या जगातही मोठी स्वप्नं पाहतोय. भारतीय स्पोर्ट्स ब्रँड्सना ग्लोबल लेव्हलवर नेण्याचं त्याचं टार्गेट आहे.
मुंबई : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने क्रिकेटच्या मैदानावर आपली वेगळी ओळख निर्माण केलीये. आता तो बिझनेसच्या जगातही मोठी स्वप्नं पाहतोय. फक्त जाहिरातींमध्ये दिसणारा सेलिब्रिटी न राहता, भारतीय स्पोर्ट्स ब्रँड्सना ग्लोबल लेव्हलवर नेण्याचं त्याचं टार्गेट आहे.
आता विराटने लिंक्डइनवर (LinkedIn) एन्ट्री मारलीये. आपल्या पहिल्याच पोस्टमध्ये त्याने बिझनेसबद्दलचा आपला दृष्टिकोन शेअर केलाय. 'अजिलिटास स्पोर्ट्स'मध्ये (Agilitas Sports) इन्व्हेस्टर आणि 'वन८वर्ल्ड'चा (one8world) को-फाउंडर तसंच को-क्रिएटर म्हणून आपली भूमिका त्याने स्पष्ट केलीये.
लिंक्डइनवर कोहलीची एन्ट्री: काय आहे हा नवा प्लॅन?
साधारणपणे लिंक्डइनचा वापर बिझनेसमन, प्रोफेशनल्स, कंपन्यांचे बॉस आणि नोकरी शोधणारे लोक करतात. आता विराट कोहलीनेही या प्लॅटफॉर्मवर येऊन बिझनेसमधला आपला इंटरेस्ट जगासमोर आणलाय.
आपल्या पहिल्या पोस्टमध्ये त्याने सांगितलंय की, स्पोर्ट्स प्रॉडक्ट्स बनवणं, ग्राहकांपर्यंत पोहोचणारे ब्रँड्स तयार करणं आणि स्पोर्ट्स प्रॉडक्ट्सचं डिस्ट्रिब्युशन करणं, अशी एक भक्कम सिस्टीम भारतातच उभी करण्याचं त्याचं ध्येय आहे. भारत हा फक्त वर्ल्ड-क्लास खेळाडू घडवणारा देश न राहता, ग्लोबल मार्केटमध्ये टक्कर देणारे स्पोर्ट्स ब्रँड्सही आपण बनवले पाहिजेत, असं त्याचं म्हणणं आहे.
३०० कोटींच्या प्युमा डीलऐवजी स्वतःच्या बिझनेसवर फोकस?
विराट कोहली याआधी प्युमासारख्या (Puma) मोठ्या स्पोर्ट्स ब्रँड्ससोबत जोडला गेला होता. पण आता तो फक्त ब्रँड ॲम्बेसेडर राहण्यापेक्षा बिझनेसचा मालक आणि त्याच्या ग्रोथमध्ये पार्टनर होण्यावर फोकस करतोय. जुन्या रिपोर्ट्सनुसार, प्युमासोबतची डील वाढवण्याची ऑफर जवळपास ३०० कोटी रुपयांची होती. पण ती पुढे चालू ठेवण्याऐवजी विराटने 'अजिलिटास स्पोर्ट्स'मध्ये जवळपास ४० कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करण्याचा निर्णय घेतलाय.
काय आहे अजिलिटास स्पोर्ट्स?
अजिलिटास स्पोर्ट्स (Agilitas Sports) ही स्पोर्ट्सवेअर आणि ॲक्टिव्हवेअर क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. २०२३ मध्ये प्युमा इंडिया आणि साऊथईस्ट आशियाचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर अभिषेक गांगुली, अतुल बजाज आणि अमित प्रभू यांनी मिळून ही कंपनी सुरू केली. प्रॉडक्ट डिझाईनपासून ते मॅन्युफॅक्चरिंग आणि रिटेल सेल्सपर्यंतच्या सगळ्या गोष्टी एकाच छताखाली आणण्याचा या कंपनीचा प्रयत्न आहे. यामुळे भारतीय स्पोर्ट्स प्रॉडक्ट्ससाठी नवीन मार्केट तयार होण्याची संधी आहे.
'भारताने प्रत्येक खेळाचं सेलिब्रेशन केलं पाहिजे'
कोहलीच्या पहिल्या लिंक्डइन पोस्टचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारताच्या स्पोर्ट्स कल्चरबद्दलचं त्याचं स्वप्न. लोक प्रत्येक खेळाला फॉलो करतील, त्याचं सेलिब्रेशन करतील आणि तो खेळतील, असा भारत पाहण्याची आपली नेहमीच इच्छा असल्याचं त्याने म्हटलंय. भारताकडे वर्ल्ड-क्लास टॅलेंट घडवण्याची ताकद आहे, हे आजची नवी पिढी सिद्ध करतीये. याच ताकदीचा वापर करून ग्लोबल मार्केटमध्ये आपली ओळख निर्माण करणारे भारतीय ब्रँड्स बनवण्याची वेळ आता आलीये, असं त्याचं ठाम मत आहे.


